Close

मुलांचे हट्ट कितपत योग्य? (How Appropriate Is The Insistence Of Children?)

आई, मला राहुलसारखा कंपास बॉक्स हवाय. तरच मी शाळेत जाईन. आणि तो मिळेपर्यंत मी जेवणार नाही, असे किस्से आणि हट्ट घराघरात चालतात. ह्याला कसं सामोरं जायचं हे आई-वडीलांसमोरील मोठे आव्हान असते.


मित्रांकडून होणारा दबाव (प्रीयर प्रेशर)
मुलांवर कोणत्याही वयात मित्रांकडून होणार्‍या दबावाचा परिणाम होतो. परंतु लहान वयात ते लवकर याचे बळी होतात. लहान वयात काही कळत नसल्याने आपल्या मित्र-मैत्रिणींसारखे मुलांना व्हायचे असते. त्यामुळे त्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत अगदी तशाच त्यांना हव्या असतात.

योग्य अयोग्याची जाणीव
मुलं लहान असल्याने त्यांना योग्य अयोग्याची जाणीव नसते. प्रीयर प्रेशर हे मुलांसाठी योग्य नसून त्याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. कारण त्यामुळेच मुलांची विचार करण्याची पद्धत बदलते.

मित्रांच्या दबावापासून संरक्षण
लहान मुलांचे मन नाजूक असते. कोणत्याही गोष्टीचा त्यांचा मनावर लगेच परिणाम होतो. मग या मित्रांकडून येणार्‍या दबावापासून मुलांचे संरक्षण कसे करायचे? अगदी सोपे मार्ग आहेत.

प्रेमाने समजवा
मुले क्षणात खूश तर क्षणात नाराज होतात. त्यामुळे प्रेमाचाही त्यांच्यावर परिणाम होतो. प्रेमाने सांगितलेलं ते चटकन ऐकतात. उदा. मुलाने जर प्रश्‍न केला की, माझ्या मित्राकडे मोठी कार आहे. आपल्याकडे लहान आहे, असं का? तर त्यांचे कुटुंब मोठे आहे. आपले लहान असे मुलाला सांगा.

वस्तूंबद्दल आदर व प्रेमभावना
मुलं ज्या वातावरणात राहतात तशीच होतात. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्याबद्दल आपल्याला प्रेम व आदर असायला हवा, असे मुलांना शिकवा. मुलं आपलंच अनुकरण करतात. त्यामुळे मुलांसमोर स्वतःचे घर, कार किंवा कोणत्याही बाबतीत इतरांशी तुलना करू नका. त्याचा नकळत परिणाम मुलांवर होतो व आपल्याकडे असलेल्या गोष्टी चांगल्या नाहीत असे त्यांना वाटू लागते.

असुरक्षिततेची भावना काढा
काही वेळेस शाळेत गेल्यावर शांत स्वभावाच्या मुलांना आपण इतरांपेक्षा कमजोर आहोत, असे वाटू लागते. काही मुलं शाळेत जायला घाबरतात, टाळतात. अशावेळी त्यांना ओरडू-मारू नका. तर प्रेमाने समजवा. त्यांचे मनोबल वाढवा. त्यांना बहादुरीच्या गोष्टी सांगा. मुलाच्या अभ्यासाचे, कलेचे, चांगल्या गुणांचे कौतुक करा. त्यामुळे शाळेत देखील मुलं आत्मविश्‍वासाने वावरतील.

मित्रांकडून होणार्‍या प्रभावाचे धोके
लहान मोठे हट्ट ठीक आहेत. पण हे लहान हट्ट पुरवता पुरवता मुलं मोठ्या मागण्या करू लागतात व त्या न पुरवल्यास वाईट मार्गाचा अवलंब करू शकतात. मोठ्यांचे न ऐकणे, खोटे बोलणे आणि हळूहळू वाईट सवयींना बळी पडणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच मुलांची काळजी घेणे व त्यांना ह्या तणावापासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांचा सल्ला
मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, हे जाणून घ्या.
मुलांना योग्य अयोग्य यातील फरक समजवून सांगा.
आपल्या वस्तूंचा आदर करायला शिकवा.
प्राथमिक शाळेत असेपर्यंत मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या.
दिवसभरात काय केलं हे मुलांना विचारा. त्याचबरोबर त्याला इतका विश्‍वास द्या की न विचारता मुलं तुम्हाला सगळं सांगतील.
चुकून पण आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी किंवा त्याच्या मित्रांशी करू नका.
मस्करीतही आपल्या मुलाची निंदा दुसर्‍या मुलांसमोर करू नका.
घरातील वातावरण शक्य तितकं प्रसन्न, खेळीमेळीचं ठेवा. त्यामुळे आपले कुटुंब चांगले असल्याची जाणीव त्यांना होईल.

Share this article