तुळजापूरची तुळजाभवानी (भगवती)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी हे एक पूर्ण शक्तिपीठ. ही देवी भगवती किंवा तुळजाभवानी म्हणून प्रसिद्ध आहे. राजेश्री छत्रपतींची ही आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. बालघाटाच्या कड्यावर वसलेल्या या तुळजाभवानीच्या मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे 17 किंवा 18 व्या शतकातील मंदिर आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता, ऊर्जा व तुळजा या नावाने ओळखली जाते. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला मान आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी तिने आशीर्वाद दिला. त्यामुळे येथे विविध प्रदेशातून विविध जाती-पंथांचे भाविक येतात. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ’परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केल्याचा श्लोक या दरवाजावर कोरला आहे. सभामंडपात पश्चिमेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख अशी तुळजाभवानीची प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे तिचे रूप आहे. मातेची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी विसावते, असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे. या मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, भवानी शंकर मंदिर, होमकुंड इतर देवदेवतांची मंदिरे आदी धार्मिक स्थळे आहेत. मातेचे हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही रेल्वे स्थानके येथून जवळ आहेत.