Close

जाणून घ्या आरोग्याचा मूलमंत्र (Know The Basics Of Health)

‘आपलं आरोग्य आपल्या हाती’ असं आपण अनेकदा वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. वारंवार आजारी पडणे, आपली प्रतिकारशक्ती कमी होणे, वजन वाढत जाणे किंवा अचानक थकवा जाणवणे अशा तक्रारी सुरूच असतात. याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं. पण ही दुखणी कधी कधी अशी वेळ आणतात की, ज्यामुळे आपल्याला सक्तीची विश्रांती घेणं भाग पडतं. अशी विश्रांती वारंवार घ्यावी लागण्याची वेळ येऊ नये याकरिता आरोग्याचा मूलमंत्र जाणून घ्या व त्यानुसार स्वतःची काळजी घ्या.
आरोग्य निरोगी राखण्यासाठी काय करायला हवं याबाबत आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात. परंतु त्या अंमलात आणताना आपली जीवनशैली आड येते. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणजेच आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपण जागरूक राहिलं
पाहिजे. आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून प्रयत्न करणं केव्हाही चांगलं. यासाठीच चांगल्या आरोग्यदायी सवयी, नियमित आरोग्य तपासणी, त्वरित उपचार, प्रतिबंधात्मक लस आणि रोग प्रतिकारशक्ती या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
थकवा जाणवणे
दिवसभराच्या धावपळीत कामाच्या ताणामुळे थकवा जाणवणे सामान्य आहे. परंतु तुम्हाला कायम थकवा जाणवत राहिल्यास या लक्षणाची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. अतिश्रमानंतर थकवा येणे हे निसर्गक्रमप्राप्त आहे. परंतु रात्रभर झोपूनसुद्धा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागल्यास तपासणी करून घ्यावी. सतत थकवा येणे हे ‘लो एनर्जी’चे लक्षण असू शकते. या परिस्थितीत मानसिक थकवा येऊन नैराश्य येते. त्याबरोबरच शारीरिक थकवा येऊन अशक्तपणा जाणवू लागतो. ही मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. तेव्हा यासाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
ऊर्जा क्षमता वाढवा
तुमच्या आहारात विशेषतः न्याहारीमध्ये फायबरचा समावेश करा. अधिकाधिक फळे आणि सिरील्स खा. फायबरमुळे रक्तातील ग्लुकोज पातळी संतुलित राहते, ऊर्जा क्षमता वाढते आणि यामुळे मानसिक व शारीरिक थकवा दूर राहून नैराश्य येत नाही.
कधी कधी अगदीच थकवा जाणवत असल्यास एखादा कप कॉफीही तुम्हाला तरतरी आणते. पण म्हणून सारखं कॉफी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असते.
शरीरातील ऊर्जेची पातळी संतुलित राखण्यासाठी दर दोन ते तीन तासांनी काहीतरी खावे. यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण योग्य राहून ऊर्जा क्षमता टिकून राहते.
आहारात प्रथिने, कर्बोदके आणि मेदाचे प्रमाण पूरक असायलाच हवे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानेही थकवा जाणवतो. तेव्हा भरपूर पाणी प्यावे.
चालण्याचा व्यायाम हा तुमच्यातील ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी चांगला असतो. नियमित व्यायाम करणे जमत नसेल तर दिवसातून किमान 20-25 मिनिटे चालायला हवे.
आहारातून बी जीवनसत्त्व योग्य प्रमाणात न मिळाल्यासही वारंवार थकवा जाणवतो. बी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असणारा आहार घ्यावा.

