आईबाबा दोघेही नोकरी करणार्या आजच्या जीवनशैलीत पाळणाघर ही गरज बनलेली आहे. यामुळेच नोकरी करणार्या महिलांचा पाळणाघर हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पाळणाघरातल्या यशोदामाईकडे आपल्या लहानग्याला सोपवताना मनात कोणताही संभ्रम राहणार नाही असंच पाळणाघर निवडावं.
श्रीकृष्णाची यशोदामाई… हे नातं याच संबोधनानं अवघ्या विश्वात रूढ झालं. वसुदेव-देवकीने मोठ्या विश्वासाने कृृृष्णाला गोकुळी पाठवले आणि तिच्या विश्वासाला तडा न देता नंद-यशोदेनेही कृष्णाचे मायेने पालनपोषण केले. या कथेचा संदर्भ काळानुरूप बदलला आहे. आता घराघरातील आईबाबा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू लागले आणि पाळणाघराच्या रूपातील आधुनिक यशोदा त्यांच्या बाळांचं संगोपन करण्यास पुढे सरसावल्या आहेत
मागील दोन-तीन पिढ्यांपासून स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आणि त्यांच्या गैरहजेरीत मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणारी पाळणाघरं अस्तित्वात आली. आपल्या लहानग्यांना विश्वासू व्यक्तीकडे सोपवून आईवडिलांना घराबाहेर निर्धास्त राहता येते. काही घरांमध्ये सासूसासरे वा इतर व्यक्ती असल्यास याबाबतचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु घरी कोणीच नसल्यास मुलांसाठी पाळणाघर वा डे-केअर सेंटरशिवाय पर्याय राहत नाही.
आपल्या लहानग्याला पाळणाघरात ठेवायचं ठरवल्यापासूनच खरं तर आईच्या जिवाची घालमेल सुरू होते. मग सुरू होते चांगल्या पाळणाघराची शोध मोहीम. मुलांच्या योग्य संगोपनाच्या दृष्टीनं पाळणाघर निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
पाळणाघर हे मुलांचं दुसरं घर असतं.दिवसातील अर्ध्याहून जास्त वेळ मुलं पाळणाघरातच असतात. येथेच त्यांच्यावर बर्यावाईट गोष्टींचे संस्कार होतात. त्यांच्या सवयी विकसित होतात. म्हणूनच पाळणाघराची निवड विचारपूर्वक होणे आवश्यक आहे.
मुलांची सुरक्षा
तुमच्या लहानग्याला पाळणाघरात सोपवण्यापूर्वी तो तिथे कितपत सुरक्षित आहे, हे पाहून घ्या. काही पाळणाघरांबाबत वाईट माहिती वर्तमानपत्रात छापून आल्याने पालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सजग असणं आवश्यक आहे. मुलांना वाईट वागणूक देणं, त्यांना घाबरवणं, मारणं तसेच त्यांच्याकडून स्वतःचं काम करून घेणं अशा गोष्टी काही पाळणाघरं करीत असत. तुमची मुलं अशा गोष्टींचा बळी ठरू नयेत याकरिता, मुलांच्या सुरक्षिततेचा योग्य विचार करून पाळणाघर निवडा.
पाळणाघराची अवांतर माहिती
पाळणाघरात मुलाला दाखल करण्याआधी त्याची अवांतर माहितीही जाणून घ्या. पाळणाघर कधी सुरू झाले? ते चालवणारे लोक कसे आहेत? त्यांच्या विरोधात पोलिसात केस वगैरेे दाखल नाही ना? मुलांशी वाईट वर्तणूक केल्याचं ऐकिवात नाही ना? अशा सर्व गोष्टींबाबत व्यवस्थित जाणून घ्या.
मुलांची आणि केअरटेकरची संख्या
पाळणाघरात किती मुलं आहेत, हेदेखील माहिती करून घेणं गरजेचं आहे. मुलांना सर्व सुविधा योग्यरीत्या मिळण्यासाठी पाळणाघरात मुलांची व केअरटेकरची संख्या योग्य आहे का, हे पहा. अनेकदा मुलं जास्त आणि केअरटेकर कमी अशी स्थिती काही पाळणाघरांमध्ये दिसून येते.
पाळणाघराची वेळ
आपल्या कामाचं स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार पाळणाघर शोधा. काही पाळणाघरांची वेळ ठरलेली असते. ऑफिस दूर असणार्या पालकांसाठी ही वेळ सोयीची नसते. तसेच कधी कधी काही कारणास्तव पाळणाघरातून मुलांना नेण्यास उशीरही होऊ शकतो. तुमच्या या अडचणींना समजून घेणारे हे पाळणाघर आहे का, हे तपासून घ्या.
पाळणाघराचा सुट्टीचा दिवस
बहुतेक सर्व पाळणाघरे रविवारी बंद असतात. परंतु काही पालकांना रविवारी सुट्टी असतेच असे नाही. आठवड्यामधील इतर कोणत्याही दिवशी सुट्टी असणार्या पालकांना असे पाळणाघर गैरसोईचे असते. मात्र काही पाळणाघरात अतिरिक्त शुल्क घेऊन वा समजून घेऊन रविवारच्या दिवशीही मुलांना सांभाळले जाते. तेव्हा या गोष्टी प्रथम ठरवून घ्या.
पाळणाघराचे शुल्क
काम करणार्या पालकांच्या गरजेमुळे पाळणाघर हा व्यवसाय बनला आहे. काही पाळणाघरे पालकांच्या अडचणी व गरजांचा अनावश्यक फायदा घेतात. पाळणाघराच्या शुल्काबाबत कोणतीही नियमावली नसल्यानं त्यांना हवे तेवढे शुल्क पालकांकडून घेतले जाते. तेव्हा पाळणाघर शोधताना एकाच पाळणाघरावर अवलंबून न राहता इतर ठिकाणीही चौकशी करा. तुमचं बजेट, सुविधा आणि गरजेनुसार योग्य पाळणाघराची निवड करा.
