आपल्याकडे उपवास या परंपरेला आरोग्यदायी कारण आहे. श्रावणातील बदलणार्या हवामानात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. श्रावणातील उपवास करताना याचे संतुलन राखून उपवास केल्यास त्याचे लाभ होतात.
सणवार साजरे करण्यासारखा आनंद आपल्याला इतर कशात मिळत नाही. आपण नेहमी कोणते ना कोणते सण-उत्सव साजरे करीतच असतो. श्रावण महिना अशा सणांची मांदियाळी घेऊन येतो. म्हणून इतर महिन्यांपेक्षा श्रावणाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोपाळकाला, रक्षाबंधन असे अनेक सण, उत्सव या काळात आपण साजरे करतो. श्रावणातील या सणांबरोबरच विविध व्रतवैकल्येही या मासात संपन्न होतात. या व्रतांच्या निमित्ताने पूजाअर्चा, उपवास केले जातात. अशा प्रकारे विविध माध्यमातून आपल्या आजूबाजूला सात्विक वातावरण या महिन्यात राहते.
आपल्या तन व मनाच्या शुद्धतेची व्याख्या सात्विकतेशी जोडलेली आहे. ही सात्विकता पेरण्यास व्रतवैकल्यं आणि उपवास मदत करतात. अनेक व्रतांमधे उपवास हा महत्त्वाचा भाग असतो. आपल्या धार्मिक आचरणातही उपवासाला विशेष महत्त्व आहे. पण याबरोबरच आहाराच्या दृष्टीनेही उपवासाला तितकेच महत्त्व आहे. उपवास म्हणजे निराहार अथवा मिताहार घेऊन देवाच्या सान्निध्यात वेळ घालवणे. मुळात उपवास या शब्दाची फोड करताना ती उप अधिक वास अशी होते. उप म्हणजे दुय्यम. याचा अर्थ जो दिवस उपवासाकरिता योजिला आहे, त्या दिवशी दुय्यम दर्जाचे अन्न खाणे म्हणजे उपवास. उपवास या शब्दातून देवाच्या जवळ राहणे, असा लाक्षणिक अर्थ व्यक्त होतो. म्हणजे नुसतेच देवाच्या जवळ राहणे असे नव्हे तर देवाजवळ तहानभूक विसरून राहणे अपेक्षित असते. देवाची पूजा-अर्चना व्यवस्थित खाऊन-पिऊन करता येत नाही. उपवासाला भरपूर खाण्यामुळे आळस आणि सुस्ती येते. म्हणूनच उपवास करताना पूर्ण लंघन, एकभूक्त राहणे अपेक्षित आहे.
शास्त्रीय दृष्टिकोन
उपवासाला धार्मिक महत्त्व असलं तरी त्यामागे शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत. शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण उपवासामुळे कमी होतो. म्हणूनच निर्जळी वा फलाहार उपवास केला जातो. उपवास हा शरीराला निरोगी करतो. उपवासाने पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीराला दूषित पदार्थ बाहेर घालवण्यास वाव मिळतो. आपण आपल्या पोटाला कारखान्यातील यंत्रांप्रमाणे वागवतो. मात्र यंत्राला जशी आरामाची गरज असते तशी पोटालाही असते हे आपण विसरतो. आयुर्वेदात जठराग्नीला महत्त्व देण्यात येते ते त्या करिताच.
उपवासात मिताहाराबरोबरच लंघनही महत्त्वाचे मानले आहे. लंघनामुळे आपल्या शरीराला आणि मनाला फायदे होतात.
