रामायण आणि महाभारत यांनी आपले जीवन व्यापून टाकले आहे. त्यातसुद्धा महाभारताचे दाखले उदाहरणे देत समाजाची वाटचाल सुरू आहे. त्यातील व्यक्ती, त्यांचे आदर्श, त्यांचा संघर्ष यांचे दाखले दिले जातात. काही लोकांच्या मते ही पौराणिक कथा आहे. पण भारतीय ज्ञानप्रणालीत मात्र त्याची इतिहास अशी नोंद झाली आहे. या महाकाव्याचा इतिहास म्हणून नव्याने शोध घेण्याचा मौलिक प्रयत्न अमी गणात्रा या अभ्यासू लेखिकेने घेतला असून 'महाभारताचे अनावरण' हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. भारतातल्या प्रसिद्ध इतिहासाचे अज्ञात पैलू, असे या पुस्तकाचे बोधवाक्य असून ते सार्थ करणारे हे पुस्तक आहे.
लेखिका व संशोधक अमी गणात्रा या संस्कृत आणि भारतीय ज्ञानप्रणालीच्या अभ्यासक आहेत. त्यांनी व्यासमुनींनी लिहिलेला मूळ ग्रन्थ आणि त्यावर लिहिलेली असंख्य पुस्तके व ग्रन्थ यांची सखोल पारायणे करून महाभारताचे नव्याने अनावरण केले आहे असे म्हणता येईल. त्यांचे अमूल्य संशोधन आणि व्यासंग यातून मूळ महाभारत कोणत्या ठिकाणी लिहिले गेले, तसेच त्यातील व्यक्तीरेखांची ओळख, त्यांची मानसिकता. तसेच या महाकाव्याबाबतची मिथके, आख्यायिका व त्यांची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. मूळ कथानक आणि घटनाक्रम सविस्तर देऊन 'जनमेजायचे सर्पसत्र' या प्रकरणापासून त्या सुरुवात करतात आणि 'एका युगाचा अंत' या प्रकरणाने अंत करतात.
पुढे 'महाभारत लेखनाची आख्यायिका' व 'कुरुक्षेत्राच्या युद्धातील व्युहरचना' ही प्रकरणे अचंबित करणारी आहेत. 'भरतकुलाचा वंशवृक्ष' हेही प्रकरण तितकेच अचंबित करणारे व जिज्ञासू वाचकांच्या ज्ञानात भर टाकणारे आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिका म्हणतात की, "ह्या कथेतील पात्रांमधले संवाद अतिशय समृद्ध आहेत. त्यामधून व्यक्तिमत्व आणि नात्यांचे मर्म उलगडते. संवादाचा सारांश देताना मी त्यांचा मूळ हेतू, भावना आणि बारकावे टिकवून भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे". मूळ ग्रन्थ संस्कृत मध्ये असून त्यात एक लाखाहून अधिक श्लोक आहेत. त्यांचे वाचन मनन करून व त्यातील अज्ञात पैलू लेखिकेने या पुस्तकातून सादर केले आहेत.
अमी गणात्रा यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद दीपाली पाटवदकर यांनी केला आहे. त्यांनी मनोगतात म्हटले आहे की, हे मूळ लेखन सोपे, सुटसुटीत, नेटके असून तरुणाईला आकर्षक वाटेल अशा पद्धतीने लिहिले आहे. त्यांच्या या विधानाची प्रचिती ठायी ठायी येते. समृद्ध मराठी साहित्यामध्ये मानबिंदू ठरेल असे हे पुस्तक आहे. त्यामुळेच संशोधक वृत्तीच्या तरुणांनी व सर्वसामान्य वाचकांनी अवश्य वाचावे.
महाभारताचे अनावरण
लेखिका : अमी गणात्रा
प्रकाशक : ब्लूम्सबरी इंडिया
पाने : २९०
मूल्य : ४९९ रुपये