शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सकस आहाराची गरज आहे. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरास नुकसान होऊ शकतं, यात एक महत्त्वाचा घटक आहे हिमोग्लोबीन.
हिमोग्लोबीन शरीरात असणं आवश्यक आहे, कारण शरीरातील सर्व अंगाला ऑक्सिजन पुरवण्याचं महत्त्वपूर्ण काम ते करतं. ॲनिमिया झाल्यास शरीरातील लोह कमी होतं आणि त्यामुळे हिमोग्लोबीन तयार होण्याचं प्रमाण देखील कमी होतं. हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे थकवा येणे, शरीर दुखणे अशा समस्या सुरू होतात. तेव्हा आपल्या शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करणाऱ्या काही पदार्थांबाबत आपण जाणून घेऊया.
लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सुकामेवा खायला आवडतो. या सुक्यामेव्यातील काही पदार्थ आपल्यालाल हिमोग्लोबीन वाढवण्याकरीता अतिशय उपयुक्त असतात.
१.पिस्ता - कोणत्याही गोड पदार्थात आवर्जून असणारा पिस्ता अतिशय स्वादिष्ट असतो. पिस्ता स्नॅक्स म्हणूनही खाता येतो. एक मूठ पिस्त्यामध्ये १.११ मिलीग्रॅम लोह असतं, जे हिमोग्लोबीनची कमतरता दूर करण्यास मदत करतं.
२. अक्रोड : अक्रोडमध्ये प्रथिने, चरबी, फायबर आणि कर्बोदके भरपूर असतात. एवढेच नाही तर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, तांबे, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, फॉस्फरस, सेलेनियम आणि जस्त देखील त्यात आढळतं; जे आरोग्यासह हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करू शकतात.
३. काजू : सगळ्यांचा आवडीचा काजू स्वयंपाकघरात सर्व प्रकारच्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. आपण स्नॅक म्हणून देखील काजू खाऊ शकतो. मूठभर काजूमध्ये १.८९ मिलिग्रॅम लोह असते, जे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
४. मनुका : मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मनुका सेवनाने लोहाची कमतरता दूर करता येते. शिवाय शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करून हिमोग्लोबिन संतुलित राखता येते.