मन प्रसन्न होणे, शरीर हलके व उत्साही होणे, शरीरातील मळ बाहेर टाकला जाणे, रुची उत्पन्न होणे, भुकेच्या वेळेचा मेळ बसणे. शुध्द ढेकर येणे (कडवट-आंबट ढेकर न येणे), शारीरिक समस्या कमी होणे हे सगळे फायदे होतात. अशा प्रकारचे हे लंघन वा उपवास हे निसर्गोपचारात एक उपचार म्हणून मानले गेले आहेत. यातील प्रयोगांद्वारे उपवासाचे फायदे सिद्ध झालेले आहेत. म्हणूनच उपवासात शक्यतो फलाहार, रसाहार वा उकडलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
आहाराचा प्रभाव
आहाराचा आपल्या मनाप्रमाणेे शरीरावरदेखील प्रभाव जाणवतो. शिळे, खराब, व्यवस्थित न शिजवलेले अन्न खाल्ल्यास मनामध्ये उद्विग्नता, घृणा निर्माण होते. यामुळे अपचन, अजीर्ण, आम्लपित्त यासारखे त्रास निर्माण होतात. म्हणजेच अन्न आणि आहार यांचा खूप जवळचा संबंध आहे. याचप्रमाणे ऋतूबदल आणि आहाराचाही संबंध आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ असतो. या काळात मुळातच निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. म्हणूनच या काळात आहारविषयक पथ्य न पाळल्यास पचनसंस्थेवर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात. असे होेऊ नये याकरिता, सणावारांच्या निमित्ताने हे उपवास करण्याची संधी लाभते. मात्र खरोखरच असे होते का? तर अजिबात नाही. कारण आपण उपवासाच्या दिवशी भरपूर खातो आणि इतर वेळी पथ्य पाळण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आपल्या चयापचय क्रियेत बिघाड होतो. अशा अपथ्यामुळे शरीरात तयार झालेले दोष उत्पन्न होतात. हे दोष उपवासाने, लंघनाने कमी करण्यासाठी उपवास करून पचनशक्तीला काम करायला वाव दिला पाहिजे.
उपवासाचा हेतू
उपवास करण्यामागे मिताहार म्हणजे हलका आहार करावा, पोटाला आराम द्यावा, असा हेतू असतो. प्रत्यक्षात उपवासाला बटाटे, रताळी, साबुदाणा यासारखे पचायला जड वा वातूळ पदार्थ खाल्ले जातात. उपवासाच्या दिवशी पोटाला आधार मिळावा म्हणून कदाचित हे पदार्थ खाल्ले जात असावेत. परंतु या पदार्थांत म्हणजेच बटाटा, तूप, साबुदाणा, शेंगदाणे इत्यादींमध्ये प्रत्यक्षात जास्त उष्मांक (कॅलरीज) असतात. खरं तर उपवासाला नेमके कुठले पदार्थ खावे याबद्दल शास्त्रात काहीच सांगितलेलं नाही. पचण्यास हलके असणारे पदार्थ खावेत, असे मात्र सांगण्यात येते. परंतु उपवासाला चालणार्या पदार्थांची ही यादी पाहिली तर, एकादशी दुप्पट खाशीचा प्रत्यय आपल्याला येतो. उपवासाला चालणारे हे सगळे पदार्थ पचायला जड या श्रेणीतील आहेत. मात्र उपवासाचे पदार्थ म्हणून या पदार्थांनी आपल्या मनात घट्ट स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू पोटाला विश्रांती देणं हा असला तरी उपवासाच्या दिवशी मात्र जास्त खाल्लं जातं. उपवास निमित्तमात्र मानून उपवासातील खवय्येगिरी पाळत अशा पदार्थांवर ताव मारत उपवासही साग्रसंगीत साजरा केला जातो.
उपवासाचं खरं गमक जाणायचं तर शरीरशास्त्र जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे. हे करताना आपण खात असलेले पदार्थ आणि त्यातून मिळणारी ऊर्जा यांचा समतोल राखला जातोय की नाही, हेही पाहायला हवे. हे पाहतानाच आपल्याला उपवास करण्याची कितपत आवश्यकता आहे हेही जाणता येते. शरीरातील चयापचय क्रियेचे कार्य योग्य व्हावे याकरिता खाण्यापिण्याचे संतुलन राखण्यासाठी काही काळाकरिता योग्य पद्धतीने उपवास करणे आवश्यक आहे.