फिटनेसबद्दल जागरूक असूनही व्यायाम करायला वेळ मिळत नाही, ही तक्रार बहुतांशी ऐकावयास मिळते. परंतु, आवड असल्यास कुठल्याही वयात शारीरिक व्यायामासाठी नृत्याचा पर्याय निवडून तुम्ही एकदम फिट राहू शकता.
आऽऽऽज जिमला जायचा कंऽऽऽटाळा आलाय...
हे रोजचंच होऊ लागलंय... पण दुसरीकडे फिट राहण्याचा वसाही घेतलेला आहे... मग काय?...
मग जिमला नका जाऊ, आपल्या आवडीचा छंद जोपासा. संगीत ऐकण्याची आवड असलीच, तर त्या संगीताच्या तालावर ठेका धरायला लागा. म्हणजे, जिमला जाऊन तेच तेच बोअर करणारे व्यायाम प्रकार करण्यापेक्षा घरच्या घरी नृत्याची आवड जोपासून फिटनेस टिकवण्याचा पर्याय स्वीकारा.
सक्रिय जीवनशैली
बरेच जणांना असं वाटतं की, दिवसभर राबल्यानंतर, तसंच कसरतीचा प्रवास केल्यानंतर वेगळ्या व्यायामाची गरज आहे? हो, आहे. उलट दिवसभर बिनादिक्कत काम करण्यासाठी वापरल्या जाणार्या ऊर्जेसाठीच आपल्याला या व्यायामांची गरज असते. पण त्यासाठी जिममध्ये जाण्याएवढी सवड नसते. अशा वेळी नृत्याची आवड जोपासा. कारण नृत्य ही आनंद देणारी, तसंच मनोरंजन करणारी कला आहे. दिवसाची सुरुवात आनंदाने झाली, तर त्याचा सकारात्मक परिणाम दिवस अखेरपर्यंत राहतो. त्यामुळे दिवसभराच्या कामाचा ताणही राहत नाही आणि आपण मनानं नि शरीरानंही ताजंतवानं राहतो. तेव्हा निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी नृत्याच्या पर्यायाचा अवश्य विचार करा.
स्नायूंची बळकटी
थकलेय... खरंच खूप दमलेय... अशी वाक्यं सकाळी उठल्या उठल्या कानी पडत असतील, तर काय समजायचं? म्हणजे, रात्री झोपूनही आदल्या दिवशीचा कामाचा ताण तसाच राहिला असल्यामुळे उठल्यावरही आपल्याला थकल्यासारखं वाटतं. सतत काम करत राहिल्याने शरीराची सहनशक्ती कमी होऊन थकवा येणं स्वाभाविक आहे. परंतु, दररोज नृत्य करण्याची सवय असणार्या व्यक्तींना थकवा जाणवत नाही. कारण नृत्यामुळे सगळ्यात मोठा फायदा कोणता होत असेल, तर त्यामुळे आपला स्टॅमिना वाढतो. नृत्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. त्यामुळे चांगला शारीरिक व्यायाम होतो. हाडं आणि स्नायू मजबूत होतात.
उत्तम कार्डिओ वर्कआऊट
नृत्य हा उत्तम ‘कार्डिओ वर्कआऊट’चा प्रकार आहे. हृदयाची गती वाढवून व्यायाम केल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. शास्त्रीय नृत्य, भांगडा, गरबा, लावणी किंवा इतर कोणतीही लोकनृत्यं असोत, त्यातून चांगल्या प्रकारे ‘कार्डिओ व्यायाम’ होतो. नृत्य करतेवेळी होणार्या चेहरा, हात, पाय यांच्या लयबद्ध हालचालीमुळे शरीराच्या अवयवांमध्ये समन्वय साधण्यास मदत होते. यामुळे शरीर अधिक लवचीक आणि चपळ बनतं. नृत्य करताना आपल्याला घाम येतो. या घामावाटे आपल्या शरीरातील उत्सर्जक पदार्थ बाहेर पडून त्वचेस एक चकाकी येते. किमान अर्धा तास नृत्य केल्यास शरीरातील 200 ते 400 कॅलरीज जळतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. कॉलेस्टेरॉलची पातळी सामान्य राहते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी नृत्याचा पर्याय जरूर अजमावून पाहा. कारण नृत्य रक्तदाबही नियंत्रणात ठेवतं.
