नोकरी करीत असताना माझं काम, कामाचा उरक, नेटकेपणा, कामावर जीव ओतून करण्याची माझी पद्धत बघून माझ्यावर खूश होऊन आप्पासाहेबांनी माझ्या आईवडिलांसमोर, यापुढे ही माझीच मुलगी समजून नंदिनीचं पुढचं सर्व शिक्षण आणि लग्नही करून देण्याचा प्रस्ताव ठेवला.
नेहमीसारखं सहा पंचवीसला देशमुख गार्डनमधून मॉर्निंग वॉक संपवून निघणारी नंदिनी घरी निघाली. सहज तिने मनगटावरील घड्याळात बघितले, बरोबर सकाळचे सहा पंचवीस झाले होते. मनातून खूष झाली ती. आजकाल घड्याळात न बघतासुद्धा बरोबर त्याच वेळेत एखादं काम पुरं करण्याची सवय तिला सुखावून गेली. चिंतामणराव देशमुखांचा पुतळा उजव्या बाजूला ठेवून चालताना, त्या गार्डनमध्ये कधीही न दिसणारा पण ओळखीचा चेहरा तिला दिसला. तिला टाळायचं की कसं, असा विचार मनात येताच त्याच नवीन चेहर्याने अगदी विजयी मुद्रा करून नंदिनीला हाक मारली. आता मात्र तिला थांबणं भागच होतं.
‘नंदिनी तू इथे?’ श्यामल.
नंदिनी म्हणाली, ‘हो. म्हणजे?’
तिला तोडतच, ‘दूध न्यायला आली होतीस वाटतं! पण सकाळीच गार्डनमध्ये कशी? दूध तर गेटच्या बाजूलाच मिळतं!’ श्यामल म्हणाली.
‘म्हणजे… मी रोज…’ परत नंदिनीला थांबवत श्यामल म्हणाली, ‘येत असशील ग रोज दूध न्यायला. पण गार्डनमध्ये कशी? माझं बघ मी आजपासून जॉगिंग चालू केलंय या गार्डनमध्ये. नवीन आलोय ना आम्ही इथे मुलुंडला. झाले दोन-तीन दिवस.’
नंदिनीने तिला न्याहाळले. पायात बूट, जॉगिंग सूट. सगळा नवीन स्पोर्टस् ड्रेस.
‘अगं, बॉडी कंडिशनमध्ये ठेवायची म्हणजे सगळं करावं लागतं असो. तू मात्र तशीच राहिलीस हं. तुझ्यात काहीच बदल झाला नाही. हायस्कूलला होतीस तशीच आहेस. मुलुंडला राहतेस असं ऐकलं होतं. आज प्रत्यक्षच दिसतेयस. कुठे राहतेस?’ श्यामल.
‘मी मुलुंड वेस्टला. निर्मल…’ परत नंदिनीला तोडत श्यामल म्हणाली. ‘मी तो पूर्वेला टॉवर दिसतोय ना? तो… आकृती नाव त्याचं. आठव्या मजल्यावर फ्लॅट आहे. ये ना कधी. पण आज नको. आज माझा इंटरव्ह्यू आहे मॅनेजरच्या पोस्टसाठी… अकरा वाजता… वेळेत जायला हवं. कंपनीच्या जनरल मॅनेजरसमोर इंटरव्ह्यू म्हणजे… पहिली गोष्ट म्हणजे वेळेवर हजर असणं… बाकीचं मागाहून… फार शिस्तप्रिय आहे ती जनरल मॅनेजर. सगळेजण घाबरून असतात तिला.’
‘खाष्ट आहे वाटतं?’
‘नाही. खाष्ट नाही. पण सर्व गोष्टी वेळेवर झालेल्या आवडतात तिला. मला आठवतं नंदिनी, हायस्कूलला असताना तू पण तशीच होतीस. शिस्तीच्या बाहेर तू स्वतःहून काहीही केलेलं आठवत नाही. तुझ्या कोणत्याही गोष्टीला कोणी हात लावलेला चालायचं नाही तुला. कोणी हात लावलाच तर तुला ते बरोबर कळायचं. मग तू त्या व्यक्तीला चांगलंच फैलावर घ्यायचीस. अजूनही तशीच आहेस का? चेहर्यावरून तरी तशीच वाटतेस.’ असं म्हणून ती तिथंच जॉगिंग करायला लागली.
