सध्याचे दिवस ऋतुबदलाचे आहेत. अकाळी पाऊस काय पडतो किंवा कधी दिवसभर उकाडा जाणवतो अन् रात्री थंडी वाजते. त्यामुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी औषधांपेक्षा फिटनेस महत्त्वाचा आहे. फिटनेस राखाल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल… त्यासाठी या काही टिप्स.
चालत राहा
बिनखर्चाचा, सहज करण्याजोगा व्यायाम म्हणजे चालणे. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला. त्यासाठी योग्य आहे सकाळची वेळ. नाही जमले तर संध्याकाळी चाला. दोन्ही वेळेस चालाल तर सोन्याहून पिवळे. चालण्याने फिटनेस राहील व प्रतिकार शक्ती वाढेल.
उलटे चाला
आपण सरळ चालतो. त्याऐवजी मागे उलटे चालणे देखील चांगले. ही खरं तर जपानी पद्धत आहे. पण आपल्या योगाभ्यासात तिचा समावेश आहेच. हात सरळ वर करा. नंतर वळून न पाहता, तसेच 10 ते 20 पावले मागे चालत या. हीच क्रिया टाचा उंचावून करा.
योगासने करा
शरीरातील संसर्ग रोखण्याचे काम रक्तातील पांढर्या पेशी करतात. त्यांची निर्मिती छातीत असलेल्या थायमस ग्लॅन्डस् करतात. या पांढर्या पेशी सक्रीय राहण्यासाठी या ग्लॅन्डस्ची तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. ती होईल प्राणायाम आणि योगासने यांनी. चांगल्या योगा प्रशिक्षकाकडून हा अभ्यास आवडीने करा. तसं पाहायला गेलं तर सर्वच योगासने शरीरास फिट ठेवतात. पण थायमस ग्लॅन्डस् कार्यान्वित होण्यासाठी शीर्षासन, धनुरासन, मार्जरासन, भुजंगासान अधिकउपयुक्त असतात.
मसाज करा
आरोग्यदायी तेलाने संपूर्ण शरीरास मसाज करून घ्यावा. निष्णात मसाज करणार्या व्यक्तीकडून तो करून घ्यावा. त्यामुळे शरीरातील रक्तसंचार वाढतो. त्वचेचा पोत कायम राहतो. अन् मुख्य म्हणजे शरीरातील विषद्रव्ये लघवीद्वारे निघून जाण्यास
मदत होते.
भरपूर हसा
सध्याच्या तणावाच्या, धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या काळजीने वेढला असतो. त्यामुळे मनसोक्त हसण्याचे क्षण आपल्या जीवनात कमी येतात. मात्र मनमोकळेपणाने हसण्याचे मोठे फायदे आहेत. जागोजागी लाफ्टर क्लब या उद्देशानेच सुरू झाले आहेत. एकतर त्यामध्ये सामील व्हा किंवा रटाळ कौटुंबिक मालिका पाहण्यापेक्षा टी.व्ही. वर विनोदी मालिका किंवा
चित्रपट पाहा. अन्म नमुराद हसा.
नैसर्गिक पाण्यात पोहा
तुम्हाला पाण्यात पोहता येत असेल, तर फिटनेस राखण्यासाठी त्याच्याइतका उत्तम व्यायाम नाही. मात्र स्वीमिंग पूलमध्ये पोहण्यापेक्षा स्वच्छ, नितळ समुद्र; नदी किंवा तलावाच्या पाण्यात पोहा. विहिरीत पोहले तरी चालेल. कारण कृत्रिम पोहण्याच्या तलावात क्लोरीन वायू मिसळला असतो. तो अति पोहण्याने आरोग्यास मारक ठरू शकतो. अर्थात् निसर्गनिर्मित पाणलोट गावाकडेच आढळतात, हे मान्य. मग गावाकडे जाल तेव्हा या पाणलोटात हातपाय मारून पोहण्याचा आनंद घ्या.
प्रेम व्यक्त करा
दिवसातून एकदा तरी आपल्या जोडीदारास आलिंगन द्या. त्याचे चुंबन घ्या. त्याच्यावर आपले प्रेम व्यक्त करा. अन् आठवड्यातून एकदा तरी, न चुकता शरीरसंबंध ठेवा. नियमितपणे सेक्स केल्याने एकमेकांवरील प्रेमात वाढ तर होतेच, परंतु शरीर व मनास सुदृढ ठेवणारे हार्मोन्स स्रवतात. अन् आपण समाधानी व फिट राहतो.
सी व्हिटॅमिन मिळवा
ज्यांच्या शरीरात सी व्हिटॅमिन्सची कमतरता असते, त्यांची हाडे ठिसूळ राहतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सर्दीपडशे ताबडतोब होते. यावर मात करण्यासाठी संत्री, मोसंबी, केळी अशी सी व्हिटॅमिनयुक्त फळे आवर्जून खा. पालक व तत्सम हिरव्या पालेभाजीचे सूप आणि फळांचे रस अधिक चांगले.
लसूण खा
जेवणाच्या पदार्थात लसणाचा वापर करा. लसणाची चटणी, ठेचा, यांच्या नियमित सेवनाने हृदयविकारास प्रतिबंध होतो. बॅक्टेरिया आणि जंतूसंसर्ग नष्ट होतो. तसेच सर्दीपडशे दूर राहते. लसणाचे असे फायदे असल्याने फिटनेस चोख राहतो.
कोरा चहा प्या
चहा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र तो कोरा प्या. दूध नसलेला चहा घ्या. कोरा आणि ग्रीन टी यांच्यात अमिनो सिड-एल थिनाइन हे प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असल्याने मोठा
फायदा होईल.