सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्य शक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे.
सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.
नाथ संप्रदाय मध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्त गुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळतं की कोणी तरी तपश्चर्या करत आहे. ते बघण्याकरिता ते दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेवांकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की, तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ''शाबरी विद्या''ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो.
कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. आईची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते.