शरीर मजबूत बनवण्यासाठी आणि शरीराची शक्ती व ऊर्जा वाढविण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. याशिवायही इतर अशी कारणं आहेत, ज्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. धकाधकीच्या जीवनात शारीरिक संपत्ती अबाधित ठेवण्यासाठी नियमित आणि योग्य व्यायामाची आवश्यकता असते. व्यायामामुळे अवयवांना ताकद मिळते. मानसिक ताण-तणाव कमी होतात, तसंच शरीराचे शुद्धीकरण होते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होतात. शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, मन:शांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी व्यायामाचं महत्त्व जाणून घ्यायला हवंच. व्यायामाच्या बाबतीत सर्वात पहिली गोष्ट होणं महत्त्वाचं असतं, ते म्हणजे व्यायामाला आपल्या धावपळीच्या दिनचर्येत अग्रक्रम देणं आणि व्यायाम ही अत्यावश्यक गरज म्हणून आनंदानं स्वीकारणं. तुम्हाला निरोगी व उत्साही ठेवण्याबरोबरच तुमचं आरोग्य राखण्याचं कामही व्यायामाने सुकर होतं. व्यायाम आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावर निरोगी राखण्याचं काम बजावतं. तुमच्या दैनंदिन व्यवहारात अनिवार्य बाब म्हणून व्यायामाचा समावेश करा. बघा तुमच्या शारीरिक क्षमतेतील सकारात्मक बदल तुम्हाला नक्की जाणवेल.
मनाचा मूड राखतं
स्वतःला फिट आणि आनंदी ठेवण्यासाठी व्यायाम करायलाच हवा. व्यायाम केवळ शरीरासाठीच नसतो तर मनासाठीही असतो. व्यायामाने मन प्रसन्न होते. व्यायाम केल्याने शरीराबरोबर मनही उत्साही होते आणि दिवसभरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच तुम्हाला मरगळ आली असेल आणि शरीराने व मनाने निरुत्साही झाल्यासारखं वाटत असेल तर, केवळ चालण्याच्या व्यायामानेही तुम्ही ताजेतवाने व्हाल. व्यायामाचं खरं ध्येय शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हेच असतं. व्यायामामुळे शरीरात एण्डॉर्फिन्स हार्मोन्स स्रवतात. ज्यामुळे मनात सुखद भावना निर्माण होते. औदासीन्य, मनाची मरगळ या गोष्टी कमी होतात. हृदयाची, फुप्फुसांची क्षमता वाढते. व्यायामात शरीर थकतं, पण मन थकत नाही. उलट ते अधिक ताजंतवानं होत जातं. मनाचा मूड बदलतो.
आजारांना दूर ठेवते
जीवनशैलीत आरोग्यासाठी हितकारक बदल घडवून आणायचे असल्यास व्यायामाला पर्याय नाही. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवांची हालचाल ठरावीक प्रकारे अनेक वेळा केली जाते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. हाडांचा बळकटपणा वाढतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीराची हालचाल न होणं याचा थेट संबंध शारीरिक व्याधींशीच येतो म्हणूनच व्याधीमुक्त शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे. व्यायामाने वजन, रक्तदाब, रक्तातील साखरेचं प्रमाण या गोष्टी नियंत्रणात राहतात. मधुमेह नियंत्रणात राहतो. संधिवाताच्या विकारांपासून दूर राहता येतं. हृदयरोगाला प्रतिबंध करणारे बदल दिसून येतात आणि पर्यायाने आरोग्य चांगलं राहतं.
ऊर्जा वाढते
व्यायामाने शरीरातली ऊर्जा वाढायला मदत होते. शारीरिक क्षमता म्हणजेच ऊर्जा टिकवण्यासाठी मनोबल आवश्यक असते. हे मनोबल व्यायामातून आपल्याला मिळते. शरीर लवचीक बनते, रक्तप्रवाह वेगाने व योग्य होतो, शरीरात अधिक प्रमाणात ऊर्जासंचय होतो व काम करण्यास शक्ती मिळते. या काळात शरीरास श्रम पडून चेतापेशी लवचीक व मजबूत बनतात व त्याची कार्यक्षमता वाढते.
सौंदर्यवृद्धी
व्यायामाने शरीर लवचीक बनते आणि सुडौल बनते. नियमित व्यायामाने पाय, पोटर्या, नितंब यांना योग्य आकार प्राप्त होऊन स्नायू घट्ट होतात व त्यांना सुडौल आकार मिळतो. तणाव आणि चिडचिडेपणा दूर झाल्याने, ते तेज चेहर्यावरही झळकतं. आपलं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. कांतिमान त्वचा, सुडौल बांधा, देहसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहाराप्रमाणे व्यायामाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. योगासनं, अॅरोबिक्स अशा व्यायामप्रकारांनी कमनीय बांधा प्राप्त होण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात ठेवते
व्यायामात अतिरिक्त कॅलरीज बर्न झाल्याने वजन आटोक्यात राहतं. शरीरातील चरबी जलद गतीने कमी होण्यास मदत होऊन वजन नियंत्रणात राहते. विशेषतः पोट, नितंब, मांड्याचे स्नायू मजबूत होण्याबरोबरच तेथील चरबी कमी होण्याकरिता व्यायाम उपयुक्त ठरतात. सायकलिंग, जॉगिंग, पायी चालणे इत्यादी प्रकारच्या व्यायाम प्रकारांनी वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते. व्यायामामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शरीराला हलकेपणा येतो. वजन आटोक्यात राहते, स्थूलता होत नाही. परिणामी स्थूलतेमुळे होणार्या गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते.
व्यवस्थित झोप लागते
व्यायामामुळे शरीरातील कॅलरी बर्न होतातच, शिवाय रक्ताभिसरणही व्यवस्थित होते. व्यायाम ही एक प्रकारची शारीरिक मेहनत असते. नियमितपणे व्यायाम केल्यामुळे किंवा एखादा खेळ खेळल्यामुळे शरीराची आवश्यक त्या प्रमाणात हालचाल घडते आणि ते थकते. याचा परिणाम म्हणून पडल्याक्षणी शांत झोप लागते. आरोग्य चांगले राखण्यासाठी पर्याप्त झोप, व्यायाम आणि संतुलित आहार या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असून त्या एकमेकांवर अवलंबून असतात.
सेक्शुअल लाइफमधील आनंद वाढविते
नियमित व्यायामाने मन नेहमी प्रफुल्लित आणि प्रसन्न राहते. ज्याचा सकारात्मक परिणाम सेक्शुअल लाइफवर होतो. व्यायामामुळे सेक्स हार्मोन्समध्ये संतुलन राहते आणि तणावमुक्त कामजीवनाचा आनंद घेता येतो. प्रसन्न चित्तवृत्तीमुळे आणि शारीरिक लवचिकतेमुळे सेक्शुअल लाइफमधील सौख्य टिकून राहते.
आरोग्य म्हणजे नुसता रोगांचा अभाव नाही तर शरीर व मन कार्यक्षम असणे, आनंदी व उत्साही असणे. ‘शरीर सुखी तर मन सुखी’ या तत्त्वानुसार कोणतेही काम यशस्वीरीत्या करण्यासाठी मनाची प्रसन्नता व निरोगी शरीर आवश्यक आहे. म्हणूनच शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे.