शारदीय नवरात्रीने सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे दागदागिने आणि तयार कपड्यांचे बाजार सजले आहेत. आता दसरा येणार व पुढे दिवाळी हा महासण येणार म्हणून चांगली खरेदी होईल या अपेक्षेने विविध जवाहिऱ्यांनी सवलत योजना जाहीर केल्या आहेत. कुणी सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सूट देत आहेत, तर कुणी हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सूट देत आहेत. मराठमोळे ज्वेलर्स गाडगीळ यांनी तर नवरात्रीत ९ नवी दुकानें उघडून मोठा बार उडवून दिला आहे. तर आदित्य बिर्ला समूहाने मुंबईत बोरिवली मध्ये मोक्याच्या ठिकाणी 'इंद्रिया' नावाचे मोठे दालन उघडून सर्वांना चकित केले आहे.
या दालनाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये सोने, पोल्की आणि हिऱ्यांची १६ हजाराहून अधिक अभिनव डिझाईन्स आहेत. एका बड्या उद्योग समूहाने ज्वेलरी क्षेत्रात घेतलेली भरारी इतकी मोठी आहे की, जुलै महिन्यापासून त्यांनी या व्यवसायात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सदर दालन हे देशातील आठवे दालन आहे.
तयार दागिन्यांसोबतच तयार कपड्यांना या दिवसात सुगीचे दिवस येतात. विशेषत: महिलावर्गाचा फॅशनेबल कपड्यांच्या खरेदीकडे जास्त ओढा असतो. ते लक्ष्य ठरवून या नवरात्रोत्सावात 'शॉपर्स स्टॉप' ने मालाड येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मोठा फॅशन शो आयोजित केला होता. त्यात 'गिफ्ट ऑफ लव्ह' ही संकल्पना सादर करण्यात आली. अन फेस्टिवल कलेक्शनचे अनावरण करण्यात आले. मार्क रॉबिन्सनने आयोजित केलेल्या या शो मध्ये त्यातील विविधता लक्ष्यवेधी होती.
पूजाअर्चा, समारंभ तसेच पार्टी अथवा ऑफिस मेजवानी किंवा घरगुती स्नेहभोजन प्रसंगी योग्य अशा ड्रेसेसचे प्रदर्शन त्यातून करण्यात आले. ही ड्रेस सम्पदा दिवाळीतही ग्राहकांना आवडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.