उन्हाचा दाह वाढू लागला की, काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते. अशा वेळी उन्हाळ्यातील दाह कमी करण्यासाठी कैरीचं पन्हं हा एक उत्तम पर्याय ठरतो.
आयुर्वेदामध्ये कैरीचं स्थान अनन्य साधारण आहे. कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे ती उष्णतेच्या विविध तक्रारींमध्ये उपयुक्त ठरते. मात्र नुसती कैरी खाल्ली तर ती बाधू शकते; परंतु कैर्या उकडून केलेलं पन्हं बाधत नाही, उलट प्रकृतीसाठी हितकारक ठरतं. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. अशा वेळी कैरीचं पन्हं उत्तम असतं. पन्हं प्यायल्यामुळे उन्हाचा त्रास खूपच कमी होतो.
आरोग्यदायी कैरीचं पन्हं
कैरी ही थंड प्रकृतीची असते. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचं लोणचं, मुरांबा, पन्हं अशा पदार्थांचा आहारात समावेश करणं योग्य ठरतं.
- भर उन्हातून घरी आल्यावर थंडगार पन्हं प्यायल्यामुळे थकवा निघून जाऊन, तरतरी येते.
- कडक उन्हामुळे शरीरातील सोडियम क्लोराईड आणि लोह, क्षार घामावाटे निघून जातात आणि त्यांचं शरीरातील प्रमाण कमी होतं. अशा वेळी कैरीचं पन्हं फायदेशीर ठरतं. ते डिहायड्रेशनलाही प्रतिबंध करतं.
- कैरीमध्ये असणारं क जीवनसत्त्व आणि अँटिऑक्सिडंट्स उष्णतेमुळे होणार्या तक्रारींपासून बचाव करतं. विशेषतः भोवळ आदी येण्यास प्रतिबंध करतं.
- कैरीमुळे शरीरातून टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन होण्यास मदत होते.
- कैरी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत करते.
- कैरीत मॅग्नेशियमही असतं. स्नायू शिथिल करण्यास ते मदत करतं.
- उन्हाळ्यात घोळणा फुटण्याचा त्रास होत रोखण्यास, कैरीमधील जीवनसत्त्वं मदत करतात.
उकडलेल्या कैरीचं पन्हं
साहित्य : 2 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, दीड वाटी गूळ किंवा साखर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : कैरीचा गर, गूळ किंवा साखर, मीठ आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. मिश्रण व्यवस्थित एकजीव व्हायला हवं. त्यात साधारण वाटीभर पाणी घालून पुन्हा वाटा. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.
पन्हं बनवायचं असेल तेव्हा या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार थंड पाणी एकत्र करा आणि थंडगार पन्हं
सर्व्ह करा.
टीप : कैर्या (देठ न काढता) कुकरच्या भांड्यात ठेवून उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची सालं आणि कोय काढून केवळ गर बाजूला काढून घ्या. - कच्च्या कैरीचं पन्हं
साहित्य : 2 कैर्या, चवीनुसार पिठीसाखर, पाव टीस्पून काळी मिरी पूड अर्धा टीस्पून मीठ.
कृती : कैर्या तासून अगदी बारीक किसणीने किसून घ्या. एका पातेल्यात दोन वाटी पाणी घेऊन त्यात कैरीचा कीस घाला आणि अर्धा तास भिजत ठेवा. नंतर त्यात चवीनुसार पिठीसाखर आणि मीठ एकत्र करा. हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड करत ठेवा. कैरीचं पन्हं थंडगार सर्व्ह करा.
टीप : कच्च्या कैरीत आंबटपणा अधिक असल्यामुळे त्यामुळे घशाचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मिरपूड फायदेशीर. - हे सरबत गाळूनही घेता येईल.
- कैरी किसण्याऐवजी त्याचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटूनही घेता येतील.
- हे पन्हं फार काळ टिकत नाही.
- कैरीचं जिरं-पुदिना पन्हं
साहित्य : 2 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, दीड वाटी साखर, 2 टीस्पून सैंधव, 1 टीस्पून जिरे पूड, काही पुदिन्याची पानं, चवीनुसार मीठ.
कृती : कैरीचा गर, साखर, काळं मीठ, जिरं पूड, पुदिन्याची पानं आणि मीठ मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घ्या. मिश्रण अगदी एकजीव व्हायला हवं. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना त्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी घाला आणि सर्व्ह करा.
- कैरीचं आलेदार पन्हं
साहित्य : 1 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, 2 वाटी गूळ, 1 वाटी साखर, अर्धा टीस्पून आल्याचा रस, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून वेलची पूड, काही केशराच्या काड्या.
कृती : कैरीच्या गरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. पन्हं तयार करायचं असेल तेव्हा, या आवश्यकतेनुसार थंड पाण्यामध्ये हे मिश्रण घालून एकत्र करा आणि सर्व्ह करा. - पन्हं तयार करताना…
- किमान 4 तास आधी कैरी थंड पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे कैरीला चीक असला, तर तो संपूर्ण निघून जातो.
- पन्ह्यासाठी हिरवीगार आणि टणक कैरी निवडा.
- तोतापुरी किंवा नीलम कैरी वापरता येईल.
- पन्हं तयार करताना गूळ किंवा साखर किंवा गूळ आणि साखर असा कोणताही पर्याय निवडता येईल.
- कैरीच्या गराच्या दुप्पट साखर किंवा गूळ किंवा दोन्ही समप्रमाणात असं प्रमाण घेता येईल.
- गूळ किंवा साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल. हे प्रमाण ठरवताना कैरीचा आंबटपणाही
विचारात घ्या. - आवडत असल्यास पन्ह्यामध्ये केशराच्या काड्या किंवा जिरे पूडही घालता येतील.