योग फक्त एक व्यायाम प्रकार यापुरता मर्यादित राहिलेला नाही. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुस्थितीत ठेवणारी ती एक जीवनशैली झाली आहे. गोव्यासारख्या निसर्गरम्य राज्यात या प्राचीन शास्त्राला आधुनिक रूप देत राज्यातील सुंदर निसर्ग आणि सर्वांगीण वेलनेसच्या समृद्ध परंपरेची जोड देण्यात आली आहे. आयुर्वेद आणि इतर वेलनेस तंत्रांसोबत योग केल्यास आरोग्याचा सर्वसमावेशक मार्ग सापडतो. भारतीय संस्कृतीत खोल रुजलेल्या या पद्धतीला आता जगभरात लोकप्रियता लाभत आहे.
योगला जोड मिळते ती आयुर्वेदाची. आयुर्वेद ही भारतातील सुमारे ३००० वर्षांहून अधिक जुनी उपचार पद्धती आहे. इतर पारंपरिक औषधे लक्षणांवर उपचार करण्यावर भर देतात. मात्र, आयुर्वेद रोगाच्या मुळावर उपचार करते आणि त्यामुळे सर्वांगिण आणि दीर्घकालीन उपचार शक्य होतात. गोव्यातील संपन्न वारसा आणि निसर्ग स्रोतांच्या सानिध्यात येथील आयुर्वेदिक सेंटर्स वैयक्तिक पातळीवरील उपचारपद्धती आणि थेरपीवर भर देतात. आपल्या दैनंदिन जीवनपद्धतीत आयुर्वेदिक तत्त्वांचा अंगिकार केल्याने अधिक समतोल, आरोग्यदायी आणि परिपूर्ण आयुष्य जगता येते.
गोवा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे आद्य सदस्य ॲड. अत्रेय काकोडकर यांनी वेलनेस आता आपल्या जीवनपद्धतीचा भाग बनला असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “वेलनेस, योग आणि पंचकर्म करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. अनेक भारतीय आणि परदेशी पर्यटक गोव्यात येऊन येथे उपलब्ध जागतिक दर्जाच्या वेलनेस सेवांचा अनुभव घेत आहेत. मी स्वत: गेली १४ वर्षे श्री श्री रवीशंकर जी यांची सुदर्शन क्रिया आणि योगाभ्यास करतो आहे. माझ्या आयुष्यात त्यामुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. या पद्धतींमुळे आपल्याला ताणतणावांपासून मुक्त, शांत आयुष्य जगण्यास सहाय्य होते.”
योग आणि आयुर्वेद यांच्या मिलाफातून सर्वसमावेशक वेलनेस तत्वज्ञानाचा बळकट पाया रचला गेला आहे. तुम्हाला काही आजार वा त्रास नसणे म्हणजे वेलनेस नव्हे. ही सकारात्मक बदलांची आणि प्रगतीची एक प्रक्रिया आहे. या पद्धतीत सर्वंकष दृष्टिकोनातून आजार होऊ नये यासाठीचे उपाय, स्वत:ची काळजी घेणे आणि आरोग्यदायी सवयी अंगी बाणवणे अशा सर्व मुद्द्यांचा विचार केला जातो.
सध्याच्या वेगवान जगात ताणतणाव आणि जीवनशैलीमुळे होणारे आजार वेगाने वाढताहेत. मात्र, योग आणि आयुर्वेद यामुळे आपल्या आयुष्याचा दर्जा लक्षणीय प्रमाणात सुधारता येतो. नियमित योग केल्याने शारीरिक क्षमता आणि मानसिक सुस्पष्टता वाढीस लागते. तर आयुर्वेदाच्या सवयींमुळे समतोल आहार, योग्य झोप आणि तणावाचा सामना करण्याच्या परिणामकारक पद्धती यासंदर्भात मार्गदर्शन लाभते. उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैली यासाठी या दोन पद्धतींच्या वापराने तुम्हाला गुरुकिल्लीच लाभते!
योग आणि आयुर्वेदाची जन्मभूमी असलेल्या भारतात गोवा हे सर्वंकष वेलनेस अनुभवांसाठीचे उत्कृष्ट केंद्र म्हणून उदयास येत आहे. गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि जागतिक आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील या राज्याचा सहभाग यातून अधोरेखित होतो. गोव्यातील निसर्गसौंदर्य आणि शांतनिवांत वातावरण यामुळे ही सर्वंकष जीवनपद्धती अनुभवणे आणि अंगिकारणे यासाठी अगदी सुयोग्य अशी पार्श्वभूमी येथे लाभते.