Close

ऊन आणि पाणी (Heat And Water)


उन्हाळ्यात बहुतांश व्यक्तींना हमखास सतावणारी समस्या म्हणजे डिहायड्रेशन… अर्थात शरीरातील पाण्याची कमतरता. हे डिहायड्रेशन वांती, चक्कर येण्यापासून अगदी मृत्यूस ही कारणीभूत ठरू शकतं. म्हणूनच शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखणं महत्त्वाचं ठरतं. या निमित्ताने पाणी किती आणि कधी प्यावं याविषयी-
एखाद वेळेस आपण जेवणाशिवाय काही दिवस जिवंत राहू शकतो, पण पाण्याशिवाय अधिक काळ निभाव लागत नाही, हेच खरं. ङ्गपाणी हे जीवन आहेफ या एका वाक्यातच त्याचं अनन्य साधारण महत्त्व लक्षात येतं. अशा या पाण्याविषयी थोडं महत्त्वाचं-
कोणी किती पाणी प्यावं?
प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. यानुसार प्रत्येकाला तहान लागते, हा सरळ साधा नियम आहे. त्यानुसार योग्य वेळी व आवश्यक तेवढंच पाणी प्यावं, असं आयुर्वेदात नमूद केलं आहे.
एका संशोधनानुसार, भारतीय वातावरणातील व्यक्तीने प्रति किलो, प्रति दिन 30 मि.ली. ते 50 मि.ली. इतकं पाणी पिणं आवश्यक आहे.
इतर ऋतूच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अधिक गरज असते. त्यानुसार, उन्हाळ्यात आपल्याला वारंवार तहान लागते आणि आपण पाणीही पितो. पण तेच हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये लक्षात ठेवून किमान शरीरास आवश्यक तितकं पाणी प्यायलं जाईल, याकडे लक्ष द्यायला हवं.प्रकृतीनुसारही शरीराची पाण्याची
गरज कमी-जास्त होत असते.
वात व पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत पाण्याची गरज अधिक प्रमाणात असते. तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये पाण्याचं प्रमाण मुळातच कमी लागतं, म्हणून त्यांना तहानही जास्त लागत नाही.
वयानुरूप शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. म्हणूनच वृद्ध व्यक्तींनी आठवणीने अधिक प्रमाणात पाणी पिण्यावर भर देणंच योग्य ठरतं.
गर्भवती व स्तनपान करणार्‍या स्त्रियांनी अधिक प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.
व्यायाम करताना शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणं आवश्यक असतं. घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि त्यामुळे शरीराची कार्यक्षमताही कमी होते. म्हणूनच व्यायाम करण्यापूर्वी, व्यायाम करताना आणि व्यायाम करून झाल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. एका सर्वेक्षणानुसार, हे प्रमाण साधारणतः दर तासाच्या व्यायामासाठी
200 मि.ली. इतपत असायला हवं. व्यायाम वा खेळाच्या प्रकारानुसार हे प्रमाण कमी-जास्त करायला हवं.
अधिक श्रम करणार्‍या व्यक्तींनीही दिवसभरात योग्य वेळाच्या अंतराने योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं.
अ‍ॅसिडिटी, मलावरोध, मूळव्याध, मूतखडा अशा समस्या असणार्‍यांनी अधिक प्रमाणात पाणी प्यायला हवं. वांती, जुलाब, कॉलरा यांसारख्या समस्या जाणवत असल्यास पाण्याचं प्रमाण वाढवावं.
वारंवार लघवीचं इन्फेक्शन होत असल्यास पाणी पिण्याचं प्रमाण अधिक ठेवावं.
मूत्रपिंडाच्या काही विकारामध्ये, त्याची कार्यशक्ती कमी झालेली असते. अशा वेळी मूत्रपिंडावर ताण पडू नये, यासाठी पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवावं लागतं.
हृदयरोगांमध्येही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोजच्या पाण्याची मात्रा ठरवावी लागते. यकृताचा आजार असल्यास, डॉक्टर कमी पाणी पिण्याचा सल्ला देतात. अशा वेळी त्यांच्या सल्ल्यानेच पाण्याचं योग्य प्रमाण ठरवावं.
उच्च रक्तदाब किंवा पाय सुजण्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये.
रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात पाणी प्यायल्यास मूत्र विसर्जनासाठी वारंवार झोपेतून उठावं लागतं. हे टाळण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी काही तास पाणी पिण्याचं प्रमाण कमी करावं किंवा पाणी पिणं टाळावं.

