कामजीवनाचा आनंद घेताना सर्वसाधारणपणे पुरुषच पुढाकार घेताना आढळून येते. मात्र पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना सेक्सबाबत रुची असल्यास त्यात वावगे नाही. शरीरसुखातील समर्पण दोघांकडून सारख्याच पद्धतीने होणे आवश्यक आहे. या समर्पणात हक्क, अधिकार आल्यास नात्यामध्ये उदासीनता यायला वेळ लागत नाही.
आपल्या पुरुषप्रधान समाजात प्रत्येक बाबतीत पुरुषांचं वर्चस्व राहिलं आहे. आपण स्त्रियांपेक्षा सक्षम, बळकट आणि अधिकार गाजविणारे असल्याची प्रवृत्ती जवळपास प्रत्येक पुरुषात आढळते. ती अगदी लैंगिक सुख घेण्याबाबतदेखील दिसून येते. या प्रांतात देखील आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी पुरूष सोडत नाहीत. त्यामुळे हे सुख घेण्यात सर्वसाधारणपणे पुरुषच पुढाकार घेताना आढळून येतात. पण…
आता जमाना बदलला आहे. शरीरसुखाची मागणी करताना पुरुषांप्रमाणेच स्त्रियादेखील आपली इच्छा व्यक्त करीत आहेत. खरं म्हणजे शरीरसुख हा जोडीने, मनापासून करण्याचा नि त्याचा आनंद उपभोगण्याचा मामला आहे. पण कधी स्त्री नकार देते नि बव्हंशी (आपलं वर्चस्व दाखविण्याच्या नादात) पुरुष तिला नकार देतो. असं का घडतं? लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून आपलं शरीर पतीला समर्पित करणारी स्त्री या सुखापासून वंचित का होते? पतीला पाहिजे तेव्हा हे सुख तिनं दिलंच पाहिजे, पण तिला कधी पाहिजे असेल तर पती नकारघंटा का वाजवतो? जाणून घ्यायला हवं, नाही का?
थकवाकाही लैंगिक समस्या तज्ज्ञांच्या मते, निसर्गतः स्त्रीपेक्षा पुरुषाला कामेच्छा जास्त होत असल्याने, त्याला शरीरसुख कधीही हवेच असते. त्यामुळे तो सहसा नाकारत नाही. पत्नीला मात्र त्याला हवे असलेले शरीरसुख नाकारण्याचा अधिकार असतो. मासिक पाळी आली असताना किंवा घरी पाहुण्यांचा राबता असताना ती नकार देते. मात्र पुरुष तिला नकार देतो, त्यामागे शारीरिक किंवा मानसिक थकवा, हे प्रमुख कारण असू शकतं. ह्या दोन्ही प्रकारच्या थकव्यांमुळे तिला हवे असले, तरी तो तिला नकार देत, पाठ फिरवून झोपतो.
अभाव
एका सर्वेक्षणानुसार, भारतीय पुरुष सेक्ससंबंधात फार स्वप्ने पाहतो. ती फॅण्टसी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. लैंगिक सुखात वेगळेपण आल्याने पत्नीदेखील त्याला कधी कधी साथ देते. यामधून पत्नीच्या मनातही काही फॅण्टसी आकारतात. परंतु संकोची स्वभावामुळे ती आपल्या लैंगिक सुखाच्या अपेक्षा व्यक्त करू शकत नाही. अन् कामक्रिडेतही
स्वतःहून खुलत हवी तशी साथ देत नाही, यामुळे त्याच्यामधील शरीरसुखाची रूची कमी होते.
विसंवाद
एखाद्या गोष्टीवरून पतीपत्नीमध्ये मतभेद होतात. अहंकार डोके वर काढतो. एखाद्या मुद्द्यावरून प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी परस्परांमध्ये विसंवाद निर्माण होतो. स्त्रिया स्वभावतः प्रेम आणि भावनांना प्राधान्य देतात. तर पुरुषांना शारीरिक आकर्षण महत्त्वाचे वाटते. या मतभिन्नतेमुळे पती-पत्नीमध्ये भांडणं होतात आणि विसंवाद निर्माण होतात. परिणामी पुरुष सेक्स संबंधांबाबत उदासीन होतो. अन् नकार देतो.
आजारपण
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैलीत फरक पडला आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धा, ईर्षा, एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे मनावर प्रचंड ताण येतो आहे. एकूणच समाजातील माणसे तणावाखाली वावरताना आढळतात. हे तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान, मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तसेच विविध मानसिक व शारीरिक व्याधी देखील जडताना आढळून येतात. या व्याधींवर मग औषधे घेतली जातात. येणार्या आजारपणांनी शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. अन् शारीरिक समस्या निर्माण होतात. शरीर कमजोर झाले नि मनःस्वास्थ्य बिघडले की, त्याचा परिणाम लैंगिक सुखावर होतो. शरीरसंबंध नकोशे वाटतात. कामजीवन नीरस होते.
व्यभिचार
जसजसे वय वाढत जाते, तसतशी शारीरिक क्षमता कमी होत जाते. परंतु आपलं हे दौर्बल्य पुरुषमंडळी सहसा स्वीकारत नाहीत. अशातच दुसरी एखादी स्त्री त्यांच्याकडे आकर्षित झाली, तर तोही तिच्याकडे आकर्षित होतो. परस्त्री आपल्यावर आशक झाली, म्हणजे आपण दुर्बल नाही, असं मानसिक समाधान त्याला मिळतं. यातून शरीरसंबंध आले की, साहजिकच तो आपल्या पत्नीपासून मनाने दूर जातो नि तिच्या कामेच्छेला नकार देतो. पतीच्या व्यभिचारामागे हे एकच कारण असते, असं नाही. पुरुषांची चंचल, भ्रमर वृत्तीदेखील त्यास कारणीभूत असते.