वैवाहिक जीवनात मनं जुळली पाहिजेत, तसेच शरीरांचं मीलनदेखील झालं पाहिजे. एकमेकांच्या स्पर्शाने शरीर पुलकित झाली, तर संसारवेलीवर सुखाची फुलं डोलतील. तेव्हा ही संसारसुखातील अत्यावश्यक बाब समजून त्यासाठी आवर्जून वेळ काढा.
काही लोक म्हणतात की, संसार हा ऊन-पावसाचा खेळ आहे. तर काही लोकांचा मत वेगळं असतं. ते म्हणतात, संसार म्हणजे फुलांचा ताटवा असावा. सदैव बहरलेला, प्रसन्न. अन्य काहींना वाटते की, वैवाहिक जीवन म्हणजे एकमेकांचा हात सदैव हातात ठेवून करण्याचा प्रवास. तर सुप्रसिद्ध लेखक खलील जिब्रान म्हणतात की, आपल्या जीवनसाथीच्या नजीक राहावे, परंतु दोघांमध्ये इतकं अंतर असावं की, त्यांच्या मधून ताजी हवा खेळती राहिली पाहिजे. एकमेकांवर निःस्सीम प्रेम करावे पण एकमेकांना कोणत्याही बंधनात जखडू नका.
आपण ह्या तिन्ही गोष्टींची मोट बांधू या अन् सुखी संसाराची गुरुकिल्ली वापरूया.
लग्न झाल्यावर पहिल्या प्रथम काय केलं पाहिजे तर एकमेकांच्या कामांना महत्त्व द्या. हे भावनिक असावं. त्याच्याने होतं काय की, आपल्यासोबत आपला जोडीदार आहे, याबद्दल तो आश्वस्त होतो.
अन् कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्याची तयारी होते.
पती आणि पत्नी यांचं नातं शरीरं दोन पण मन एक असं असलं पाहिजे. त्यासाठी एकमेकांचा आदर केला पाहिजे. अन् भावनांची कदर केली पाहिजे. म्हणजे हे नातं दृढ होईल.
अलीकडे लग्नाआधी जोडप्याने एकत्र फिरण्याचा प्रघात आहे. एकमेकांना समजून घेण्याच्या उद्देशाने हे स्वातंत्र्य घेतले गेले आहे. यामध्ये तथ्य असले तरी काही गोष्टी राहून जातात. ती कमतरता लग्नानंतर भरून काढणे अगत्याचे ठरते. एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभाव अधिकाधिक समजून घ्याव्यात. आपल्या जोडीदाराकडून अधिकाधिक अपेक्षा बाळगण्यापेक्षा त्याला सुख देण्याचा प्रयत्न करावा.
समस्त मानवजातीचा मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे अहंकार! या अहंकारावर मात करा. अहंकारापोटी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा अट्टाहास करू नका. त्यामुळे आपापसात भांडणे होतील. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर भांडण उकरून काढण्यापेक्षा जोडीदाराशी चर्चा करा. त्यातसुद्धा एकमेकांमध्ये तणाव वाढवतील, असे मुद्दे उपस्थित करू नका.
घरातील कामांच्या संदर्भात होणारी भांडणे टाळावी. मी हे करतोय्, मग तू ते केलंच पाहिजे,असं बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. आपण काही कामं करतो म्हणजे एकमेकांवर उपकार करतो, ही भावना नसावी. एकमेकांची सोय बघून कामे वाटून घ्यावीत. ती आपली जबाबदारी आहे, असं समजावं.
आजकाल पती-पत्नी दोघेही कामावर जातात. कामाच्या ठिकाणी उशिरापर्यंत थांबून कामं उरकावी लागतात. असं पत्नीच्या बाबतीत घडत असेल तर ती घरी येईस्तोवर पतीने स्वयंपाकाचा भार उचलावा. त्याचप्रमाणे मुलांना शाळेत पोहचविणे, त्यांचे शॉपिंग करणे, ही जणू पत्नीची जबाबदारी समजली जाते. पत्नीला वेळ नसेल तर ही कामे पतीने करायला काहीच हरकत नाही. त्याबाबत कमीपणा वाटून घेऊन नये.
बदलत्या जीवनशैलीमुळे पती व पत्नी दोघेही कामासाठी भागदौड करत असतात. कामाच्या धबडग्यामुळे जीवनातील मौजमजा करता येत नाही., अशी त्यांची तक्रार असते.