प्रमाणबद्ध आणि आकर्षक शरीरयष्टी
लहान मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. त्यांच्यामध्ये लहानपणीच नृत्याबद्दलची आवड निर्माण केल्यास, ती ऊर्जा चांगल्या प्रकारे वापरली जाते. त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. नृत्य ही सादरीकरणाची कला असल्यामुळे यात हावभावांस अधिक महत्त्व असतं. शिवाय शास्त्रीय नृत्यप्रकार असेल, तर हातांच्या, बोटांच्या हालचाली, डोळे, भुवया, मान यांच्या सूक्ष्म हालचाली करताना विशेष कौशल्य दाखवावं लागतं. या सर्वांतून मुलांचंच नव्हे, तर आपलंही को-ऑर्डिनेशन सुधारतं. आपल्या उठण्या-बसण्याच्या, उभं राहण्याच्या स्थितीला एक प्रकारची सुरेख लकब प्राप्त होते. शरीरयष्टी प्रमाणबद्ध आणि आकर्षक बनते. आत्मविश्वास वाढतो.
मानसिक आरोग्य सुधारतं
आपलं वय वाढतं, तशी आपली स्मरणशक्ती कमी होत जाते. काही काही गोष्टी आपल्या स्मरणातून पुसट होऊ लागतात. तेच तुम्ही नृत्याचा सराव रोज करत असाल, तर तुमची स्मरणशक्ती दीर्घकाळ तल्लख राहते. नृत्याचा सराव करताना आपण वेगवेगळ्या स्टेप्स, नृत्य प्रकारांचा, हावभावांचा प्रयोग करत असतो. त्यामुळे आपल्या बुद्धीला सतत चालना मिळत राहते. ती सतत कार्यान्वित राहते. आणि आपण बुद्धीने, तसंच मनाने सतत तरुण आणि सुदृढ राहतो.
नृत्य... एक साधना
नृत्य ही एक साधना आहे. नृत्य करताना आपण शरीर आणि मनानं एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव घेत असतो. बाहेरच्या जगापासून आपण काही वेळ का असेना परंतु अनभिज्ञ असतो. राग, लोभ, मत्सर अशा कोणत्याच भावनांना आपल्यामध्ये वाव नसतो. केवळ एक आनंदच सर्व शरीरात अनुभवण्यास येत असतो.
नृत्याच्या निमित्ताने आपण बर्याच व्यक्तींना भेटतो, त्यांच्याशी मैत्री करतो. त्यांना आपल्या काही वैयक्तिक समस्या सांगतो. एखाद्या सामाजिक विषयावर चर्चा करतो. नाहीतर कधी आवडत्या विषयावर मनसोक्त गप्पा मारून मन मोकळं करतो. या सर्व गोष्टींमुळे जो आनंद मिळतो, तो आपल्या निरोगी जीवनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. नृत्यामुळे अप्रत्यक्षपणे असाही फायदा होतो.
नो डाएट, नो जिम
नृत्याची आवड आणि त्याचा रोजचा सराव यामुळे किती फायदे होतात, हे आपल्या लक्षात आलंच असेल. आणखी एक गोष्ट म्हणजे, हल्ली जेव्हा व्यायामाला पर्याय म्हणून आपण नृत्याचा विचार करतो, तेव्हा त्यात झुंबा, बॅले, हिप हॉप आदींचा समावेश करावा लागेल. यापैकी झुंबा हा बेली, हिपहॉप आणि रुंबा अशा तीनही नृत्यप्रकारांचा मिश्र प्रकार आहे. गाण्याच्या तालावर केल्या जाणार्या या नृत्य प्रकारामध्ये शरीराची बरीच हालचाल होते आणि उत्तम व्यायाम मिळतो.
बेली डान्समध्ये शरीराची हालचाल एका लयबद्ध पद्धतीने करावी लागते. कधी ती वेगात असते, तर कधी हळुवार. नितंब, पोट आदी अवयवांना आकर्षक आकार द्यायचा असेल, कमरेवर आणि कमरेखालील पार्श्वभागावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करायची असेल, तर त्यासाठी बेली डान्स हा एक चांगला पर्याय आहे.
हिप हॉप डान्सही व्यायामाच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. या नृत्य प्रकारात हिप हॉप म्युजिकवर परफॉर्म केला जातो. यात पाँपिंग, लॉकिंग इथपासून ते ब्रेकिंग स्टाईल आदी प्रकारच्या स्टेप्स केल्या जातात. वजन कमी करण्यासाठी हा नृत्य प्रकार फायदेशीर ठरू शकतो. या नृत्य प्रकारात शरीरातील सर्वाधिक कॅलरी बर्न होतात.
आपला शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक समतोल राखणं म्हणजे आरोग्य. हे सर्व आपणास केवळ नृत्यामुळे साध्य होत असेल, तर जिम आणि डाएटचं त्रांगडं हवंय कशाला?