Close

मुलाना द्या स्वयपाकाचे धडे (Give Children Cooking Lessons)

शिक्षण, नोकरीनिमित्त हल्ली बरीच मुलं घरापासून लांब राहत असल्याने, त्यांच्या जेवणाचे खूप हाल होतात. हॉटेल, कॅन्टिनशिवाय त्यांना पर्यायच नसतो. यासाठी त्यांचे पैसेही जातात, शिवाय हे जेवण आरोग्यास हानिकारकही ठरते. भविष्यात आपल्या मुलांना अशा समस्येला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, याकरिता मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकाचे धडे देणे गरजेचे आहे.


बंगळुरू येथील एका नामांकित कंपनीत 24 वर्षीय रोहन इंजिनियर म्हणून रुजू झाला. सुरुवातीचे काही दिवस त्याने कॅन्टिन, हॉटेलमधील जेवणङ्घएन्जॉयफ केले. मात्र काही काळाने त्याला या जेवणाचा कंटाळा येऊ लागला. त्याच्यासमोर मोठा प्रश्‍न आ वासून उभा होता, तो म्हणजे त्याला काहीच स्वयंपाक येत नव्हता. घरी चहापासून जेवणापर्यंतच सगळं त्याला हातात मिळाल्याने, स्वयंपाकघरात जाण्याचा कधी प्रश्‍नच आला. परंतु आता त्याला या सगळ्याचा त्रास भोगावा लागत होता. पैसाही जात होता. आणि बाहेरच्या जेवणाचा त्याच्या तब्येतीवरही परिणाम होत होता. लहानपणापासून रोहनला स्वयंपाक करण्याची थोडी सवय लावली असती, तर आज तो त्याच्यापुरता तरी स्वयंपाक करू शकला असता.
असे अनेक रोहन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना लहानपणापासूनच स्वयंपाकाचे धडे दिले तर पुढे त्रास होत नाही. मुलं साधारण 8-10 वर्षांची झाली की त्यांना हे धडे देण्यास सुरुवात करावी. या वयात मुले जास्त क्रिएटिव्ह असतात. शिवाय काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे पालकांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या पटकन लक्षात येतात, ज्याचा त्यांना भविष्यात फायदा होतो.

कशी कराल सुरुवात?
मुलांना पटकन जेवण बनवायला शिकवू नका. त्यांना आधी स्वयंपाकघराची सवय होऊ द्या. जेवण बनवताना आधी काय करावे लागते, याची थोडी थोडी कल्पना येऊ द्या. यासाठी हे मार्गदर्शन.

भाजी धुवायला शिकवा
मुलांना सर्वात आधी भाज्या, फळं धुवायला शिकवा. भाज्या, फळं धुवून घेणे किती गरजेचे आहे, हे मुलांना पटवून सांगा.
फळं, भाज्या

सोलायला शिकवा
भाज्या कापण्याआधी त्या सोलायला शिकवा. याची सुरुवात वाटाण्यापासून करा. त्यानंतर हळूहळू त्यांना व्हेजीटेबल पिलरने गाजर, काकडी, दुधी सारख्या भाज्या सोलायला द्या.

किसायला शिकवा
मुलं भाज्या सोलायला शिकले की, त्यांना भाज्या किसायला शिकवा. त्याची सुरुवात काकडीपासून करा. काकडी किसायला सोपी असल्याने त्यांना जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर मग गाजर, बीट किसायचे ट्रेनिंग द्या.

भाज्या, फळे कापायला शिकवा
मुलांच्या हातात सुरुवातीलाच धारदार सुरी देण्याची चूक कधीच करू नका. सुरीचा वापर कसा करावा, हे शिकवण्यासाठी त्यांना आधी प्लॅस्टिकची सुरी द्या. प्लॅस्टिकच्या सुरीने त्यांना सुरुवातीला पनीर, मश्रुम असे मऊ पदार्थ कापायला द्या. मुलं प्लॅस्टिकच्या सुरीने भाज्या कापण्यात तरबेज झाले, की मग त्यांना धारदार सुरीने बटाटा, कांदा आदी भाज्या कापायला शिकवा.

