पती-पत्नी यांचे मनोमीलन आणि शरीरांचे मीलन होते, तेव्हा कामजीवन सफल होते. मात्र हे कामजीवन केवळ कार्य उरकल्यासारखे असू नये. त्यासाठी पती-पत्नी दोघांनीही कामजीवनात काही शिष्टाचार पाळणे जरुरी आहे. संसार सुखाचा, समाधानाचा चालण्यासाठी पती-पत्नी यांचे मनोमीलन आणि शरीराचे मीलन अत्यंत आवश्यक असते. दोन शरीरांचे मीलन होते तेव्हा कामजीवन सफल होते. मात्र हे कामजीवन केवळ कार्य उरकल्यासारखे असू नये. त्यात धिसाडघाई उपयोगाची नाही. त्याप्रमाणेच तो मामला एकतर्फी असता कामा नये. त्यासाठी पती-पत्नी दोघांनीही कामजीवनात काही शिष्टाचार पाळणे जरुरी आहे. ज्याप्रमाणे आपण समाजात वावरताना, पार्टीमध्ये सहभागी होताना, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होताना किंवा कार्यालयात काही शिष्टाचार पाळतो, त्याप्रमाणेच कामजीवनात शिष्टाचार पाळले पाहिज संमती मिळवा सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये असा एक अपसमज आढळून येतो की, आपलं लग्न झालं म्हणजे सेक्स करण्याचा परवाना आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे आपण पत्नीसोबत पाहिजे तेव्हा शारीरिक उपभोग घेऊ शकतो. परंतु सेक्स संबंधात हा एककल्लीपणा योग्य नाही. शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी पत्नीची इच्छा, तयारी आहे की नाही, हे जाणून घेतलं पाहिजे. तिचा होकार मिळविला पाहिजे. तिच्या देखील इच्छेचा मान ठेवला पाहिजे. परस्पर सामंजस्य आणि परस्परांचा सन्मान करणं याशिवाय चांगले संबंध आणि प्रेम टिकू शकत नाहीत. तेव्हा आपली मनमानी करण्यापेक्षा सेक्स करण्यापूर्वी पलीकडून हिरवा कंदील दिसू द्या. तिच्या संमतीविना लैंगिक संबंध ठेवण्यात मौज नाही. स्वच्छता राखा शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी आणि घडल्यानंतर आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या. अलीकडच्या महामारीच्या साथीत तर या गोष्टीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. तेव्हा या दोन्ही गोष्टी करताना हॅन्ड वॉशचा वापर करा. आपली गुप्तेंद्रिये नीट स्वच्छ ठेवा. त्यावरील केस वाढू देऊ नका. ते नियमितपणे काढा. कामक्रीडा करण्याआधी व केल्यानंतर दोघांनीही आपली गुप्तेंद्रिये स्वच्छ ठेवायला हवीत. चादरी बदला एका सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं आहे की, बव्हंशी जोडपी आपल्या बिछान्यावरील चादर 10-12 दिवस बदलत नाहीत. आपणही त्यांच्यापैकी एक असाल तर तुम्ही रोगांना निमंत्रण देत आहात. आपल्या अंथरुणातील चादरी जर स्वच्छ नसतील तर त्यामध्ये बॅक्टेरिया व अन्य डोळ्यांना न दिसणार्या किटाणूंची पैदास होते. हे किटाणू तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. अन् अशा अस्वच्छ चादरींवर झोपल्याने, त्यावर कामक्रीडा केल्याने त्वचारोग होऊ शकतात. हे त्वचारोग संसर्गजन्य असल्याने जोडीदारास गाठू शकतात. हे सगळे विकार टाळण्यासाठी अगदीच नाही तर किमान 4-5 दिवसांनी आपल्या चादरी बदला. अन् या चादरी नेहमीच गरम पाण्यात व जंतुनाशक द्रव्यात धुवा. अंतर्वस्त्रे बदला