Close

गोल्डन सिटी जैसलमेर (Golden City Jaisalmer)

राजस्थान पर्यटनातील एक महत्त्वाचं शहर म्हणजे जैसलमेर. सोन्यासम पिवळं आणि राजेशाही थाट असलेलं हे शहर मगोल्डनसिटीफ म्हणून प्रसिद्ध आहे.


था रचं वाळवंट, उंटांचे काफिले, मोठमोठ्या हवेल्या, किल्ले… राजस्थानचं खरं दर्शन कुठे होत असेल, तर ते जैसलमेर परिसरातच होतं. राजस्थान पर्यटनातील एक महत्त्वाचं शहर म्हणजे जैसलमेर. जैसलमेरपासून सुमारे शे-सव्वाशे किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची सीमा आहे. म्हणजे, एका दृष्टीने भारताच्या उत्तर-पश्‍चिम वाळवंटी सीमा प्रदेशातील हे शेवटचं शहर… रेल्वे टर्मिनस असलेलं हे शहर पक्क्या रस्त्यांनी राजस्थानच्या जोधपूर, बिकानेर आणि अन्य शहरांशी जोडलेलं आहे. जैसलमेरचा परिसर म्हणजे मारवाड परिसर. जैसलमेर, जोधपूर, पाली, जालौर, नागौर, लक्ष्मण नगर, बाडमेर हे जिल्हे पूर्वी मारवाड प्रदेशाचे भाग होते.
सोन्यासम पिवळं आणि राजेशाही थाट असलेलं हे शहर ङ्गगोल्डनसिटीफ म्हणून प्रसिद्ध आहे. याला कारणही तसंच आहे. जैसलमेर शहरातील बहुतांश ऐतिहासिक इमारती, हवेल्या, किल्ले यांचं बांधकाम पिवळ्या रंगाच्या दगडात केलेलं आहे.
हा विशिष्ट प्रकारचा पिवळा दगड याच परिसरात आढळतो.
या दगडांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या दगडांवर कोरीव काम, नक्षी, वेलबुट्टी असं कलाकुसरीचं कामही सुरेख करता येतं. या वास्तूंचा रंग आणि त्यावरील कोरीव काम खरंच थक्क करणारं आहे. त्यात सोनेपे सुहागा म्हणजे, या सगळ्या परिसरातील वाळूचा रंगही सोन्यासारखा पिवळाच आहे. अर्थात खरंच ही ङ्गगोल्डनसिटीफच आहे.
पूर्वीच्या काळी जैसलमेर हे शहर या भागातलं व्यापारी उलाढालीचं शेवटचं शहर होतं. अनेक बड्या व्यापारी पेठा इथून सिंध-पाकिस्तानशी व्यापार करीत असत. नाना प्रकारच्या मौल्यवान वस्तू साठवणुकीची मोठमोठी गोदामंही या परिसरात होती. म्हणजेच, धनदौलत, पैसा, लक्ष्मीचा मुक्त संचार या शहरात होता, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

डेझर्ट फेस्टिव्हल
जैसलमेरमध्ये दरवर्षी पर्यटन विभागातर्फे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चार-सहा दिवसांचा ङ्गडेझर्ट फेस्टिव्हलफ अर्थात ङ्गमरुभूमी उत्सवफ साजरा होत असतो. या महोत्सवात नाना प्रकारचे सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. उंटांची शर्यत, उंट गाड्यांची शर्यत, कठपुतळ्यांची स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, संगीताचे कार्यक्रम, राजस्थानी खाद्य महोत्सव, पारंपरिक राजस्थानी पोषाखांचे फॅशन शो, मेंदी स्पर्धा इत्यादी अनेक कार्यक्रमांनी हा महोत्सव बहरलेला असतो. अर्थातच म्हणूनच या महोत्सवाला मोठ्या संख्येने देशी आणि विदेशी पर्यटकही उत्साहाने हजेरी लावतात. याच महोत्सवाच्या निमित्ताने ही सोन्याची नगरी पाहण्याचा योग आला. आणि खरंच इथे पाहण्या-फिरण्याची अनेक स्थळं आहेत, हे पटलं.

