पूर्वी बाळाला मांडीवर घेऊन अंगाई म्हणत निजवणारी, बाळाला कडेवर घेऊन चंदामामा दाखवीत चिऊ-काऊचा घास भरविणारी, लाडे-लाडे बालहट्ट पुरविणारी, दुडुदुडु धावणार्या बाळाच्या मागे धावणारी आई आज उंबरठ्याबाहेर पडून नोकरी करू लागलीय. आजच्या आधुनिक जगातील झगमगाटात अनेक तान्हुल्यांची अंगाई हरवून गेली आहे.
‘टॅहॅ…टॅहॅ,’ दोन महिन्यांचं ते बाळ पाळण्यात एकसारखं टाहो फोडत होतं. त्याच्या दोन्ही मांड्या इंजेक्शन दिल्यामुळे लालेलाल होऊन सुजल्या होत्या. डोस दिल्यानंतर त्याला पाळणाघरात सोडून त्याची आई कामावर निघून गेली होती. पाळणाघरामधली त्याची ती यशोदामाई आपल्या कुटुंबासाठी चपात्या बनवीत होती. आपल्या अकरा-बारा वर्षांच्या मुलीला ओरडून सांगत होती, ‘श्वेता, जरा बाळाकडे बघ गं…
मी एवढ्या चपात्या आटोपून येते.’ श्वेता मात्र आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत इतर छोट्या मुलांबरोबर खेळण्यात मग्न होती. इतक्यात त्या मुलांचा बॉल बाळाच्या पाळण्यात धप्पकन् पडला आणि ते बाळ आणखीन मोठ्याने रडू लागलं.
नेमकी त्याच वेळी मीही त्या पाळणाघरात गेले होते. ते रडणारं बाळ पाहून माझ्या हृदयात गलबलून आलं. मी त्या रडणार्या बाळाच्या जावळावरून अलगद हात फिरवला, तसं ते थोडं का होईना शांत झालं. त्याला वाटलं, जणू त्याची आई आली असावी. ते टुकूर-टुकूर केविलवाणं माझ्याकडे पाहत होतं. माझ्या डोळ्यांत टचकन पाणी तरळलं. त्या इवल्याशा जिवाला आज खरी त्याच्या आईच्या मांडीची, मायेची गरज होती. पण कुठे होती त्याची आई…? त्याला वेदना होत असतील, भूक लागली असेल… तर ते कोणाला सांगणार होतं? कोण समजून घेणार होतं त्याच्या हालचाली?
आई एवढी पाषाणहृदयी कशी असू शकते?
आजकालच्या आयांना नाइलाजास्तव म्हणा किंवा पैशांची गरज म्हणून म्हणा, घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत करावीच लागते. त्यामुळे त्यांना आपल्या बाळासाठी वेळच कुठेय?… मला राहवलं नाही. मी त्या बाळाच्या आईची चौकशी केली, तेव्हा कळलं की, त्याची आई दिवसातून केवळ दोन तासांसाठी बाळाला भेटायला येते आणि दूध पाजून निघून जाते. म्हणजे, ते बाळ चोवीस तासांसाठी पाळणाघरात?… कुठलीही आई एवढी पाषाणहृदयी कशी असू शकते, याचं मला खूप आश्चर्य वाटलं. अशाने ते मूल तिच्यापासून दुरावणार नाही का? मला प्रश्न पडला.
मी न राहवून दुसर्याच दिवशी त्या बाळाच्या आईची भेट घेतली. तिच्याशी बोलल्यावर कळलं की, त्यांनी कर्ज काढून घर घेतलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी ते दाम्पत्य कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होतं. रात्रीची ड्युटी असल्यामुळे त्यांना बाळाला वेळ देणं शक्य नव्हतं. मग मी त्यांच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली… केवळ पती, पत्नी आणि ते दोन महिन्यांचं बाळ हेच त्यांचं कुटुंब होतं. दोघांचा प्रेमविवाह असल्यामुळे दोघांचेही नातेवाईक त्यांच्याकडे येत-जात नव्हते. मला क्षणभर चीड आली. मी म्हटलं, ‘जर तुम्ही बाळाला वेळ देऊ शकत नव्हता, तर मग त्याला जन्म का दिलात? असं पाळणाघरात तडफडण्यासाठी?…’ त्या मातेच्या चेहर्यावर थोडासा अपराधीपणाचा भाव तरळून गेला, पण पुढच्याच क्षणी ती म्हणाली, ‘आम्ही आज जे कष्ट करतोय, ते आमच्या बाळासाठीच तर आहेत. त्याचं भविष्य सुरक्षित व्हावं, असं आम्हाला वाटतं.’
