जी पत्नी आपल्या पतीच्या हृदयाचे बोल ऐकते - अर्थात् मन राखते किंवा त्याचं मन मोडत नाही. त्याचप्रमाणे कामामध्ये त्याचा हुरूप वाढवते, अन् आपला आनंद त्याच्याकडे व्यक्त करते नि त्याचा आनंद द्विगुणीत करते, त्यांचा संसार अतिशय सुखाचा असतो. अर्थात् हे कार्य एकतर्फी असता कामा नये.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, हे प्राचीन विधान आहे. ज्याची आधुनिक काळात, काही लोक टिंगल करतात. पण आपली लग्नाची गाठ ज्या जोडीदाराशी बांधली जाते, ते विधिलिखित असतं किंवा ते तसंच घडायचं असतं, याची विज्ञानाने देखील मान्यता दिलेली आहे, हे टिंगलखोरांनी लक्षात घ्यावे. अन् त्यामुळेच लग्नाची नाती टिकतात, हेही लक्षात घ्यावे.
’सायकॉलॉजिकल सायन्स’ या वैज्ञानिक प्रकाशनामध्ये असं दिलेलं आहे की, आपण कोणत्या प्रकारच्या जोडीदाराची निवड करतो, हे आपले जिन्स् ठरवतात. सर्वसाधारणपणे, ज्याचा जिनोटाइप असमान आहे, अशाच जोडीदाराची आपण निवड करतो. त्यामुळे एक मोठा फायदा असाही होतो की, असमान जिनोटाइप असलेला जोडीदार असला की, होणार्या मुलाबाळांची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. आता झालेल्या अध्ययनातून हे सिद्ध झालेलं असलं तरी, आपल्या संस्कृतीत अद्यापही असं मानलं जातं की, नवरा-बायकोचं गोत्र एक असू नये. भिन्न गोत्र असलेल्या जोड्या टिकतात आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारी अपत्ये सुदृढ असतात.
जादू की झप्पी आवश्यक
प्रेमसंबंधात किंवा विवाहसंबंधात प्रणयाला महत्त्व आहे. प्रणय आणि सेक्स एकमेकांच्या संमतीने केल्यास आरोग्यदायी असतो. अन् नात्यात जिवंतपणा राहतो. प्रणयाची पहिली पायरी आहे आलिंगन. आपल्या जोडीदारास प्रेमाने आलिंगन दिले की, शरीरातील रक्तदाब सुरळीत राहतो, असं नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी सिद्ध केलं आहे. आलिंगन दिल्याने शरीरातील ऑक्सिटॉसिन नामक हार्मोन्सचा स्तर वाढतो, अन् फील गुड ही भावना निर्माण होते, हे त्यांचं निरीक्षण आहे. याबाबत त्यांनी काही प्रयोग केले. काही जोडप्यांना त्यांनी दहा मिनिटं एकत्र बसविलं. या दरम्यान एकमेकांशी गप्पा मारायला त्यांनी सांगितलं. नंतर त्यांना आलिंगन देण्यास सांगितलं. एकमेकांच्या मिठीत जास्त वेळ राहायला सांगितलं. त्यानंतर त्या जोडप्यांची तपासणी केली असता, त्यांचे रक्तदाब आणि ऑक्सिटॉसिन स्तरात बदल दिसून आला. याच क्रिया दररोज करायला सांगितल्या तेव्हा हा बदल जास्त प्रमाणात दिसून आला. संजय दत्तच्या सिनेमातून आलिंगनास ’जादू की झप्पी’ म्हटलं गेलं. अन् हे वाक्य प्रचलित झालं. वरील प्रयोग पाहता हे वाक्य सार्थ ठरल्याचं दिसून येतं. तेव्हा या झप्पीनं आरोग्याचा स्तर वाढत असेल तर नात्यांचं आरोग्य देखील सुदृढच राहील, नाही का?
मन मोकळं करा
संसार सुखाचा चालण्यासाठी पती-पत्नी यांचं मनोमीलन महत्त्वाचं असतं. निव्वळ घरातील दैनंदिन कामं केली, म्हणजे संसार सुरळीत चालतो, असं म्हणता येणार नाही. कित्येक शास्त्रज्ञांनी असं मत मांडलं आहे की, जी पत्नी आपल्या पतीच्या हृदयाचे बोल ऐकते - अर्थात् मन राखते किंवा त्याचं मन मोडत नाही. त्याचप्रमाणे कामामध्ये त्याचा हुरूप वाढवते, अन् आपला आनंद त्याच्याकडे व्यक्त करते नि त्याचा आनंद द्विगुणीत करते, त्यांचा संसार अतिशय सुखाचा असतो. अर्थात् हे कार्य एकतर्फी असता कामा नये. पतीने देखील पत्नीच्या बाबतीत हीच वर्तणूक ठेवली तर त्यांच्या संसारास चार चांद लागलेच म्हणून समजा. त्यांचे नातं अधिक घट्ट होतं. इतर जोडप्यांच्या तुलनेत, त्यांचे सुख वाढते असते. एकमेकांनी सुखदुःखाच्या बाबतीत मन मोकळं केलं तर नात्यामध्ये कधीच दुरावा निर्माण होणार नाही.
रासायनिक द्रव्याची किमया
जगभरात प्रेमविवाहाचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये सुद्धा पाहताक्षणी प्रेमात पडल्याची उदाहरणे जास्त आहेत. एखादी अनोळखी व्यक्ती पहिल्या भेटीतच का आवडू लागते, याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? तो किंवा ती एकदम इतकी मनात का भरते की, हा आपला जीवनसाथी असावा, असा मन कौल देते. शास्त्रज्ञाच्या मते ही प्रेमाची नाही तर रासायनिक द्रव्याची किमया आहे. जेव्हा एखाद्याच्या बाबतीत मनात प्रेमभावना जागृत होते, तेव्हा मेंदुतील आनंदाचे केंद्र गतिमान होते. अन् डोपामाइन केमिकलची निर्मिती करू लागते. त्याच्याने प्रेमभावना जागृत होते. मनात आनंदलहरी निर्माण होतात. प्रेम दाटून येते. अन् समोरच्याकडून प्रतिसाद मिळाला की प्रेम आणि मग विवाह, असे वर्तुळ पूर्ण होते.
अनेक फायदे
संशोधनातून असेही लक्षात आले आहे की, ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरले असते, त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहते. नैराश्याला थारा राहत नाही. त्यांचे कामजीवन समाधानी असते व करिअरमध्ये ते यशस्वी होतात. एवढे सर्व फायदे असताना, आपलं वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले ठेवणे, हिताचे नाही का?
पिटस्बर्ग युनिव्हर्सिटीच्या पाहणी अहवालातून हे दिसून आले आहे की, विवाहित महिलांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. अविवाहितांपेक्षा विवाहित जोडप्यांचे आयुष्यमान जास्त असते. कॅन्सरचा धोका कमी असतो अन् दारू-सिगारेट आदी व्यसने पण विवाहितांमध्ये कमी आढळून येतात. ज्या महिलांचा स्वर मंजुळ असतो, त्या दिसायला देखील सुंदर असतात, असेही या पाहणी अहवालात आढळून आले आहे आणि अर्थात्च त्यांचे स्वकीयांशी संबंध देखील
मधुर राहतात.