पाळणाघराचे अंतर
पाळणाघर तुमच्या घरापासून आणि मुलाच्या शाळेपासून मध्यावर असणं जास्त सोयीस्कर असतं. मात्र अगदी असंच पाळणाघर मिळणं मुश्कील असतं. परंतु पाळणाघर किमान तुमच्या घरापासून जवळ असावे. तसेच मुलं शाळेत जात असल्यास त्यांच्या शाळेची बस पाळणाघर असणार्या क्षेत्रात जाते की नाही हेही पाहावे. शिवाय मुलाला घरी आणताना, पाळणाघरात जाणं आणि पुन्हा घरी येणं, यासाठी जास्त वेळ जाणार नाही, ही बाब लक्षात घेऊन पाळणाघर निवडा.
आपत्कालीन सुविधा
पाळणाघराची निवड करताना ते तुमच्या मुलासाठी सुरक्षित असावं अशी अपेक्षा आपण बाळगतोच. याबरोबरच पाळणाघरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे मुलांची काळजी व संरक्षण करता यावे, यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हेही पाहायला हवे. मुलं अचानक आजारी पडल्यास वा अपघात झाल्यास मुलांच्या औषधोपचाराबाबत कोणत्या सुविधा आहेत, जवळच्या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक आहेत की नाही, हे पाहण्याची खबरदारीही घ्यावी.
पाळणाघराबाबत वरील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन त्याची निवड करावी. याबरोबरच पाळणाघर साधारण कसं असावं याबाबतही छोट्या छोट्या गोष्टींची दखल घ्यावी.
पाळणाघर चालविणारी व्यक्ती सुशिक्षित असावी, त्यांनी पाळणाघरातील सर्व मुलांकडे लक्ष द्यावं, पाळणाघराची खोली मोकळी आणि हवेशीर असावी, अशा पालकांच्या काही माफक अपेक्षा असतात. याबरोबरच आपलं मूल इतका वेळ वेगळ्या वातावरणात वाढताना त्याच्यावर कोणते संस्कार होत आहेत, याबाबतही पालकांची काळजी वाढते. मुलाची दिनचर्या सांभाळताना पाळणाघरातून आपल्या मुलावर कोणतं मूल्यशिक्षण दिलं जातं, याबाबत पालक म्हणून दक्ष असावं. अनेक पाळणाघरं मुलांबाबत प्रयोगशील असतात. पाळणाघरातच मुलांवर संस्काराची रुजवात होण्यास सुरुवात झालेली दिसून येते. बालसंगोपन आणि आधुनिक पद्धतीचं ज्ञान असणारी पाळणाघरं मुलांच्या संस्कारात विशेष भूमिका बजावतात. पाळणाघर निवडताना सर्व बाबतीत अधिकउण्याचा विचार करूनच निवड करावी. मात्र सर्व पाळणाघरांबाबत पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहता पारदर्शकता ठेवावी. अनेक पाळणाघरं त्यांचे चांगले संस्कार, ममता आणि वर्तणुकीबद्दल प्रसिद्ध आहेत.
घराचा उंबरठा ओलांडल्यापासून सायंकाळी पाळणाघर गाठेपर्यंत आईच्या जिवाची होणारी घालमेल जाणून मुलांना फुलाप्रमाणे जपणारी ही पाळणाघरं असतात. त्यांच्याशी आपलं विश्वासाचं, मैत्रीचं नातं तयार होतं. भावनिक बंध तयार होतो. आईच्या गैरहजेरीत तिच्या ममतेनं मुलांचे संगोपन करणारे अनेक आधुनिक नंद-यशोदा तुम्हाला या पाळणाघरात भेटतील. मुलांच्या जडणघडणीत ह्या नंद-यशोदांचाही मोलाचा वाटा आहे.
मुलांना पाळणाघरात सोडताना खालील गोष्टी नियमितपणे त्यांच्या बॅगेत असाव्यात.
खाऊ : पाळणाघरात मुलांना खाऊ दिला जातोच. तरीही आपल्या मुलाला आवडणारा वेगवेगळा खाऊ रोज टिफीनमध्ये द्या. मुलांना फळं आणि स्वतः बनवलेले पदार्थही द्यावेत. यामुळे मुलांना आवडीनं खाण्याची सवय लागते.
खेळणी : मुलं स्वतःच्या खेळण्यांबाबत जास्त पझेसिव्ह असतात. म्हणूनच पाळणाघरात कितीही खेळणी असली तरी घरातील एक तरी खेळणं त्याच्या बॅगेत ठेवावं.
कपडे : मुलाच्या बॅगेत रोज एक कपड्याचा जोड ठेवावा. यामुळे कपडे भिजले वा खराब झाले तर लगेच बदलता येतील. याशिवाय त्याचा छोटासा टॉवेल, नॅपकीन आणि रुमालही द्या.
औषधं : मुलाच्या बॅगेत औषधांचा एक इमर्जन्सी कीट ठेवावा. त्यावर कोणती औषधे कशासाठी आहेत, हे लिहिलेले लेबल लावावे.
अत्यावश्यक संपर्क : एका वहीत आई-बाबा व जवळच्या नातेवाइकांचा संपर्क क्रमांक व पत्ता, फॅमिली डॉक्टरांचा संपर्क क्रमांक व पत्ता, मुलाला कोणती अॅलर्जी असल्यास त्याबाबत माहिती, इत्यादी बाबी नमूद करून ही वही कायमस्वरूपी मुलाच्या बॅगेत ठेवावी.