Close

मालिका: ‘अबोली’ मालिकेत जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ यांची एण्ट्री ( Janhavi killekar and mayuri wagh enter in star pravah aboli serial )

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे कारण मालिकेत एण्ट्री होतेय इन्सपेक्टर दिपशिखा भोसले आणि शिवांगी देशमाने यांची. इन्सपेक्टर दिपशिखाच्या भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि शिवांगी देशमानेची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री मयुरी वाघ.

जान्हवी किल्लेकर साकारत असलेल्या दिपशिखा या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे. लाच घेणं किंवा एखादं बेकायदेशीर काम करणं यात तिला काही गैर वाटत नाही.

जर खाकी घालून मी कायद्याचं रक्षण करत असेन तर या खाकीचा फायदा मला झालाच पाहिजे…! हे तिचं आयुष्याचं तत्व आहे. तिच्या कर्तबगारपणामुळेच तिच्या वाईट गोष्टी कधीच लोकांसमोर आल्या नाहीत. तिने केलेली बेकायदेशीर कामं देखील ती खूप सराईतपणे लपवते. अशा या डॅशिंग दिपशिखा भोसलेपाटीलचा एका केसच्या संदर्भात आता अबोलीसोबत सामना होणार आहे.

दिपशिखा प्रमाणेच मयुरी वाघ साकारत असेली शिवांगी बीड मधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली आहे. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करतेय. समृद्धीचा खून झाला असेल असं लोक म्हणत असले तरी त्यावर शिवांगीचा विश्वास नाहीये. साधी- सरळ,हतबल आणि परिस्थितीने पिचलेल्या शिवांगीला अबोली आधार देते. शिवांगीच्या बहिणीच्या शोधात तिची भेट अबोली प्रमाणेच इन्सपेक्टर दिपशिखासोबत सुद्धा होते. त्यामुळे या केसला नवं वळण मिळणार आहे.

Share this article