गोव्यात श्रावणात जायां(जाईच्या फुलां)ची पूजा असते. ह्या काळात खूप जाया फुलतात. जाईची फुले नाजूक असतात. देवस्थानात, देवस्थानाबाहेर जाईचे गजरे, वेण्या दिसतात. ह्या वेण्या, हे गजरे देवीला वाहिले जातात. श्री शांतादुर्गा, श्री महालक्ष्मी, श्री भगवती, नव दुर्गा, आर्या दुर्गा, म्हाळसा, कामाक्षी, चंडिका ह्या देवी या फुलांच्या आभूषणाने नटून जातात. मुळातल्या सुंदर मूर्ती आणखीनच सुंदर दिसू लागतात. देवीचा पूर्ण गाभारा जायांच्या फुलांनी सजतो.
नाजूकशी लहानशी फुले नशीब काढतात आणि पानांवरून सुटून सरळ देवीच्या चरणांशी येतात. ह्या फुलांच्या राशीतून देवीचा मुखवटा लोभस दिसतो. ह्या फुलांचा मंद वास गाभारा भरून टाकतो. मुळातलेच देवळातले प्रसन्न वातावरण अधिकच प्रसन्न होऊन जाते. ही फुले तशी अल्पायुषी असतात. संध्याकाळी ही फुलू लागतात आणि जणू देवीवर सुगंधाभिषेक सुरू करतात. ह्यांचा मंद सुवास जणू मंद आवाजात मंत्रोच्चार सुरू करतो. निसर्गनिर्मात्याची पूजा निसर्गाकडूनच होते.
निसर्ग निर्माण केल्याबद्दलची ती एक कृतज्ञता म्हणून आपले सर्वस्व त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरावर ओवाळून टाकतात. उत्तर रात्री ही फूले लालसर होतात जणू येणाऱ्या सूर्यनारायणाच्या आगमनाची वार्ता म्हणून. जाईच्या फुलांचे नशीब मोठे, देवीबरोबर त्यांचीही पूजा होते. पूजा देवीची होते आणि भाविक म्हणतात जायांची पूजा झाली. आयुष्य असेच असावे. अल्पायुष्य असले तरी वाहून घेणारे, जाईच्या फुलांसारखेच.