Close

उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासाठी तबला बनवायचे हरिदास व्हटकर : तब्बल २६ वर्षे केले एकत्र काम (Haridas Whitkar Used To Make Tabla For Ustad Zakir Hussain: Worked Together For 26 Years)

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने वाहवा मिळवणारी तबल्यावरची थाप कायमची थांबली आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात निश्चितच एक पोकळी निमार्ण झाली आहे. दरम्यान त्यांच्यासाठी तबला बनवणारे ५९ वर्षीय हरिदास व्हटकर​​​​​​, जे तिसऱ्या पिढीचे तबला निर्माता आहेत, त्यांनी पीटीआयला भावुक होत सांगितले, 'मी प्रथम त्यांचे वडील अल्ला रक्खाजी यांच्यासाठी तबला बनवण्यास सुरुवात केली. अन्‌ १९९८ पासून मी झाकीर हुसेन साहेबांसाठी तबला बनवत आहे.’

व्हटकर पुढे म्हणाले की, उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी त्यांची शेवटची भेट याच वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती. याबाबत ते म्हणाले, 'गुरू पौर्णिमेचा दिवस होता. आम्ही एका हॉलमध्ये भेटलो, जिथे त्यांचे बरेच चाहते देखील उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी नेपियन सी रोडवरील सिमला हाऊस सोसायटीतील त्यांच्या घरी गेलो. आम्ही तासन्‌तास गप्पा मारल्या.

झाकीर हुसेन यांची तबल्याबद्दलची आवड आणि परिपूर्णता यावर चर्चा करताना व्हटकर पुढे म्हणाले, 'त्यांना नेहमीच त्यांच्या तबल्याला परिपूर्ण ट्यूनिंग हवे होते. तबल्याच्या प्रत्येक लहान-मोठ्या तपशिलाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले - तो कसा बनवला आणि कधी आवश्यक आहे.

संभाषणादरम्यान व्हटकर यांनी सांगितले की त्यांनी झाकीर हुसेन यांच्यासाठी इतके तबले बनवले आहेत की ते मोजणे कठीण आहे. 'त्यांच्यासाठी बरेच तबले बनवले. त्यांची अनेक वाद्ये माझ्याकडे अजूनही आहेत. नवीन वाद्ये बनवण्याबरोबरच जुनी वाद्येही दुरुस्त करायचो. मी त्यांच्यासाठी तबला बनवला आणि त्यांनी माझे आयुष्य घडवले.

https://youtu.be/a6o3j5q83D8?si=ul7Yb1Y8AxBNnQ_5

झाकीर हुसेन यांच्याशी ते नियमित संपर्कात होते का, असे विचारले असता ते म्हणाले, 'जास्त नाही. जेव्हा नवीन तबला लागेल किंवा जुना दुरुस्त करायचा असेल तेव्हाच ते फोन करायचे. महिन्याच्या अंतराने आमचे संभाषण व्हायचे. याला नियमित संपर्क म्हणता येणार नाही.

हरिदास यांनी तबला बनवण्याची कला लहानपणापासूनच आत्मसात केली होती. त्यांचे आजोबा केरप्पा रामचंद्र व्हटकर आणि वडील रामचंद्र केरप्पा व्हटकर हेदेखील तबला निर्माते होते. १९९४ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. आता त्यांची मुले किशोर आणि मनोजही ही परंपरा पुढे नेत आहेत.

आपल्या पिढीतील महान तबलावादक मानले जाणारे झाकीर हुसेन यांचे सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात निधन झाले. आपल्या कलेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या कलाकाराच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला आणि अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत.

Share this article