सर्वत्र आता लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळतेय. आणि यंदाच्या या लग्नसराईत एक मराठमोळ गाणं धुमाकूळ गाजवायला सज्ज झालं आहे. यंदाच्या लग्नात ‘लय भारी दिसते राव’ हे नवं कोर गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अशी अनेक गाणी आहेत ज्यांनी आजवर लग्नमंडपात वर्हाडी मंडळींना ठेका धरायला लावला आहे. आणि आता हे नवं रोमँटिक गाणंही सर्वांना थिरकायला भाग पाडतंय. लग्नात नवऱ्या मुलीबरोबर करवलींचा नखरा कसा असतो याचीही झलक गाण्यात दिसतेय. तर एखाद्या लग्नात आवडलेल्या मुलीला पटवण्यासाठी त्या मुलाला किती प्रयत्न घ्यावे लागतात याची मज्जा ही या गाण्यात दिसतेय.

मराठमोळ्या लग्नातील रीतिभाती, परंपरा, प्रेम, हास्य आणि धमाल मस्ती या लय भारी दिसते राव या गाण्यातून अनुभवता येत आहे. अल्पावधीतच हे गाणं लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. अमित कर्पे प्रस्तुत ‘लय भारी दिसते राव’ हे गाणं असून या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा संकल्प शीर्षेकर याने सांभाळली आहे.

तर मोहित कुलकर्णी याने या गाण्याला संगीत दिले असून किरण कासार आणि सोहम वारणकर यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तसेच या प्रेमगीताचे बोल अभय कुलकर्णी आणि वैभव कोळी लिखित आहेत. नृत्यदिग्दर्शक म्हणून विजय बाविस्कर यांनी उत्तम बाजू सांभाळली आहे.
अमित कर्पेच्या रंगतदार अशा या गाण्यात कलाकारांनीही धमाल मस्ती करत चारचाँद लावले आहेत. हे गाणं ‘अमित कर्पे म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.