“आपल्या देशात सुमारे २५ कोटी लोकांना दृष्टीदोष झालेला आहे. त्यापैकी १४ कोटी लोक तरी मोतीबिंदूची (कॅटरॅक्ट) समस्या घेऊन जगत आहेत. ग्रामीण भागात तर नेत्रविकार फारच बळावलेले दिसतात. ५० टक्के लोकांना दृष्टीदोष अथवा अंधत्व आलेले आहे,” नेत्रविकाराची ही गंभीर स्थिती ओजस ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलचे प्रवर्तक आणि संचालक डॉ. नितीन देढिया यांनी निदर्शनास आणून दिली. सदर हॉस्पिटलने मॅक्सिव्हिजन ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सशी गठबंधन केल्याच्या समारंभात ते बोलत होते.


डिजिटल तंत्रज्ञानाचा अर्थात् मोबाईल फोन्स व लॅपटॉप यांचा अतिवापर होत असल्याने नेत्रविकारांमध्ये ही भयावह वाढ झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,“लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येत आहे. मोतिबिंदू, मायोपिया, ग्लायकोमा, अंधत्व, डोळ्यांवर ताण, डोळे दुखणे, डोळे कोरडे होणे असे नेत्रविकार वाढीस लागले आहेत. फॅशन म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणाऱ्यांमध्ये देखील हे विकार आढळून येत आहेत.”

गेल्या ४० वर्षात ५० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचा डॉ. देढिया यांचा अनुभव असल्याचे सांगून मॅक्सिव्हिजनचे प्रवर्तक आणि अध्यक्ष डॉ. जी.एम्स.के. वेलू यांनी सांगितले. देशातील ६ राज्यात आपल्या हॉस्पिटल्सचे जाळे असून आता मुंबईसह महाराष्ट्रात १० हॉस्पिटल्स उभारण्याची योजना आहे, त्यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला.
अत्याधुनिक उपचार पद्धतीने दर्जेदार सेवा ओजस मार्फत उपलब्ध असल्याचे सांगून जॉ. देढिया यांनी बॉलिवूडचे कलाकार सुनिल शेट्टी, कबीर बेदी, विद्या बालनचे पती व गीतकार गुलजार आणि लेखक चेतन भगत यांनी आपल्याकडे उपचार घेतल्याचे त्यांनी सांगितले.