माझ्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. आज खरं तर त्यांच्या बाळाला आपल्या आईवडिलांच्या प्रेमळ स्पर्शाची गरज होती. ममतेचा, वात्सल्याचा डोक्यावरून फिरणारा हात त्या बाळाला सुरक्षिततेची जाणीव करून देणार होता. नुसत्या पैशांनी बाळाला भविष्यात भौतिक सुरक्षा देता येईल, पण खरंच त्या बाळाला आज या गोष्टी कळत होत्या का? अशाने आपल्या आईवडिलांशी त्या बाळाची भावनिक नाळ कधीही जुळणार का?
नातेवाईकांची ओढ मुलांना कशी वाटणार?
आज ज्याला-त्याला चौकोनी कुटुंब हवं असतं. आजी-आजोबा, काका-काकी, चुलत भावंडं, पै-पाहुणे अशी एकत्र कुटुंबातील नाती आज हळूहळू लोप पावत आहेत. जो-तो चाकोरीबद्ध जीवन जगत आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात वाहताना वाढलेल्या गरजा, महागाई यामुळे पैसा कमवणे ही काळाची गरज बनली आहे. जोपर्यंत पती-पत्नी दोघंही नोकरी करत नाहीत, तोपर्यंत ते आधुनिकतेच्या प्रवाहात टिकू शकत नाहीत. दिवेलागणीच्या वेळेला घरी परतणारे आईवडील, सणासुदीला भेटणारे आजी-आजोबा, नातेवाईक यांच्याबद्दल मुलांना तरी कशी ओढ वाटणार? आजच्या प्रॅक्टिकल जगाचे प्रॅक्टिकल संस्कार मुलांवरही होणारच की… आज चार तासांसाठी, आठ-दहा तासांसाठी मुलांचं संगोपन पाळणाघरात होत असतं. पैसे मोजले की मुलांची व्यवस्था होते आणि आजकालच्या आईवडिलांचीही मुलांच्या जबाबदारीतून सहज सुटका होते. कामाच्या व्यापात आईही विसरून जाते की तिचं तान्हुलं बाळ तिची वाट पाहतंय.
काही पाळणाघरं ‘घरच्यासारखं ठेवलं जाईल’ असा दावा करतात. पण प्रत्यक्षातील परिस्थिती कोण पाहतोय? काही पाळणाघरांमध्ये तर मुलांना लाइनमध्ये एका ठिकाणी तासन्तास बसविलं जातं. पण मुलांची शारीरिक, मानसिक वृद्धी तेव्हाच होते, जेव्हा मुलं खेळतात, मनसोक्त बागडतात, चिवचिवतात. त्यांच्या खेळण्याच्या वयात त्यांना असं पाळणाघरातील पिंजर्यात कोंडून ठेवलं, तर याचा परिणाम भविष्यात आपल्याला नक्कीच जाणवेल. पण त्या वेळी वेळ निघून गेलेली असेल. आठ तासांत आपल्या बाळाने काय खाल्लं, त्याचे शी-शूचे कपडे बदलले आहेत की नाहीत, बाळ आजारी असेल तर त्याला औषध दिलं की नाही, याबद्दल त्याच्या आईवडिलांना काहीच माहिती नसतं.
सगळ्याच नाही, पण आजकालच्या काही मॉडर्न, नोकरदार सुनांना रूढीवादी सासू-सासरे नको असतात. आजच्या मुक्त जीवनशैलीत त्यांना हे नातं म्हणजे अडथळा वाटतं, ही गोष्टही तेवढीच खरी आहे. आजची मॉडर्न, चंगळवादी जीवनशैलीही मुलांच्या अशा दशेला कारणीभूत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज पाहावं तिथे दोन पाखरांचा संसार उभा राहिलेला दिसतो आणि या संसारात फूल उमललं की त्याची रवानगी सरळ पाळणाघरात होते.
तान्हुल्यांची अंगाई हरवून गेली
पूर्वी बाळाला मांडीवर घेऊन अंगाई म्हणत निजवणारी, बाळाला कडेवर घेऊन चंदामामा दाखवीत चिऊ-काऊचा घास भरविणारी, लाडे-लाडे बालहट्ट पुरविणारी, दुडुदुडु धावणार्या बाळाच्या मागे धावणारी आई आज उंबरठ्याबाहेर पडून नोकरी करू लागलीय. आजच्या आधुनिक जगातील झगमगाटात अशा अनेक तान्हुल्यांची अंगाई हरवून गेली आहे. उलट पाळणाघरात आईची वाट पाहणारी
ती पिल्लं ‘आई कधी गं येशील तू,
अन् मजला कुशीत घेशील तू’ म्हणत आतल्या आत आक्रंदन करीत असतील.
या पिल्लांच्या माऊलींच्याही काही अडचणी आहेत. मनीषा म्हणते की, ‘मी सकाळी आठ वाजता घर सोडते ते रात्री आठ वाजता घरी पोहोचते. घरी परतल्यावर आधी अर्ध जेवण आटोपून, मग साधारण रात्री नऊ वाजता बाळाला घरी आणते. इकडे-तिकडे दोन-तीन तास बाळाबरोबर घालविते आणि झोपी जाते. सुट्टीच्या दिवशी मात्र आवर्जून बाळाला फिरायला घेऊन जाते.’
तर पल्लवी म्हणते, ‘मी केवळ चार तास मुलाला पाळणाघरात ठेवते. तो लहान असताना त्याच्या हातापायांवर चिमटे काढल्यासारख्या खुणा दिसल्या होत्या. म्हणून मग एकदा पाळणाघर चालविणार्या दाईला याविषयी विचारलं, तर ती म्हणाली… काहीतरी चावलं असेल. पण थोडं मोठं झाल्यावर एके दिवशी मुलानेच नक्कल करत दाखविलं, तेव्हा पटलं की त्या चिमटा काढल्याच्याच खुणा होत्या. अर्थात, नोकरीचा नाइलाज असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावं लागलं. पण दाईला चांगलीच तंबी दिली होती.’शीतलने सांगितलं, ‘पाळणाघरात असताना एकदा सर्वांची नजर चुकवून माझं मूल रांगत त्यांच्या किचनमध्ये गेलं होतं आणि नुकत्याच गॅसवरून उतरवून ठेवलेल्या गरम कुकरमुळे त्याला खूप भाजलं होतं. त्यानंतर अनेक दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं.’ स्मिताचं सासूशी भांडण झालं आणि सासू दुसर्या दिराकडे निघून गेली. त्यानंतर ती आपल्या सहा वर्षांच्या मुलीला पाळणाघरात ठेवू लागली.
ती म्हणते, ‘मुलगी पाळणाघरात जाऊ लागल्यापासून गप्प गप्प राहू लागली आहे. ती सारखी आजीची आठवण काढते आणि चिडचिड करते, पण काय करणार सरकारी नोकरी सोडू शकत नाही.’