ही वेळ येऊ देऊ नका. सुट्टीच्या दिवशी कामात गुंतून न राहता एकमेकांसाठी वेळ द्या. एकत्र जरूर हिंडा. शॉपिंग, जॉगिंग, सिनेमा पाहणं, हॉटेलात जाणं या गोष्टींचा आनंद घ्या. त्यातसुद्धा आपल्याला जे आवडते त्याचाच हट्ट न धरता, साथीदाराची आवडनिवड जपा.
काही घरात दोघांपैकी एकाला फिरतीची नोकरी असते किंवा उद्योगधंद्यानिमित्त सतत फिरतीवर राहावे लागते. त्यामुळे दुसर्याला एकटेपणा भोगावा लागतो. कंटाळा येते. त्याचा कंटाळा व एकटेपणा दूर करण्यासाठी, व्यवस्थित नियोजन करून, वर्षातून किमान दोनदा तरी दोघांनी एकत्र पर्यटन करावे. संसारात सुख टिकून राहण्यासाठी एकमेकांसाठी वेळ काढणे आवश्यक असते.
वेळेअभावी किंवा कामाच्या व्यस्ततेपायी कित्येकदा असे घडते की, पती-पत्नीला एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. अनपेक्षित असा अबोला दोघांत निर्माण होतो. अबोल्यातून दुरावा निर्माण होतो. असा दुरावा सुखी संसारात धोक्याची घंटा वाजवू शकतो. ते टाळण्यासाठी एकमेकांशी बोलाचाली कायम ठेवा. त्यात खंड पडू देऊ नका. घरातल्या, ऑफिसातील गोष्टी एकमेकांशी शेअर करा. त्यामुळे नात्यात पारदर्शकता राहते.
पती-पत्नींमध्ये बेबनाव होण्याचं एक कारण पैसा असू शकतं. सर्वसाधारणपणे असं दिसून येत की, दोघांपैकी एकजण उधळ्या स्वभावाचा असतो. तर दुसरा पैसे राखून ठेवणारा असतो. विनाकारण पैसे खर्च करू नये, असे एकाला वाटत असते. तर दुसरा बेगुमानपणे पैसे उधळत असतो. या विसंगतीमुळे भांडणं होतात. पैशांच्या खर्चावरून मतभिन्नता असली तरी निर्णय घेताना संसाराच्या हिताचा घ्यायला हवा. भांडून तोंड विरुद्ध दिशेला ठेवण्यापेक्षा सामोपचाराने तंटा सोडवायला हवा. भविष्याचा विचार करून खर्चाला आवर घातला पाहिजे. अन् ते उधळ्या जोडीदाराला पटवून दिले पाहिजे.
पैशांचा असो की, अन्य तक्रारींबद्दल असो, निर्णय कुण्या एकाच्याच मर्जीनुसार घेता कामा नये. वैवाहिक जीवनाचे रथचक्र सुरळीत चालण्यासाठी दोघांचेही एकमत असायला हवे. म्हणून निर्णय एकतर्फी घेऊ नये. दोघांच्याही मताने घरातील महत्त्वाच्या बाबींवर निर्णय व्हायला हवा. कुटुंब मोठे असेल, अन् समस्या सर्वस्पर्शी असेल तर घरातील इतर लोकांना देखील निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतले पाहिजे.
काही घरात असे आढळून येते की, जोडीदाराच्या घरातील माणसांबद्दल अनादर दाखविला जातो. काही पती पत्नीच्या माहेरच्या माणसांबद्दल आकस बाळगून त्यांचा तिरस्कार करतात. तर काही पत्नी पतीच्या कुटुंबातील माणसांबद्दल तशीच तिरस्काराची भावना बाळगतात. असं करू नये. प्रत्येकाला आपली माणसं प्रिय असतात नि त्यांचा अनादर केलेला खपत नाही. हे ध्यानात ठेवून माहेर-सासरच्या माणसांबाबत आपले आचरण चांगलेच ठेवावे. अन्यथा पती-पत्नीच्या नात्यात बिघाड निर्माण होऊ शकतो.
कामाच्या दडपणाने आरोग्य बिघडते. त्याचप्रमाणे संसाराची घडी विस्कटते. नोकरी किंवा व्यवसायाच्या रगाड्याच जोडीदाराचे, मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यांचा विसर पडतो. विसरणारा सुखी असतो, तर त्याची माणसे दुःखी होतात. तेव्हा कामाचे दडपण घराबाहेर ठेवावे,
अन् घरात आल्यावर शरीराने व मनाने घरचे व्हावे. जोडीदाराचे, मुलांचे वाढदिवस यांचे विस्मरण होऊ देऊ नये. एकत्रितपणे,आनंदाने ते साजरे करावेत.
संसार वेल कशी बहरेल? (How To Gain Household Pleasures?)
Link Copied