Close

चिंब वातावरणात कपड्याची काळजी (Garment Care In A Humid Environment)

पावसाळा म्हणजे, सर्वत्र आर्द्रता आणि ओल… अशात कपड्यांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते.


पावसाळ्याच्या दिवसांत कपडे स्वच्छ आणि तजेलदार ठेवणे, म्हणजे आव्हानच असते. पावसात भिजलेले कपडे, त्यात कपडे न सुकणे, चिखल, चिखलाचे डाग… कपड्यांसाठी हा काळ अगदी महाभयंकरच असतो… आणि ओघानेच आपल्यासाठीही. म्हणूनच या चिंब वातावरणात कपड्यांची काळजी कशी घेता येईल, याविषयीच्या या काही टिप्स्-

वापरात नसलेले कपडे सांभाळून ठेवा
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नेहमी वापरात नसलेले कपडे व्यवस्थित पॅक करून कपाटात ठेवून द्या.
चामडे, लोकरी इत्यादी कापडांवर आर्द्रतेचा परिणाम जलदगतीने होतो. त्यामुळे असे कपडे व्यवस्थित पॅक करून कपाटात ठेवलेच बरे.
वारंवार उघडत नाही अशा कपाटात हे कपडे ठेवा.
या कपड्यांचा कसर (सिल्व्हर फिश)सारख्या किड्यांपासून बचाव करण्यासाठी, त्यासोबत नेप्थलिनच्या गोळ्या जुन्या मोज्यांमध्ये किंवा सुती कापडात बांधून ठेवा. यामुळे कपडे खराबही होणार नाहीत.
नेप्थलिनच्या गोळ्यांची अ‍ॅलर्जी असल्यास, कडुनिंबाच्या सुक्या पानांचा वापर करता येईल.
कपाटातील कपडे आर्द्र होऊ नये यासाठी कपाटात सिलिका जेलच्या पोटल्या ठेवा. सिलिका जेल त्या ठिकाणची सर्व आर्द्रता शोषून घेईल आणि परिणामी आर्द्रतेमुळे कपडे खराब होणार नाहीत.
पावसाळ्यादरम्यान जेव्हा कधी शक्य असेल, तेव्हा कपाट
वा बॅगेतील कपड्यांना थोड्या वेळासाठी ऊन दाखवा.

कपडे सुकविण्यासाठी
पावसाळ्यात कपडे सुकविणे म्हणजे डोकेदुखी असते. अर्थातच
ते घराच्या आतच सुकवावे लागतात. त्यात आर्द्रतेमुळे कपड्यांना काळी बुरशी लागण्याची शक्यता वाढते, त्यामुळे कपडे अधिकाधिक स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.
अशा वेळी सर्व प्रथम वॉशिंग मशीनमधील ड्रायरचा पूर्ण पॉवरवर वापर करा.
तसेच कपडे सुकविण्यासाठी बाजारात मिळणारे रॅकही उपयुक्त ठरू शकतात. या रॅकवर कपडे सुकवून, ते पंख्याखाली ठेवल्यास लवकर सुकतील.
मात्र इतके करूनही कपड्यांमध्ये थोडीफार आर्द्रता राहतेच. त्यामुळे शक्य असल्यास कपडे इस्त्री करून ठेवणे योग्य ठरते.

कपड्यांवरील डाग घालविण्यासाठी

पावसाळ्यात पेट्रोल, डिझेल, चिखल इत्यादींच्या शिंतोड्यांमुळे कपड्यांवर डाग पडतात.
डाग लागलेले कपडे त्वरित गरम पाण्यात डिटर्जंट घालून त्यात भिजत ठेवा आणि थोड्या वेळाने हळुवार ब्रश करून डाग काढा.
चिखलाचा डाग काढण्यासाठी, घरी आल्यावर लगेच कपड्यांवर चिकटलेला चिखल मऊ दातांच्या ब्रशने काढून टाका. नंतर थंड पाणी व डिटर्जंटने कपडे धुवा.
कापडावर गंज लागल्यास, त्या डागाच्या खाली काही
पेपर टॉवेल्स ठेवा. नंतर डागावर लिंबाचा रस लावा
आणि सूर्यप्रकाशात सुकण्यासाठी ठेवून द्या. नंतर कपडा स्वच्छ धुवा.
ग्रीस किंवा तेलाचा डाग असल्यास, त्या डागावर पेपर
टॉवेल ठेवून शक्य तितका डाग काढून टाकण्याचा प्रयत्न करा. नंतर त्या डागावर कॉर्नस्टार्च घालून अर्ध्या तासाकरिता तसेच ठेवून द्या. नंतर हळुवार ब्रश मारून साबणाने डाग स्वच्छ धुऊन काढा.

हेही लक्षात असू द्या
पावसात भिजलेले कपडे, शक्यतो दुसर्‍या दिवशी धुण्यासाठी ठेवू नका. कपडे अधिक काळ ओले राहिल्यास त्यांना दुर्गंधी येऊ लागते.
कपड्यांना कुबट दुर्गंधी येऊ नये यासाठी, कपडे भिजत घालताना त्या पाण्यात कपभर व्हाईट व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिसळा. वॉशिंग मशीनचा वापर करत असल्यास वॉशिंग मशीन सुरू करण्यापूर्वी त्यामधील पाण्यात व्हिनेगर वा बेकिंग सोडा घालता येईल.
डेनिमचे कपडे भिजल्यानंतर जड होतात आणि त्यांना सुकायलाही बराच वेळ लागतो. त्यामुळे पावसाळ्यात डेनिमचे पोशाख वापरणे टाळलेलेच बरे.
अशा प्रकारे त्वरित केलेल्या योग्य उपायांमुळे पावसाळ्यातही कपड्यांची काळजी घेणे सहज शक्य होऊ शकते.

Share this article