जेवण करण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही, तेवढा वेळ जेवणाची तयारीकरिता लागतो. अर्थात भाजी बनवायची तरी ती धुवा, चिरा, त्यासाठी लागणारं साहित्य या सगळ्याची तयारी करण्यात बराच वेळ जातो. अशावेळी जेवण बनवणे सोपे जावे शिवाय वेळही वाचावा म्हणून आपण दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची आदल्या दिवशीच तयारी करून ठेवतो. म्हणजे भाज्या व इतर साहित्य कापून फ्रिजमध्ये ठेवून देतो. परंतु, असे केल्याने भाज्यांमधील पोषक तत्त्वे नष्ट होऊ शकतात. तेच आपण चिरलेली भाजी योग्य पद्धतीने साठवून ठेवली तर त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होणार नाहीत आणि आपला वेळही वाचेल.
१.हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या लवकर खराब होतात. या भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.
– पानं चांगली साफ करून मग चिरा. देठ ठेवू नका, फक्त पानंच घेऊन चिरून ठेवा.
– सुकलेली, खराब झालेली पानं ताज्या पानांसोबत ठेवू नका, नाहीतर सर्व भाजी खराब होईल.
– पालेभाज्या नेहमी कागदी पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात. त्यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो. पेपर नसल्यास पातळ सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा.
– दोन दिवसांच्या वर या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका.
२. फरसबी
ही भाजी पटकन बनते, पण तिला चिरायला वेळ लागतो. म्हणून ती आधीच चिरुन फ्रिजमध्ये ठेवून द्या. फरसबी धूवून, चिरून त्यातील पाणी सुकू द्या. त्यानंतर एका प्लास्टिक बॅगमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
३. कोबी आणि ब्रोकोली
कोबी आणि ब्रोकोली चिरून थोड्या ओलसर पेपरमध्ये वा टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे यातील ओलावा आणि पोषक तत्त्वेही कायम राहतील.
४. भोपळा
भोपळा व्यवस्थित धुवून चिरा. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
५. मटार
नाश्तामध्ये मटारच्या वेगवेगळ्या डिशेस खायला सगळ्यांना आवडतात, परंतु हे मटार सोलण्यात बराच वेळ जातो. म्हणून मोकळ्या वेळेत मटार सोलून एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.
६. जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या
बटाटा, गाजर, मुळा, बीट इत्यादी भाज्या चिरून एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात घाला. नंतर हे बाऊल एखाद्या कापडाने किंवा प्लेटने झाकून फ्रिजमध्ये ठेवा.
७. कोबी
कोबी कापून एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा.
८. कांदा - लसूण
रसभाजी बनवण्याकरता कांदा-लसूणची पेस्ट आवश्यक असते. आयत्या वेळी डोळ्यांत पाणी आणणारा कांदा चिरायचा शिवाय लसूण सोलायची, हे वेळखाऊ काम आहे. तेव्हा आधीच हे कापून फ्रिजमध्ये ठेवता येते. कांदा आणि लसूण सोलून, चिरून हवाबंद डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. परंतु चिरलेला कांदा चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ साठवू नये, तसेच लसूणही दोन दिवसांत वापरून टाकावी.
९. सिमला मिरची
लाल, हिरवी, पिवळी अशा वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरच्या कापून प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. चुकूनही ओल्या कपड्यात बांधून ठेवू नका.
१०. भेंडी
भेंडीची भाजी चिरण्यात बराच वेळ जातो, मुलांना डब्यात ही भाजी द्यायची असल्यास सकाळी घाई होते. म्हणून ही भाजी रात्रीच चांगली धुवून, पाणी सुकवून, कापून नेटबॅगमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
११. टोमॅटो आणि वांगं कधीही आधीपासून चिरून फ्रिजमध्ये ठेवू नका. ते खाण्यालायक राहत नाहीत. असे केल्यास त्यातील ओलावा सुकून जातो. म्हणून या भाज्या आयत्या वेळीच चिराव्या.
१२. नेहमी मसालेदार भाजी बनवण्याऐवजी अधीमधी कमी मसालेदार भाजी बनवा. मुलांच्या आरोग्याचा विचार करून रंगीत मिक्स भाजीही बनवता येते. मिक्स भाज्या उकळवून त्यात हलकासा चाट मसाला आणि मीठ घालून स्वादिष्ट बनवता येते. यामुळे भाज्यांतील सर्व पोषकतत्वे मिळतील आणि मुलं आवडीने या भाज्या खातील.