अंगाला घट्ट चिकटून राहणारी अंतर्वस्त्रे - ब्रा आणि निकर वेळच्या वेळी बदला. या कपड्यांचे इलॅस्टीक लूज होईपर्यंत किंवा ते विरून जाईपर्यंत वाट बघू नका. कारण अशा जुन्या, बराच काळ वापरत राहिलेल्या अंतर्वस्त्रांमधून आजार पसरतात. शिवाय हे कपडे ओले असताना कधी घालू नका. त्याच्याने रॅशेस् किंवा इन्फेक्शन होऊ शकते. शरीराचा आकार दिसण्यासाठी काही तरुणी घट्ट कपडे घालतात. ते अधिक काळ अंगात घालू नका. रात्री झोपतेवेळी तर सैल अंतर्वस्त्रे व सैल कपडे घाला. आग्रह करू नका आपल्या जोडीदारावर शरीरसंबंध लादू नका. कामसुख बळजबरीने घेऊ नका. घरकाम किंवा ऑफिसातील काम जास्त पडल्याने किंवा मानसिक ताणतणाव वाढल्याने कामक्रीडा करण्याची कदाचित जोडीदाराची इच्छा नसेल तर त्याची मर्जी राखा. एकमेकांची अशी मर्जी राखली तर विश्वासाचं, सलोख्याचं वातावरण तयार होईल. अन् आपला जोडीदार राजीखुशीने सेक्स करण्यास तयार होईल. सक्रिय राहा निरामय कामजीवन उपभोगण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही समसमान वाटा उचलला पाहिजे. आपल्याकडे पूर्वापाड अशी (गैर) समजूत झाली आहे की, समागम करताना पुरुषाने सक्रिय राहायचे नि स्त्रीने निष्क्रिय राहायचे. कित्येक स्त्रिया हा अलिखित नियम पाळल्यागत वागतात. ही समजूत हाणून पाडा. समागमाच्या प्रसंगी दोघांनीही सक्रिय राहा. म्हणजे समाधानाने कामसुख घेता येईल. अन् दोघांचाही आनंद द्विगुणित होईल. शृंगारिक भाषा वापरा कामक्रीडा ही यांत्रिक क्रिया केल्यागत कधीच नसावी. त्यामध्ये प्रणय, औत्सुक्य, उन्माद हवा. तेव्हा या क्रीडेचा आनंद अधिक मिळविण्यासाठी शृंगारिक भाषेचा वापर करा. म्हणजे जोडीदारीची शरीरयष्टी, अवयव, चुंबन आणि आलिंगनाचे कौशल्य यांची तारीफ करा. खास करून प्रत्यक्ष समागमाआधीच्या प्रणयचेष्टेत ही भाषा वापरणे, जास्त रंजक होईल. मात्र खोटी स्तुती करू नका, स्वतःबाबत बढाया मारू नका. शृंगारिक भाषेने प्रणयचेष्टा (फोर प्ले) अधिक रंगतदार होईल. अपशब्द वापरू नका शृंगारिक भाषेने कामक्रीडेचा आनंद वाढेल, हे निश्चित. पण त्यात अपशब्द वापरू नका. चेष्टेने का होईना, पण नकारात्मक शेरे मारू नका. म्हणजे पोट किती सुटले आहे… मांड्या खांबासारख्या झाल्यात… अंगावर मास वाढलंय्… शरीर किती सुटलंय्… असे शेरे मारू नका. कारण असे अपशब्द वापरल्याने जोडीदाराचे मनोबल खचते. त्याचा मूड निघून जातो. तेव्हा नकारात्मक नव्हे तर कौतुकाचे शब्द वापरा. घाई करू नका कामक्रीडेमध्ये उत्कर्ष बिंदूला पोहचताच बव्हंशी स्त्री-पुरुषांमध्ये लवकर विलग होण्याची प्रवृत्ती असते. एकदाचे कार्य उरकले, या भावनेने ते एकमेकांपासून दूर होतात. काही पुरुष मंडळी तर कूस बदलून लगेच झोपी जातात. निरोगी कामजीवनासाठी ही कृती योग्य नव्हे. उत्कर्ष बिंदू गाठल्यानंतर देखील गात्रांमध्ये मदन संचारत राहतो. त्याला अचानक शांत करू नका. चुंबन-आलिंगन या क्रिया चालू ठेवा. शृंगारिक भाषेचा याही प्रसंगी वापर करता येईल. आपल्या जोडीदाराने कसे समाधान दिले व घेतले याची उजळणी करता येईल. या गोष्टींनी कामक्रीडेची खुमारी अधिकच वाढेल.
Link Copied