छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेचा समावेश आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मंडळींपर्यंत सारेच इंदूवर भरभरून प्रेम करत आहेत. 'इंद्रायणी' मालिकेच्या आषाढी एकादशी विशेष भागात इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास प्रेक्षकांना पाहता येईल. तर दुसरीकडे आषाढीनिमित्त 'कलर्स मराठी'ने अनोखा उपक्रम आयोजित केला. नाशिकमधील १४५ शाळांमध्ये १६ जुलैला 'इंद्रायणी' हा चित्रपट दाखवला गेला.
अवखळ इंदूचा गोंडस आणि समजूतदारपणा प्रेक्षकांना 'इंद्रायणी' या दोन तासांच्या चित्रपटात पाहायला मिळाला. तसेच व्यंकू महाराज, विठू पंढरपूरकर हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. आषाढी एकादशीला पाठीराखा लाडक्या इंदूची इच्छा पूर्ण करणार का? हे शाळकऱ्यांना या चित्रपटात पाहायला मिळाले.
नाशकातील १४५ शाळांमध्ये 'इंद्रायणी' हा चित्रपट दाखवला गेला. १४५ शाळांमधील अंदाजे एक लाखाहून अधिक विद्यार्थांनी मोठ्या संख्येने 'इंद्रायणी' चित्रपटाचा आनंद घेतला. "इंदूचं विठूरायाबद्दलचं प्रेम, भक्तिभाव आणि श्रद्धा पाहून मन तृप्त झालं. विठुरायाबद्दलचा तिचा प्रवास खिळवून ठेवणारा होता. कोणतंही काम करण्याआधी प्रेमाने विठुरायाचं नामस्मरण केलं पाहिजे. भक्त आणि भक्ताचं नातं पाहायला मिळालं", असं मत चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थांनी मांडलं.