मराठी रोमँटिक गाण्यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. प्रेक्षकांच्या मनावर ही रोमँटिक गाणी भुरळ घालत असून त्यांच्या दिलाचा ठेकाही चुकवायला भाग पाडत आहेत. आजवर सिनेविश्वातील अनेक रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले आणि अशातच भर घालत आणखी एक रोमँटिक गाणं ‘काही कळेना मला’ प्रेक्षकांना आणि प्रेमीयुगुलांना मंत्रमुग्ध करून सोडायला आल आहे. या गाण्याची खासियत म्हणजेच हे गाणं इतर कुठे नव्हे तर परदेशात चित्रित झालं असल्याचं दिसत आहे. लंडन येथे चित्रित झालेल्या या रोमँटिक गाण्याची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळेल. ‘काही कळेना मला’ हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आल आहे.

लंडनमध्ये शूट झालेल्या या अनोख्या प्रेमगीतातून समोर आलेली कथा प्रेक्षकांना भावतेय. हरिश वांगीकर आणि इसाडोरा बॅकन या ब्रिटिश अभिनेत्रीसह चित्रीत झालेलं मराठमोळं असं गाणं रसिक प्रेक्षकांची मन जिंकत आहे. संगीतावरील प्रेम, अभिनयावरील प्रेम शांत बसू न देणाऱ्या हरिश वांगीकरचे हे गाणं आहे. गेली १० वर्ष हरिश लाईव्ह शो करत असून प्रख्यात गायक हरिहरन यांच्या गझलमध्येही त्याने मुख्य भूमिका साकारली आहे
. या गाण्यात हरीशने अभिनयाची उत्तम बाजू सांभाळली आहे मात्र याशिवाय या गाण्याच्या संगीताची जबाबदारी पूर्णता हरिशनेच पेलवली आहे. परदेशात म्हणजेच लंडन येथे स्वमेहनतीच्या जोरावर त्याने या गाण्याचं चित्रीकरण केलं आहे. शिवाय या गाण्याचे बोलही हरिशनेच लिहिलेले आहेत तर गाण्याच्या व्हिडीओच्या दिग्दर्शनाची धुरा आणि छायाचित्रणाची धुरा निखिल रानडे याने सांभाळली आहे.

‘काही कळेना मला’ या गाण्यातून समोर आलेली ही गोड अशी जोडी रसिक प्रेक्षकांची मन जिंकत असून त्यांच्याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागत आहे. समोर आलेल्या पोस्टरवरून दोघांचाही गोड असा अंदाज पाहायला मिळतोय. हे गाणं हरीश वांगीकर या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाल आहे.