स्नेहल संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या मुलीला पाळणाघरातून आणायला जाते, तेव्हा तिची मुलगी गॅलरीत तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. पाळणाघरात आपल्या मुलाला कसं ठेवलं जातं हे पाहण्यासाठी प्रिया एकदा अचानक तिथे गेली होती. तेव्हा तिचा दोन वर्षांचा मुलगा पिंजर्यात ठेवलेल्या कैद्याप्रमाणे गॅलरीच्या ग्रीलमध्ये बसला होता
आणि पाळणाघरातील सगळी मंडळी गणपती उत्सवाचं डेकोरेशन करण्यात मग्न होती. मुलाचे सुचे कपडेही बदललेले नव्हते. मुलाचे हे हाल पाहून तिने सरळ नोकरी सोडली. आता तिने घरातच छोटासा व्यवसाय सुरू केला आहे.
पुष्पाचा मुलगाही पाळणाघरात जायला लागल्यापासून खूप चिडखोर बनलाय. चौकशी केल्यावर शेजार्यांकडून तिला कळलं, पाळणाघराची दाई त्याला दम देऊन जबरदस्ती झोपवायची. शिवाय पाळणाघरामधली मुलंही आपापसात खूप मारामारी करायची. त्यानंतर तिने आपल्या सासूला बोलावून घेतलं. आता त्याची आजी त्याला रोज संध्याकाळी गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाते. त्यामुळे मुलगाही खूप खूश असतो.
तुम्ही प्रॅक्टिकल बनाल, तर ती प्रॅक्टिकल बनतील
अशा एक ना अनेक गोष्टी नोकरदार आयांकडून ऐकायला मिळतात. अर्थात सगळीच पाळणाघरं वाईट असतात, असं नाही. पण शेवटी आपलं घर, आपली आई, आपले आजी-आजोबा यांची गोष्टच निराळी असते, नाही का? निदान जोपर्यंत आपल्या बाळाला आपली गरज आहे, तोपर्यंत तरी आईने त्याला वेळ दिलाच पाहिजे. एकदा मातृत्व स्वीकारल्यानंतर त्याची जबाबदारीही तेवढ्याच समर्थपणे पार पाडली पाहिजे. बाळाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाला तुमची खरी गरज असताना असं पाळणाघरात टाकून गेलात, तर मग पुढे जेव्हा तुम्हाला तुमच्या बाळाची खरी गरज असेल, तेव्हा त्यानेही आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलं तर… हे चुकीचं नाही का होणार? आज तुम्ही त्यांना टाकलात, तर उद्या ते तुम्हाला टाकतील. कारण आपल्यासोबत त्याची भावनात्मक नाळ जुळलेलीच नसणार! बालवयात मुलांच्या मनावर कोरलेले अनुभव भविष्यात तुमच्याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण करू शकतात. ही मुलं हेकेखोर, हट्टी, कुणाचीही पर्वा न करणारी होऊ शकतात. आज तुम्ही प्रॅक्टिकल बनाल, तर उद्या ती प्रॅक्टिकल बनतील. बाळाला सुरक्षित भविष्य देण्याच्या नादात आपला वृद्धापकाळ केविलवाणा बनू नये, याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे.
म्हणूनच आधुनिकतेच्या सागरात हरवत चाललेले अंगाईचे सूर पुन्हा एकदा घराघरांतून ऐकू येणं गरजेचं आहे. संसारवेलीवर फुललेल्या फुलांचा दरवळ घरात मुक्त पसरणं आवश्यक आहे. फुलांचा हा सुगंध आयुष्यभर आपल्यासोबत राहावा असं वाटत असेल, तर आपल्या बाळाला वेळ देणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच पूर्ण वेळ बाळाला पाळणाघरात सोडण्यापेक्षा किमान जोपर्यंत त्याला आपली गरज आहे, तोपर्यंत तरी घरातच एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्यास काय हरकत आहे. आणि समजा तसं शक्य नसेल, तरी मुलांना पाळणाघरात सोडण्यापेक्षा आजी-आजोबांकडे ठेवता येईल. यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतील. मुलं आपल्या माणसांच्या सहवासात खूश राहतील, शिवाय मायेचा ओलावाही टिकून राहील. अर्थात, मूल सुसंस्कारात वाढलं तर भावी पिढीही निरोगी, संस्कार संपन्न आकारास येईल, याबद्दल शंकाच नाही.
- विद्या राणे-सराफ