उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. आणि मुले संपूर्ण दिवस खेळण्यात वेळ घालवतील. हे तुम्हाला अजिबात पसंत पडणार नाही. त्यामुळे मुलांच्या आवडीनुसार त्यांना कोणत्यातरी छंद वर्गात दाखल करा. जिथे त्याच्या कलागुणांना वाव तर मिळेलच पण त्यांची प्रतिभादेखील खुलून येईल.
मुलांची कल्पकता, त्यांची बौद्धिक क्षमता वयोगटानुसार बदलते असते. त्यांना त्या त्या वयात योग्य संस्कार मिळाले तर त्यांचा सर्वांगीण विकास उत्तमरित्या होतो.
वय 4 ते 8
या वयातील मुलांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी करायला आवडतात. त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी हे छंदवर्ग निवडू शकता.
चित्रकला- मुलांना वेड्यावाकड्या रेषा काढून रंगवायला फार आवडते. अशा मुलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे त्यांच्या कल्पकतेचा विकास होतो.
वृक्षारोपण- यात मुलांना झाडे लावणे, त्यांची योग्य निगा राखणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. यामुळे त्यांच्या मनात लहानपणापासूनच निसर्गाबद्दल प्रेम व आस्था निर्माण होण्यास मदत होते.
मातीकाम- येथे मुलांना मातीपासून वेगवेगळी भांडी, वस्तू बनवायला शिकवतात. मुलांना मातीत खेळायला जर आवडत असेल तर मुले फारच मजा करू शकतील.
टाकाऊपासून टिकाऊ- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा बनवाव्यात याचे प्रशिक्षण अशा क्लासेसमध्ये दिले जाते. ज्यात फोटो फ्रेम, तुटलेल्या मातीच्या मडक्यापासून एखादा शो पीस अशा गोष्टी शिकवल्या जातात.
नृत्य व संगीत- मुलांना जर संगीताची किंवा नृत्याची आवड असेल तर तुम्ही नक्की याचा विचार करू शकता. उन्हाळी सुट्टीत क्लासला गेल्यामुळे खरंच जर मुलांना यात रस असेल तर ते यात आपले करिअर देखील करू शकतील.
योगा- मुलांना व्यायामाची आवड असेल तर हा पर्याय एकदम उत्तम. योगा मुळे मुलांची शारीरिक क्षमता तर वाढतेच पण मुले अगदी उत्साही राहतात.
स्विमींग- मुलांना जर साहस किंवा साहसी खेळ आवडत असतील तर त्यांना पोहायला पाठवू शकता. यामुळे देखील मुले फारच उत्साही होतात.
वय 9 ते 13
या वयातील मुले थोडी समजुतदार असतात. स्वतःला काय आवडते हे त्यांना माहित असते. त्यामुळे तशाप्रकारचे छंद वर्ग मुलांसाठी योग्य असतात.
कॅलिग्राफी- मुलांचे हस्ताक्षर जर सुंदर असेल तर त्यांना या क्लासला नक्की पाठवा. वेगवेगळ्या ब्रश, पेन, पेन्सिलच्या साहाय्याने त्यांना व्यक्त होण्यास प्रवृत्त केले जाते.
वैज्ञानिक प्रयोग- जर मुलांना नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना सायन्स क्लब मध्ये घालू शकता. तेथे नवनवीन प्रयोग करून नवीन गोष्टी शिकविण्यावर जास्त भर दिला जातो.
मैदानी खेळ- मुलांना खेळायला जास्त आवडत असेल एखाद्या खेळात म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, खो खो अशा खेळात रस असेल तर त्याला पाठवू शकता.
परदेशी भाषा- जर मुलांना बोलायला फार आवडत असेल तर तुम्ही त्यांना एखादी परदेशी भाषा शिकण्यासाठी पाठवू शकता. ज्यामुळे मुलांचे ज्ञान तर वाढेलच पण पुढील आयुष्यात देखील याचा फायदा होईल.
अभिनय- जर मुलांना अभिनय करण्याची आवड असेल तर तुम्ही मुलांना अशा कार्यशाळेत पाठवू शकता. जेथे मुलांना अभिनयाचे धडे मिळतील व मुलांच्या सुट्ट्या आनंददायी जातील.
वय 14ते 16
तसं पाहिलं तर या वयातील मुले स्वतःच्या आवडीनिवडी जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. त्यामुळे त्यांची आवड विचारात घेऊनच त्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गुंतवावे.
फॅशन डिझायनिंग- अशा कोर्सेसमध्ये बेसिक फॅशन डिझायनिंग, स्केचिंग, रंगसंगती याचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे मुले पुढे जाऊन यातच आपले भविष्य घडवू शकतात.
फोटोग्राफी- काही मुलांना फोटो काढण्याची आवड असते. एखादे साधेसेच दृश्य ते आपल्या कल्पक दृष्टीने असे काही टिपतात की चांगली फे्रमच तयार होते. त्यांच्यासाठी फोटोग्राफी हा अगदी उत्तम पर्याय आहे.
लेखन- यात मुलांचे लेखन कौशल्य वाढवले जाते. विषयानुसार लेखन, भाषा सुधरवणे, विचार करून लिखाण करणे अशा गोष्टींवर भर दिला जातो. चित्रपट, नाटक, मालिका या क्षेत्रात लेखक म्हणून काम करू शकतात.