देशातील एकमेव निवासी किल्ला
इ.स. 1156च्या सुमारास बांधलेला, सुमारे सहा चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेला हा किल्ला त्रिकुटा टेकडीवर ऐटीत उभा आहे. जैसलमेरच्या या किल्ल्याने अनेक युद्ध पाहिली. अनेकांनी त्यास काबीज करण्याचे प्रयत्नही केले, मात्र शेवटपर्यंत तो अभेद्य राहिला. कुणीही त्यावर हल्ला करून किल्ला जिंकू शकलेलं नाही. पिवळ्या दगडांचे बांधकाम असलेला हा किल्ला दिवसा धम्म पिवळा, तर सांज होता होता मधाळ रंगाचा दिसू लागतो. म्हणूनच स्थानिक लोक यास ङ्गसोनार किल्लाफ या नावानेही संबोधतात.
जैसलमेरच्या या किल्ल्याची अनेक वैशिष्ट्यं आहेत. हजारो कुटुंब वंशपरंपरागत पद्धतीने या किल्ल्यात राहतात. अशा प्रकारचा हा देशातील एकमेव निवासी किल्ला आहे. या कुटुंबांना जैसलमेर शहराचे संस्थापक महारावळ गढसिंग आणि त्यांच्या वंशजांनी किल्ल्यात कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची रीतसर सनद दिलेली आहे. प्रामुख्याने राजपूत आणि ब्राह्मण समाजाची कुटुंबं या किल्ल्यात राहतात.
किल्ल्याचं अतिप्रचंड आकाराचं महाद्वार, स्त्रियांच्या घागर्‍याच्या चुण्यांसारखी एकाच्या आत एक रचना असलेली तटबंदी, महाकाय बुरूज, तोफा, संरक्षणासाठीची सर्व प्रकारची सिद्धता अशी अनेक वैशिष्ट्यं असलेल्या साडेआठशे वर्षांपेक्षाही पुरातन या किल्ल्यांची रचना इजिप्शियन वास्तुशास्त्रानुसार करण्यात आलेली आहे. म्हणजेच बांधकामात चुना किंवा सिमेंटचा वापर न करता पिवळ्या रंगांचे दगड ङ्गइंटरलॉकिंगफ पद्धतीने एकमेकांत बसवून हा किल्ला उभा करण्यात आलेला आहे. किल्ल्यात राजाचे महाल, राजदरबार, बाजारपेठा इत्यादीही आहेत. त्यांची रचना, भिंतीवरील कलाकुसर, कोरीव काम पाहिल्यावर त्याच्या गतकालीन वैभवाची कल्पना येते.

पटवाओं की हवेली
किल्ल्यामध्ये ओसवाल जैन समाजाची अनेक जैन मंदिरं आहेत. त्यांच्या रचनेतील कोरीव काम, कलाकुसर थक्क करणारी आहे. ओसवाल जैन समाजाचे व्यापारी त्या काळी आपला मौल्यवान माल किल्ल्यात साठवून ठेवत असत. याच समाजातील सोन्याचांदीचे व्यापारी, अर्थात त्या काळचे ङ्गपटवाफ (जे आज एक आज एक आडनावही झालेलं आहे) यांनी व्यापार उदिमातून अलोट संपत्ती मिळवली होती. त्यांनी निवासासाठी किल्ल्याबाहेर उभारलेल्या अत्यंत देखण्या हवेल्या पाहिल्या की त्यांच्या वैभवाची सहजच कल्पना येते. पूर्वीच्या काळी येथूनच या पटवा लोकांचा व्यापारउदीम चालत असे. त्यांच्या श्रीमंतीविषयी सांगायचं तर, जैसलमेरचे राजे-राजवाडे यांनाही प्रसंगपरत्वे हे पटवा आर्थिक मदत करीत असत.
तीन माळे जमिनीखाली आणि तीन माळे जमिनीवर, असे पाच-सहा मजले असलेल्या या हवेल्या… त्यांची भव्यता, हवेशीरपणा, बारीक कलाकुसर, नक्षीकाम, वेलबुट्ट्या आदी वैशिष्ट्यांमुळे खरोखरच विलक्षण आहेत. हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात या हवेल्यांमधील वातावरण शीतल राहते. ङ्गपटवाओं की हवेलीफ या नावाने आज त्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत. मात्र या हवेल्यांमध्ये आता कुणीही ङ्गपटवाफ कुटुंबीय राहत नाही.

