ॐ नमः शिवाय ।।
तुजविण शंभो मज कोण तारी……

जीवनाच्या धुंदीत जगण्याच्या वाटेवरून चालताना पुन्हा एकदा आम्ही तिथेच आलोय….. कुणकेश्वर यात्रा…. असं वाटतंय की आयुष्यातील अजून एका वर्षाची परिक्रमा पूर्ण झाली. जी गतवर्षी यात्रा संपल्यावर सुरू झालेली. हे दरवर्षी असंच घडतंय. कुणकेश्वरची यात्रा हा खरंतर भक्तांनी देवाला भेटायचा सोहळा…. नव्हे… तर देवांनिही देवाला भेटायचा सोहळा. शिवभक्त आणि गावोगावच्या गावऱ्हाटीतील देवांनी या सागरतीर्थावर एकत्रितपणे भरविलेला कोकणचा महाकुंभमेळा. कुणकेश्वराला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा सोहळा. या महासोहळ्या निमित्त जेव्हा कुणकोबाच्या भूमीला तुमचे पाय लागतात ना तेव्हा लाखो शिवभक्त ज्याच्या नुसत्या मंदिर शिखराला शिव मानून नतमस्तक होतात ते पाहून त्या कुणकेश्वराची महती लक्षात येते. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो।। याहून वेगळी अवस्था यात्रेत फिरताना नसते. तो स्वयंभू कुणकेश्वर म्हणजे एक ऊर्जेचा स्त्रोत असतो. तो असतो लिंग स्वरूपात स्फुलिंग निर्माण करणारा देवाधिदेव महादेव. सोळाव्या शतकात कधीकाळी एक सोळा वर्षाचा मुलगा रायरेश्वरी याच लिंग स्वरूपाला रक्ताभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतो. हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा