फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
कंगना रनौत बरेचदा बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका करत असते. बरं याबाबत तिला वाईटही वाटत नाही, उलट या कलाकारांमध्ये कौतुक करण्याइतकं कौशल्यच नाही, असं तिचं स्पष्ट मत आहे. पण पूर्वी असं नव्हतं हे सांगण्यासाठी कंगनाने एक ट्वीट केलं आहे, ज्यात तिनं एक जुना व्हिडिओ शेअर करत असं लिहिलं आहे की - 'आधी असं काहीच नव्हतं, मी सर्व अभिनेत्रींच्या कामाचं कौतुक करत असे. वाऱ्यासारखा सर्वत्र व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंगना खरोखर दिपिका पादुकोण, आलिया भट्ट, करीना कपूर पासून ते प्रियंका चोप्रा आणि तापसी पन्नू पर्यंत सर्वांच्या कामाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करताना दिसत आहे.'
मागील काही महिन्यांपासून जवळपास सगळ्याच अभिनेत्रींवर कंगनाने काही ना काही कमेंट केली आहे. आता मात्र तिनं याच अभिनेत्रींवर सर्वजणी मिळून काहीतरी कटकारस्थान करत असल्याचा आरोप केला आहे. मी नेहमी सगळ्यांबद्दल चांगलंच बोलते परंतु, यापैकी कोणीही कधीही माझ्या बाजूने उभ्या राहत नाहीत. कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की- ''या चित्रसृष्टीमध्ये माझी मदत वा प्रशंसा करणारी एकही अभिनेत्री नाही. हा त्याचा पुरावा आहे. माझ्या विरुद्ध यांनी मिळून गँग बनवली आहे. हे का केलं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माझ्या आणि माझ्या कामाच्या विरोधात कटकारस्थानं का रचली गेली, याचा गांभिर्याने विचार करा.''
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
कंगना रनौतने आपल्या पुढील ट्वीटमध्ये लिहिलंय्, ''तुम्ही पाहू शकता की मी या अभिनेत्रींच्या सिनेमाच्या प्रिव्ह्यूसाठी आनंदाने जायची. कॉल करून वा मेसेज पाठवून या मला बोलवायच्या... मला फुले पाठवायच्या... माझी काळजी घ्यायच्या... पण, मी जेव्हा माझ्या सिनेमाच्या प्रिव्ह्यूसाठी यांना बोलावलं तेव्हा यांनी माझा फोनही घेतला नाही. 'अब मैं रोज़ाना इनकी ‘बजाती हूँ’ क्यूंकि ये इसी लायक हैं…' या शब्दात कंगनाने त्यांच्यावरचा आपला राग व्यक्त केला आहे.
बॉलिवूडमधील या अभिनेत्रींच्या वागणुकीमुळे कंगना भलतीच दुखावली गेली आहे असं दिसतंय्. या अभिनेत्रींच्या गरजेला मी त्यांच्या सोबत होते, परंतु या अभिनेत्रींनी मला कधीही सपोर्ट केला नाही, याचा राग तिने आपल्या मनात साठवून ठेवला आहे. खरं तर या अभिनेत्रींच्या सपोर्टशिवायही कंगनाच्या करिअरमध्ये काहीच फरक पडलेला नाहीय. सध्या ती आपल्या 'थलाइवी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून कंगनाच्या अभिनयाची सर्वत्र वाहवा होत आहे. या व्यतिरिक्त कंगना रनौत अर्जुन रामपालसोबत 'धाकड' मध्ये दिसणार आहे. आता ती 'तेजस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.