अंगदुखी आणि वेदना
आजारपण, अतिश्रम, मासिक पाळी, स्नायूंवर ताण पडल्याने वा कधी कधी कोणतेही कारण नसताना अंगदुखी आणि वेदना जाणवतात. ओटीपोटात दुखणे, पोटात दुखणे, बोटे आणि हातांचे सांधे दुखणे, पाठदुखी आणि डोकेदुखीने आपण बेजार होतो. बदललेल्या सवयींमुळेही टाच दुखणे, टेनिस एल्बो अशी काही दुखणी कायम सतावत राहतात. अशा दुखण्यांवर वेदनाशामक गोळ्या खाऊन तात्पुरता आराम मिळवला जातो. परंतु अशा दुखण्यांवर वेळीच उपाय न केल्यास मोठे आजार उद्भवू शकतात.
योग, ध्यानधारणा, व्यायाम, चालणे, जॉगिंग अशा प्रकारच्या व्यायामाद्वारे शरीराचा ताण कमी करता येतो.
शारीरिक हालचालींवर मर्यादा न घालता सोपे व्यायाम प्रकार केल्यास नक्की आराम मिळतो.
काय काळजी घ्यावी?
तुमचं वजन वाढलं असेल तर ते प्रथम कमी करा. ज्यामुळे गुडघेदुखीचा त्रास संभवणार नाही.
गुडघे आणि कमरेखालच्या भागासाठी विशेष व्यायामप्रकार करावेत. जे ऑस्टियोथ्रिटीस होऊ नये याकरिता फायदेकारक ठरतात.
नेहमी उंच टाचांच्या चपला वापरू नयेत. पायाच्या तळव्यांच्या पुढील भागावर शरीराचा तोल राहिल्याने नुकसान होण्याची शक्यता असते.
स्नायू आणि सांध्याच्या दुखण्यावर त्वरित मसाज करणे, शेक देणे असे उपाय करावेत.
उठताना, बसताना, चालताना आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण असावी. ज्यामुळे आपल्या शरीराला ताण येणार नाही. याबरोबरच नियमित व्यायाम हा शारीरिक दुखणी टाळण्याचा उत्तम उपाय आहे.
परिपूर्ण आहाराचं सूत्र
आपला रोजचा आहार परिपूर्ण असावा यासाठी आपण दक्ष रहात नाही. यामुळे काही घटक ज्यांचा शरीराला नियमित पुरवठा होणे आवश्यक असते, त्यांची कमतरता भासू लागते आणि आजार बळावतात. याकरिता सर्व पोषणमूल्ये मिळणारा आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात पुढील घटकांचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे.
प्रथिने : दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, मटण, ड्रायफ्रूटस् इत्यादी.
कर्बोदके : तृणधान्ये, फळे, भाज्या, पास्ता आणि शर्करायुक्त पदार्थ.
मेद : ड्रायफ्रूटस्, विविध तेले आणि दुग्धजन्य पदार्थ.
जीवनसत्त्वे ः ए, बी, सी, डी, ई आणि के जीवनसत्त्व तसेच क्षार, खनिजद्रव्ये आणि कॅल्शियम, पोटॅशियम, लोह इत्यादी.
याबरोबरच आहारात मेदाम्ले असणे आवश्यक असते. जे थंड पाण्यातील मासे, सुकामेवा, करडई, सूर्यफूल, ऑलिव्ह ऑईल अशी तेले, हिरव्या पालेभाज्या यांत उपलब्ध असते. यातील ओमेगा 6 व ओमेगा 3, ही मेदाम्ले चांगले कोलेस्टेरॉल संतुलित राखण्यासाठी उपयुक्त असतात.
आपल्या शरीराची ऊर्जेची गरज कर्बोदके, प्रथिने आणि मेद यातून भागवली जाते. प्रत्येक व्यक्तीला आवश्यक कॅलरीज्चे प्रमाण त्या व्यक्तीचे वजन, वय, उंची आणि कामाचे स्वरूप यानुसार ठरते. म्हणूनच आपल्या आवश्यकतेनुसार जास्त कॅलरीयुक्त घटक मेदाच्या स्वरूपात शरीरात साठले जातात.

रोग प्रतिकार क्षमता वाढवा
व्याधीपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी स्वतःला निरोगी ठेवणे गरजेचे असते. आपल्यावर परिणाम करणार्‍या अनेक घटकांमुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. या सगळ्यापासून बचाव करते, ती रोग प्रतिकारशक्ती. आपलं शरीर स्वत:ची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतं. मात्र आजच्या विचित्र राहणीमानामुळे, जंक फूडच्या अतिरेकामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे. कामाचा वाढता ताण, ताणाचे नियोजन करण्याचा अभाव, प्रदूषण, अन्नामध्ये आढळणारी कीटकनाशकं यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. रोगप्रतिकार क्षमता जेवढी जास्त तेवढे तुम्ही अधिक कणखर असता. आपण जे अन्न खातो त्याच्या पोषणमूल्यांवर रोगप्रतिकार शक्ती अवलंबून असते. ही पोषणमूल्ये अख्खी धान्यं, लिंबू वर्गातील फळं, हिरव्या भाज्या, सुका मेवा, दुग्धजन्य पदार्थ आणि याबरोबरच योग्य मांसाहार यातून प्राप्त होऊन, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
व्यायाम हवाच : तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे. यासाठी दिवसाला किमान 20 मिनिटं वॉकिंग, जॉगिंग, पोहणं, सायकलिंग असा व्यायाम करायला हवा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
लिंबूपाणी : एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला. हे मिश्रण सकाळी उठल्यावर घ्या.
सकस आहार : आपल्या आहारातून सर्व प्रकारची पोषणमूल्यं शरीराला मिळतातच असं नाही. म्हणूनच आहारात अधिकाधिक नैसर्गिक अन्नपदार्थांचा समावेश करावा. कोबी, बीट, टोमॅटो यासारखे गडद रंगांच्या पदार्थांचा आहारात समावेश करा. अशा पदार्थांमध्ये अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स अधिक प्रमाणात असतात. प्रोसेस्ड फूडपेक्षा नैसर्गिक भाज्यांना प्राधान्य द्या.
कॅफेन टाळा : कॅफेनमुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून कॉफी (कॅफेन)चं प्रमाण मर्यादित ठेवा. तसंच, स्मोकिंग आणि अल्कोहोल यांचं प्रमाणही कमी करा.
ताजी फळं : सफरचंद, संत्र यासारखी ताजी फळं वरचेवर खात रहा. तसंच, फळांचा ताजा रस घेणंही फायद्याचं असते.
दही : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दही अतिशय लाभकारक असते. यासाठी नियमितपणे जेवणात एखाद वाटी दही असायला हवी.

Share this article