पदार्थांचे मोजमाप
भाज्या सोलणं, कापणं यात मुलं माहीर झाली की त्यांना धान्यांचे, फळांचे, भाज्यांचे मोजमाप कसे करावे, याचे प्रशिक्षण द्या. अर्धी वाटी म्हणजे किती? एक लिटर म्हणजे किती? पाव किलो म्हणजे किती? एक डझनमध्ये किती वस्तू येतात? याचे मोजमाप मुलांना शिकवा. याची सुरुवात सुक्या वस्तूंपासून करा. उदा. साखर, तांदूळ, डाळ आदी.

पदार्थ एकजीव करण्यास शिकवा
वेगवेगळे पदार्थ योग्य प्रमाणात घेऊन, ते पदार्थ एकजीव करायला शिकवा. सुका मेवा, वेगवेगळ्या डाळी, कोशिंबीर आदींचा यात समावेश असावा.

स्वयंपाक या शब्दाचा अर्थ सांगा
मुलांना स्वयंपाकासंबंधित प्राथमिक माहिती दिल्यानंतर मुलांना स्वयंपाक कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण द्यावे. हो, पण स्वयंपाक शिकवायचा म्हणजे लगेच एखादा पदार्थ करायला सांगू नये. तर स्वयंपाक शिकवण्यापूर्वी मुलांना स्वयंपाक या शब्दाचा अर्थ सांगा. तळणे, भाजणे, उकळणे, शिजवणे म्हणजे काय हे मुलांना प्रात्यक्षिकासह समजवून सांगा. असं केल्याने मुलांना या कृती नीट कळतील.

स्वयंपाकघराची साफसफाई
स्वास्थ उत्तम राखण्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ असणे, किती आवश्यक आहे, याचे महत्त्व मुलांना पटवून द्या. भाजी कापल्यानंतर त्याची सालं कचर्‍याच्या डब्यात टाकावीत. वापरलेली भांडी वॉश बेसिनमध्ये ठेवावीत, जेवण बनवल्यानंतर ओटा स्वच्छ पुसावा. स्वच्छतेबाबतच्या या प्राथमिक गोष्टी मुलांना माहीत असल्याच पाहिजेत.

पालकांनी घ्यावयाची काळजी
मुलांसाठी स्वयंपाकघर म्हणजे एखाद्या ङ्गडेंजर झोनफपेक्षा कमी नाही. त्यामुळे मुलांना स्वयंपाक शिकवताना, पालकांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. छोटेमोठे अपघात होऊ शकतात, ते घडू नयेत, यासाठी काय लक्षात ठेवाल?
> सुरुवातीपासूनच मुलांना स्वयंपाकघरात एकटं पाठवू नका.
> मुलं स्वयंपाक करणार असतील तर ओट्यावर ठेवलेली मोठी भांडी खाली उतरवून ठेवा.
> मीठ, मसाला, हळद आदी आवश्यक वस्तू ओट्यावर काढून ठेवा.
> शेगडीवर ठेवलेले गरम भांड उचलण्यासाठी पक्कडचा वापर करण्याऐवजी कापसाचा वापर केलेल्या ग्लोव्हज्चा वापर करा.
> स्वयंपाक करताना स्टील, पितळेचे चमचे वापरण्यापेक्षा लाकडी चमच्याचा, चिमट्याचा वापर करा. स्टीलचा चमचा गरम होऊन चटका लागण्याची शक्यता असते.
> मुलांना स्वयंपाक शिकवताना शक्यतो इंडक्शन शेगडीचा वापर करावा. यामुळे आग लागण्याचे प्रकार घडत नाहीत.
> हिरवी मिर्ची, लाल मिर्ची कापण्यासाठी कात्रीचा वापर करा. त्याने हाताला जळजळ होत नाही.
> स्वयंपाक घरातून बाहेर निघताना आधी गॅस बंद केला आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.
>स्वयंपाकघरात फर्स्ट एड बॉक्स अवश्य असावा.
>मुलं स्वयंपाक करत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा.
> सुट्टी असेल त्या दिवशीच मुलांना स्वयंपाकाचे धडे द्या. घाईघाईत किंवा रात्री ऑफिसमधून आल्यानंतर मुलांना स्वयंपाक करायला शिकवू नका.

Share this article