नंदिनीने नुसतंच स्माईल दिलं. बोलली काहीच नाही. ‘नंदिनी, कधी कधी एस.एस.सी.ला असलेल्या सर्व मुला-मुलींची आठवण येते. तुझ्या आठवणीने मात्र मन पुढे जात नाही. तिथेच रेंगाळते… सैरभैर होते. वाटतं, एवढ्या हुशार आणि शिस्तप्रिय व्यक्तीला पैशाचं पाठबळ मिळालं असतं तर… पण नाही. एस.एस.सी. नंतर तुला नोकरी करावी लागली. माझ्या भावासाठी तुझं प्रपोजल घेऊन तुमच्या घरी माझे वडील गेले होते. परंतु तुमच्याकडून निश्चित असं काहीच कळलं नाही. म्हणून थोडीशी चौकशी केली वडिलांनी. तेव्हा कळलं… तुला कोणीतरी दत्तक घेतलंय म्हणून. हे ऐकून वाईट वाटलं. कसंतरीच वाटलं. एवढ्या मोठ्या वयात कोणी दत्तक गेल्याचं… ओळखीचं असं प्रथमच ऐकत होते मी. अगं माझ्या भावाशी लग्न झालं असतं तर गाडीने फिरली असतीस. भाऊ मोठा ऑफिसर आहे एका कंपनीत. फ्लॅट आहे रहायला. आता ते जाऊ दे. तुझे मिस्टर काय करतात?’
‘ते एका कंपनीचे…’
नंदिनीला अडवत ‘असू देत ग. माझे मिस्टर फार मोठ्या पोस्टवर आहेत. सी.ई.ओ. आहेत. फार रुबाब आहे त्यांचा तिथे. माझ्या नवर्याशिवाय पान हलत नाही कंपनीत, म्हण ना. प्लॅनिंग, प्रॉडक्शन, मार्केटिंग सर्व ह्यांच्या विचाराने. फार विश्वास आहे मालकाचा. त्यांनीच आम्हाला पन्नास लाख रुपये लोन दिलं मुलुंडला फ्लॅट घ्यायला, ऑफिस जवळ पडावं म्हणून. क्लासमेट ना ते… म्हणजे कंपनीचे सध्याचे मालक आणि माझे मिस्टर. तीन महिन्यांपूर्वीच मिस्टरांनी ही कंपनी जॉईन केली. एका इंटरनॅशनल मिटींगमध्ये पहिल्यांदाच त्यांची भेट झाली कॉलेज सोडल्यानंतर. मालकांनीच ऑफर दिली. आता मीही त्याच कंपनीत इंटरव्ह्यूला चाललेय आज. मिस्टर म्हणालेत मालकांची मिसेसच आहे जनरल मॅनेजर.‘ श्यामल बोलत होती आणि नंदिनी विचार करीत होती. म्हणजे मला कोणीतरी दत्तक घेतलंय, इथपर्यंतच ह्या लोकांना माहीत झालेलं दिसतंय. नोकरी करीत असताना माझं काम, कामाचा उरक, नेटकेपणा, कामावर जीव ओतून करण्याची माझी पद्धत बघून माझ्यावर खूश होऊन आप्पासाहेबांनी माझ्या आईवडिलांसमोर, यापुढे ही माझीच मुलगी समजून नंदिनीचं पुढचं सर्व शिक्षण आणि लग्नही करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. एम.कॉम. नंतर एम.बी.ए. झाल्यावर आपल्या पुतण्याबरोबर माझे लग्न करून दिले आणि आज मी त्यांच्याच कंपनीत जनरल मॅनेजर आहे. आमची टी. वॅटसन कंपनी कॉर्पोरेट जगात एक आश्चर्य म्हणून सध्या गणली जाते. ह्यापैकी या लोकांना काहीच माहिती दिसत नाही. स्वतःच्या नवर्याचा पण तिला अभिमान वाटला. आपल्या मित्राला त्याने स्वतःच्या कंपनीत काम करण्याची ऑफर दिली, पण माझ्याबद्दल मात्र त्याला काहीच सांगितलेलं दिसत नाही. नंदिनीला हे पण आठवलं. श्री. भाटकरांना आपल्या कंपनीत आपल्या नवर्यानं हल्लीच आणलं आणि इथे फ्लॅट घ्यायला पन्नास लाख रूपये लोन दिलं. म्हणजे ही मिसेस भाटकरच असणार आताची. आज इंटरव्ह्यूला येणार्यांमध्ये एकच स्त्री उमेदवार होती. तिने तिचा बायोडेटा आठवायचा प्रयत्न केला.
‘मी काय विचारतेय नंदिनी?‘ श्यामलने विचारले.
‘काय ते?‘ भानावर येत नंदिनीने विचारले.
‘अग मी इथे मॅनेजर म्हणून सिलेक्ट झाल्यावर देईन हो तुला नोकरी ह्याच कंपनीत. ही टी. वॅटसन कंपनी फार चांगली आहे. बरं तू जा आता उशीर होतोय मला.‘ श्यामल म्हणाली.
असं म्हटल्याबरोबर नंदिनी जायला लागली. नंदिनीला तिचा बायोडाटा आठवला. बायोडाटा आठवल्याबरोबर नंदिनी फार खूष झाली.
‘अग, इंटरव्ह्यूसाठी गुड विशेस् तर देशील?‘ श्यामल म्हणाली.
‘अहं! मुलाखतीनंतर अभिनंदन करेन.’ नंदिनी म्हणाली.
‘ठीक आहे, केव्हा भेटशील?’ श्यामलने विचारले.
‘आजच. श्यामल, आताची तू श्यामल भाटकर ना? बी.ए., एम.बी.ए. इन एच. आर.? सात वर्षांचा अनुभव. तुझे मिस्टर भास्कर भाटकर, सी.ई.ओ.’ नंदिनीने विचारले.
श्यामल तिच्याकडे आश्चर्याने बघू लागली. ‘तुला कसं कळलं?’ श्यामलने विचारलं.
‘श्यामल, मी त्याच कंपनीत आहे.’ नंदिनी म्हणाली.
‘हां! समजलं. रिक्रूटर असशील. त्यामुळेच ही सर्व माहिती. परवाच मी माझा रिझ्युम पाठवला होता… मॅनेजरच्या पोस्टसाठी.’
नंदिनी काहीच बोलली नाही. तिच्या मनात आलं. ‘श्यामल, मघाशीच तू म्हणालीस मी शारीरिकदृष्ट्या काहीच बदलली नाही म्हणून. तू शारीरिकदृष्ट्या बदललीस पण बाकी मूळ स्वभावाप्रमाणेच राहिलीस. हायस्कूलला असतानासुद्धा तशीच होतीस. आताही तशीच.’
‘मी भेटेन तुला इंटरव्ह्यू झाल्यानंतर, शक्य झालं तर…!‘ श्यामल.
नंदिनीने लहान मुलांसारखा हात हलवून बाय केलं. तेवढ्यात नंदिनीचा मोबाईल वाजू लागला. तिने फोन रिसीव्ह करून गाडी गेटच्या समोर आणायला सांगितली आणि परत एकदा श्यामलला हात हलवीत स्माइल देत निघून गेली. गेटसमोर रस्त्यावर एक कार उभी राहिली. श्यामल जॉगिंग करतच नंदिनी जात असलेल्या दिशेने बघत राहिली. शोफरने अदबीने कारच्या मागचा दरवाजा उघडला आणि नंदिनी त्या कारमध्ये बसून निघून गेली. विश्वास न बसणारी गोष्ट पाहून श्यामल चक्रावून गेली. तिने नवर्यास फोन केला. ‘भास्कर, मी श्यामल बोलतेय. टी. वॅटसन कंपनीत नंदिनी नावाची कोणी आहे काय? बारीकशी. उजव्या बाजूचा एक दात पुढे असलेली. मला वाटतं रिक्रूटर असावी. मी परवा रेझ्युमे पाठवला ना त्यावरून बायोडाटा आठवला तिने आणि इंटरव्ह्यू झाल्यावर मी तिला भेटेन, असं सांगितल्यावर हसतच निघून गेली. एस.एस.सी. पर्यंत आम्ही एकत्र शिकलो. घरची अतिशय गरिबी म्हणून तिने एस.एस.सी. झाल्यावर नोकरी पकडली. आहे तशीच आहे अजून. बारीक, सडपातळ. पण गेटच्या समोर शोफरने गाडी आणली आणि त्यात बसून ती निघून गेली. म्हणून मुद्दाम फोन केला तुला. आता गार्डनमध्ये भेटली ती.’
‘अग तीच ती. टी. वॅटसनची जनरल मॅनेजर सौ. नंदिनी सोमण. मुलुंड वेस्टला, निर्मल लाइफ स्टाइल, सिटी ऑफ जॉयला राहतात. शर्वरीमध्ये एक फ्लोअरच आहे त्यांचा. तिच्याकडेच आज तुला इंटरव्ह्यूला जायचे आहे.’ भास्कर म्हणाला.
‘काय?’ श्यामल किंचाळली. ‘ती टी. वॅटसन कंपनीची जनरल मॅनेजर आहे?’
‘हो. का? काय झालं?’
‘काही नाही.’ श्यामलनं मोबाईल बंद केला.
मुलाखतीस आलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती संपल्या. नंदिनी एका विशेष स्त्री उमेदवाराची वाट बघत होती. पण ती स्त्री उमेदवार… श्यामल भाटकर मात्र मुलाखतीस आलीच नाही.
- राम कोयंडे