मार्लेश्वर हे श्री महादेवाचे स्थान असल्याने महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारास तिथे भक्तांची गर्दी उसळत असली तरी संक्रांतीच्या विवाहसोहळ्यास अनन्यसाधारण महत्त्व असून तो पाहण्यासाठी जनसागर उसळतो.मार्लेश्वराचं वेगळेपण म्हणजे त्याचा संक्रांतीला होणारा कल्याणसोहळा आणि त्याचे डोंगरावरील वास्तव्य.
मकर संक्रांत म्हणजे सूर्यपूजा, उत्तरायण प्रारंभ, तीळगूळ, पतंगाची कापाकापी, हळदी कुंकू आणि हलव्याचे दागिने. शिवाय नवविवाहितांच्या दृष्टीने नवीन वर्षात येणारा पहिलाच सण. पण या सणाच्या शुभ मुहूर्तावर कोकणातील मारळ नावाच्या छोट्याशा गावी एका देवाचे साग्रसंगीत लग्न लावले जाते. अन् त्या निमित्ताने पाच दिवसांची मोठी जत्रा भरते, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास दर वर्षी आवर्जून हजेरी लावणारे हजारो भाविक कोकणात आहेत, तसेच खास मुंबई आणि कोल्हापुरातूनही जाणारे आहेत.
हा देव आहे मार्लेश्वर, अर्थात् भगवान श्री शिव शंकर. अन् त्याचे देवस्थान आहे, मारळ गावच्या डोंगरावर. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात असलेल्या देवरुख या गावापासून 18 कि.मी. अंतरावर हा मार्लेश्वर आहे. डोंगरावरील गुहेत दोन शिवपिंडी आहेत. एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर या नावाने ओळखली जाते. ह्या शिवपिंडी स्वयंभू आहेत. या जागृत देवस्थानावर नवस बोलणारे असंख्य भाविक आहेत. गुहेतील कपारीत साप वावरत असतात, परंतु त्यांनी आजपावेतो कोणालाही दंश केल्याचे ऐकिवात नाही.
मार्लेश्वर हे श्री महादेवाचे स्थान असल्याने महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारास तिथे भक्तांची गर्दी उसळत असली तरी संक्रांतीच्या विवाहसोहळ्यास अनन्यसाधारण महत्त्व असून तो पाहण्यासाठी जनसागर उसळतो.
मार्लेश्वराचा हा मंगलसोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.
मार्लेश्वर हा वर, तर नजीकच्या साखरपा गावातील गिरिजादेवी (भवानी मंदिर) ही वधू समजून लग्न लावले जाते. त्यासाठी साखरपा गावापासून वाजत गाजत पालख्या आणल्या जातात. ही सवाद्य मिरवणूक त्या पंचक्रोशीतील गावांमधून फिरून
14 जानेवारीस भल्या पहाटेपर्यंत मार्लेश्वराच्या डोंगरावर पोहोचते.
मिरवणुकीपुढे मशालधारी असतात. तो मान चर्मकार समाजास दिला जातो. पालख्या जेव्हा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतात. तेव्हा मार्लेश्वराच्या जयघोषाने सह्याद्रीच्या डोंगरदर्या दुमदुमतात.
अपूर्व मंगलसोहळा
गुहेसमोरील सभामंडपात सजवलेला मंडप असतो. त्यामध्ये पहाटेस मुलगी पाहणे, मुलीचे घर पाहणे, मागणी घालणे वराची पसंती, मानपान देणे-घेणे, ठरावनामा, आमंत्रण, पानसुपारी असे विधी रीतसर केले जातात. नंतर विवाहासाठी 360 मानकर्यांना निमंत्रण देण्यात येते. आधी ठरविलेल्या वेळेनुसार, मुहूर्ताची वेळ काटेकोरपणे पाळून
मार्लेश्वर-गिरिजा, विवाह संपन्न होतो. यासाठी लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलश मांडले जातात. मार्लेश्वराचा सजवलेला टोप एक मानकरी मांडीवर घेतात तर गिरीजादेवीचा टोप दुसरे
मानकरी मांडीवर घेतात. लग्नाच्या प्रथेप्रमाणे सर्व विधी केले जाऊन नंतर दोघांमधे अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात आणि लग्न लावले जाते. सनई, चौघडा, वाजंत्री वाजतात. फटाक्यांची आतषबाजी होते. अन् हा मंगलसोहळा संपन्न होतो. सभामंडपात उपस्थित मंडळी अक्षता देखील टाकतात. विवाहानंतर नवरा-नवरीला आहेर करण्याची पद्धत आहे. तसंच सौभाग्यवतींना हळद-कुंकू दिले जाते. नंतर महाप्रसाद देखील दिला जातो.
मार्लेश्वर या जागृत स्थाना मधील देवाचा हा अपूर्व मंगलसोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक हजर असतात. घरचं कार्य असल्याच्या भावनेनं मंडळी सजूनधजून येतात. नंतर मार्लेश्वराचं दर्शन घेतात नि जत्रेचा आनंद लुटतात.
मार्लेश्वरचा धबधबा
हरिहरेश्वर, गणपतीपुळे, पावस, हेदवीचा गणपती अशी काही मोजकीच तीर्थस्थळे कोकणात प्रसिद्ध आहेत. यापैकी एक म्हणजे मार्लेश्वर. मार्लेश्वराचं वेगळेपण म्हणजे त्याचा संक्रांतीला होणारा कल्याणसोहळा आणि त्याचे डोंगरावरील वास्तव्य. डोंगरी राहणारा हा कोकणातील एकमेव देव असावा. या परिसरातील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे आहे. पावसाळ्यात हा भाग अधिकच खुलतो. घनदाट झाडांनी वेढला जातो. हिरवीगार वनश्री नयनरम्य असते. याच बरोबर मार्लेश्वर धबधबा प्रेक्षणीय आहे. सुमारे 200 फूट एवढ्या उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहतो. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धबधब्यांमध्ये हा खूप प्रसिद्ध आहे. धबधब्याचा प्रपात एवढा मोठा असतो की, संक्रांतीच्या जानेवारी महिन्यातही तो कोसळत असतो. भाविकांनी केलेल्या मार्लेश्वराच्या जयघोषात नि त्याच्या विवाहाप्रसंगी वाजणार्या वाद्यात जणू तो आपला आवाज मिसळत असतो. ह्या वैशिष्ट्यांमुळेच मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्राबरोबरच चांगले पर्यटन क्षेत्रदेखील ठरते.