Close

मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी गणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण (Ganeshotsav 2024)

दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग सर्कलच्या जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यावर्षी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यावर्षी तब्बल ४०० कोटी रुपयांचा विमा काढला आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त येत येतात. यामुळे मंडळात होणारी गर्दी आणि गणपती बाप्पाच्या अंगावरील दागिने या सगळ्यांचा विचार करून जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने विमा रक्कमेत वाढ केली.

सर्वसामन्यांपासून ते मोठ्या सेलिब्रेटीपर्यंत या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. जीएसबी. गणपती सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि प्रवक्ते अमित पै यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जी.एस.बी. गणपतीसाठी ४०० कोटी ५८ लाखांचा विमा काढण्यात आला. या गणपतीला तब्बल ६६ किलोपेक्षा जास्त किंमतीचे दागिने घालण्यात येईल. तसेच ३२५ किलोपेक्षा चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंनी गणेश मूर्ती सजवण्यात येईल. २०२२ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे ३१६ कोटी आणि ३४० कोटींचा विमा काढण्यात आला होता.

बाप्पाच्या भक्तांसाठी यावर्षी मंडळाने ५ सप्टेंबर रोजी विराट दर्शन सोहळा आयोजित केला असून या दिवशी प्रथम देखावा अनावरण कार्यक्रम साजरा होईल. भगवान महागणपतीच्या आगमनाचे ७० वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा होणारा आहे.

महागणपतीची मूर्ती विशिष्ट नैसर्गिक चिकणमाती (शाडू माती), गवत आणि नैसर्गिकरित्या काढलेल्या पाण्याच्या रंगांनी बनलेली असल्याने महागणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. कागदाची होणारी नासाडी रोखण्यासाठी कागदी पावत्यांचा वापर कमी करून डिजिटल होण्याच्या मोहिमेला मंडळाने सुरुवात केली आहे. अशी मोहीम राबविणारा हा एकमेव गणेशोत्सव आहे.

गेल्या अनेक वर्षात जीएसबी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे.या ठिकाण येणारा भाविक हा विशेष करून दर्शनाबरोबर प्रसादाचाही लाभ घेतात. भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून आता जीएसबीचा गणपती प्रसिद्ध होऊ लागल्याचंही मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी सांगितले. विशेष म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास किंवा असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी येथे तैनात करण्यात येणार आहे.

Share this article