गढेसर तलाव
गढेसर तलाव, त्या तलावाभोवतीचा घाट, छोटी-मोठी मंदिरं, छत्र्या, पिवळ्या दगडातील त्याचं भव्य द्वार हे जैसलमेरमधील आणखी एक महत्त्वाचं स्थळ. पूर्वीच्या काळी जैसलमेरमधील लोकांसाठी पाण्याचा एकमेव स्रोत असणारा हा तलाव महारावळ (म्हणजे महाराजा) गढसिंग यांनी शेकडो वर्षांपूर्वी बांधला होता. या तलावाचं पिवळ्या दगडातील सुंदर भव्य द्वार त्या काळच्या एका प्रख्यात गणिकेने बांधलं होतं. तीही त्या काळी अत्यंत दानशूर म्हणून प्रसिद्ध होती. मात्र एका गणिकेने तलावासाठी महाद्वार बांधून घ्यावं हे महारावळ यांना आवडलं नाही आणि त्यांनी ते सुंदर द्वार पाडण्यासाठी सैनिक पाठवले होते. पण गणिका इतकी चतुर होती की तिने एक युक्ती केली होती. तिने या द्वाराच्या शिरोभागी श्रीकृष्णाचं मंदिर बांधून घेतलं होतं. आणि भगवान श्रीकृष्ण हे तर जैसलमेरच्या महारावळांचे कुलदैवत! द्वार पाडायचं, म्हणजे मंदिरही पाडावं लागणार होतं! अखेर द्वार पाडण्याचा निर्णय महारावळांनी मागे घेतला. परंतु, गणिकेने बांधलेल्या या द्वारामधून राजपरिवाराची कुणीही व्यक्ती ये-जा करणार नाही, असं त्यांनी ठरविलं. मग खास महारावळ परिवारासाठी म्हणून त्यांनी तलावावर दुसरं द्वार बांधलं.
जैसलमेरपासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर थारच्या ऐन वाळवंटात (परंतु डांबरी सडकेलगत) तंबूमधून राहण्याचीही छान सुविधा उपलब्ध आहे. तिथे राजस्थानी खानपान आणि नृत्यसंगीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं दररात्री आयोजन केलं जातं. उंटावरून वाळवंटातील भटकंती, उंट गाड्यातून फिरणं, कठपुतळीचे खेळ, राजस्थानी पोषाखात फोटो काढण्याची सोय इत्यादी अनेक गमतीजमती या तंबूकॅम्पमध्ये पर्यटक अनुभवू शकतात.

सिनेमावाल्यांनाही जैसलमेरचं आकर्षण
जैसलमेरचा हा सारा परिसरच अतिशय सुंदर आहे. आणि म्हणूनच अनेक सिनेमांतून या परिसराचं वारंवार दर्शन घडतं. संपूर्ण जैसलमेर आणि आसपासच्या परिसरात हिंदी व अन्य भाषिक चित्रपट व टी.व्ही. मालिकांचं चित्रीकरण नेहमीच सुरू असतं. सिनेमावाल्यांचा तर हा आवडता परिसर आहे, कारण चित्रीकरणासाठी आवश्यक अशी भरपूर लोकेशन्स इथे मिळतात. शिवाय निवास आणि भोजनाच्याही उत्तम व भरपूर सोयी इथे आहेत. त्यात राजस्थानातील अन्य शहरांसारखं जैसलमेर हे महागडं शहर नाही. इथे हत्ती, घोडे, उंट इत्यादीही भरपूर आहेत. त्यामुळे सिनेमाचं काम इथे सतत सुरू असतंच. इथल्या तरुणतरुणींमध्येही सिनेमाचं आणि मुंबई शहराचं भरपूर आकर्षण आढळतं.
आधुनिक जैसलमेरमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, रणगाडादळ, पायदळ यांच्या मोठ्या छावण्या आहेत. वायुसेनेचाही
मोठा तळ इथे आहे. अणू चाचणी स्फोट इथून जवळच असलेल्या पोखरण या ठिकाणी झाला होता. ङ्गइंदिरा नहरफ या कालव्यामुळे आता जैसलमेर परिसरातील शेतीही पुष्कळ सुधारली आहे. पूर्वी येथे पाण्याचे दुर्भिक्ष कायम असे. परंतु, आता साठ-सत्तर हजार लोकवस्तीच्या या शहरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष नाही, असं स्थानिक आवर्जून सांगतात. असं हे मोठा ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा असणारं जैसलमेर शहर काळाच्या ओघात आधुनिकही होत आहे!

  • सुधीर सेवेकर

Share this article