पाणी आणि…
खरं म्हणजे, तहान भागविण्यासाठी पाणीच आवश्यक आणि पुरेसंही असतं. पण उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे शरीरातील क्षाराचं प्रमाण कमी होतं, इतरही अनेक समस्या जाणवतात. अशा वेळी पाण्यात काही विशेष औषधी गुण असलेले घटक एकत्र केल्यास उन्हाळ्यामध्ये उद्भवणार्‍या विविध समस्यांच्या निवारणास मदत होते.
घामावाटे निघून गेलेले क्षार गूळ खाल्ल्यामुळे भरून येतात. म्हणूनच उन्हाळ्यात गूळ आणि पाणी हे पेय साधं-सोपं, पण तितकंच लाभदायक ठरतं.
उन्हात फिरून घरी परतल्यावर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवून मगच पाणी पिण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. खडीसाखरेमुळे शरीराला लगेच शक्ती मिळते.
उन्हात फिरल्यामुळे तहान लागल्यास, लगेच पाणी पिऊ नये. काही वेळाने पाण्यामध्ये सातूचं पीठ किंवा साखर एकत्र करून प्यायल्यास लाभ होतो.
सातूचे पीठ पाण्यात कालवून, ते पाणी प्यायल्यास उष्माघाताचा त्रास होत नाही.
मातीच्या माठात वाळ्याची जुडी घालून ठेवल्यास, पाण्याला छान सुवास येतो आणि या पाण्यामुळे शरीराला आवश्यक असणारा थंडावाही प्राप्त होतो.
1 मोठा चमचा बडीशेप पाण्यात घालून उकळून, नंतर ते पाणी गार करा. त्यात खडीसाखर एकत्र करून, ती पूर्णतः विरघळली की गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून छान सरबत तयार होते.
चिंचेच्या पाण्यात मीठ व साखर घालून सरबत तयार करता येते.
लिंबू, आवळा, कोकम, कैरी यांसारख्या
सी-जीवनसत्त्वाने पुरेपूर आंबट फळांच्या सरबताचा प्रमाणात वापर केल्यास पचनक्रिया सुधारते
व शरीरास शक्ती मिळते.
त्याचप्रमाणे बार्ली, वाळा, बेल, चंदन, गुलाब यांच्या सरबताचे प्रमाणात सेवन केल्यास शरीरातली उष्णता कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यामध्ये धणे, जिरे, बडीशेप, तुळशीच्या बिया, सब्जा, सातूचं पीठ, खायचा कापूर, वेलची या आयुर्वेदिक द्रव्यांचा वापर करून तयार केलेली पेयंही लाभदायक ठरतात.
उन्हाळ्यात जुलाब व उलट्यांचा त्रास वारंवार होतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशा वेळी ग्लासभर उकळलेल्या पाण्यात
2 चमचे साखर व चिमूटभर मीठ घालून वारंवार प्यावं. या पाण्यात लिंबाचे काही थेंब घातले तरी चालतात.
1 लीटर पाण्यात 2 सुके अंजीर, मूठभर मनुका आणि 2 चमचे धणे घालून हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रवीने चांगले घुसळून, गाळून घ्या. हे पाणी दिवसभर थोडं-थोडं करून प्यायल्यास उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो.
काळ्या मनुकांचं पाणी तसेच आल्याचं सरबत, तुळशीच्या बिया भिजविलेलं पाणी, गुलाबजल ही पेयंही उन्हाळ्यात उपयुक्त ठरतात.

कोणी कधी पाणी प्यावं?
आम्लपित्ताचा त्रास असणार्‍यांनी सकाळी उठल्यावर लगेच ग्लासभर पाणी प्यावं.
अधिक प्रमाणात मिष्टान्न, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ किंवा मांसाहार यांचं सेवन केलं असल्यास, त्या दिवशी अधिक प्रमाण पाणी प्यावं.
जेवणापूर्वी 1 ग्लास पाणी प्यायल्यास पोटामध्ये जेवणासाठी कमी जागा राहते. परिणामी, पोट लवकर भरतं. एका संशोधनानुसार, जेवणाच्या 20-30 मिनिटं आधी 2 ग्लास पाणी पिणार्‍या व्यक्तींचं वजन इतरांच्या तुलनेत अधिक नियंत्रणात असतं.
वजन वाढवायचं असल्यास जेवणानंतर पाणी प्यावं.

पाणी थंड की गरम?
कफ प्रवृत्ती असल्यास, वारंवार सर्दी-खोकला होत असल्यास किंवा दम्याची समस्या असल्यास सामान्य तापमानाचं किंवा कोमट पाणी प्यावं.
पित्त प्रवृत्ती असल्यास, लघवीचा त्रास होत असल्यास, तसेच कृश व्यक्तींनी थंड पाणी प्यावं.
अपचन, अ‍ॅसिडिटी, आमवात, कंबरदुखी, कफाचे किंवा घशाचे विकार असल्यास, तसेच स्थूल व्यक्तींनी कोमट पाणी प्यावं.
तेलकट, तुपकट आहाराच्या सेवनामुळे तहान लागल्यास थंड पाणी गूळ घालून प्यावं.
आहाराचे सेवन अधिक प्रमाणात केल्यामुळे तहान लागल्यास कोमट पाणी प्यावं.
तापामुळे तहान लागल्यास गरम पाण्यात मुस्ता, पित्तपापडा, चंदन, वाळा मिसळून प्यावं.

योग्य प्रमाणात पाणी प्यायची सवय लागण्यासाठी काही टिप्स
स्वतःसोबत नेहमी पाण्याची बाटली ठेवा. शक्यतो त्यासाठी काचेच्या बाटलीचा वापर करा.
कामाच्या ठिकाणी किंवा घरी लगेच लक्ष जाईल अशा ठिकाणी पाण्याची बाटली किंवा ग्लास ठेवा.
दर तासाला थोडे थोडे पाणी पिण्याची सवय ठेवा. यासाठी मुद्दामहून गजर लावून ठेवता येईल.
माठात मोगर्‍याची फुलं किंवा वाळ्याची पुरचुंडी घालून ठेवल्यास ते पाणी सुवासिक होतं. असं पाणी पिण्याची इच्छाही वारंवार होते.
पाण्यात लिंबूरसाचे काही थेंब घातल्यास, पाण्याला छान चव येते. मात्र हे करताना पाणी आंबट होणार नाही, याची काळजी घ्या.
पाण्यात पुदिन्याची पाने घालून ते पाणी रात्रभर झाकून ठेवा. दुसर्‍या दिवशी ते पाणी पिण्यास घेता येईल. या पाण्यालाही छान चव येते.

Share this article