Close

एका लग्नाची दुसरी गोष्ट ( Eka Lagnachi Dusari Goshta)

जानेवारी महिना उजाडला, जानेवारी महिना आमच्या सोलापूरकरांना मोठी पर्वणीच असते. जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या उत्सवानिमित्त सोलापुरात मोठी जत्रा भरते. कर्नाटक, आंध्र, गुजरात आणि महाराष्ट्रातील सर्व भागातून ह्या जत्रेसाठी भक्तगण मोठ्या संख्येनं हजर असतात. चार दिवस चालणार्‍या या जत्रेत सिद्धेश्‍वर महाराजांचा विवाह संपन्न झाला की, बाकीच्या लोकांना म्हणजे जे विवाहासाठी उपवर आहेत, ते विवाह करण्यास मोकळे. यंदाच्या वर्षी विवाहाचे मुहूर्त देखील भरपूर आहेत. अशा बातम्या वृत्तपत्रे देतच होती, हे ऐकून आणि वाचून मी थक्क झालो. कारण एवढ्या मोठ्या लग्नाच्या सीझनमध्ये भरपूर लग्नपत्रिका येणार, ओळखीचे पाळखीचे, नातेवाईक यांच्यापैकी कोणाचे ना कोणाचे लग्न असावयाचे. त्यामुळे यंदाच्या वर्षी भरपूर रजा काढाव्या लागणार, भरपूर आहेरासाठी खर्च करावा लागणार याची पक्की खात्री झाली.


पण घडलं भलतंच! नियतीच्या मनात नेहमीच काही वेगळं असतं. यंदाच्या वर्षी मला एक देखील लग्नाची पत्रिका आली नाही. एप्रिल गेला, पूर्ण मे महिना गेला, तसा जूनचा महिना पण चालला.
असाच मी जूनच्या शेवटच्या रविवारी काही कामानिमित्त नवी पेठेत गेलो होतो. त्यावेळी माझ्या शाळेतील माझा जुना मित्र हेमंत साठे अचानक भेटला आणि ‘अलभ्य लाभ’ असे म्हणत मला मिठी मारली आणि म्हणाला, ‘कुठे असतोस बे हल्ली?’
मी म्हणालो, “कुठे असणार! सोलापूरातच! तू कुठे असतोस?” मी पण त्याला विचारले.
कारण मी आणि हेमंत साठे आम्ही दोघेही लंगोटी यार. रोज आमची वर्गात भेट झाली असली तरी संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन भेट घेऊन गप्पा मारल्याशिवाय आम्हा दोघांना चैनच पडायची नाही.


तेव्हा तो म्हणाला, “मी हल्ली पुण्याला असतो. मी बँकेत नोकरीस आहे.”
“मग मुलंबाळं काय करताहेत,” मी विचारले.
“अरे तेच तर सांगतोय. माझ्या मुलाचं लग्न ठरलंय. पुण्यात सर्वात मोठं मंगल कार्यालय आहे. जुलै महिन्यातील शेवटची तिथी आहे लग्नाची. ती म्हणजे 4 जुलै 2014,” असे म्हणून पिशवीतून एक पत्रिका काढली, माझं नाव त्यावर लिहिलं आणि मला दिली.
पण तशी रस्त्यावर पत्रिका घेणार्‍यापैकी मी नव्हतो. त्याला मी सरळ म्हणालो, “घरी येऊन पत्रिका दिली तरच मी स्वीकारेन.”
त्याने घरी यायची तयारी दाखविली. पण त्याने देखील मला अट घातली, “मी फक्त पाचच मिनिटे थांबणार.”
मी त्याची अट मान्य केली. त्याला माझ्या गाडीवरच घरी घेऊन आलो. त्याची ओळख माझ्या पत्नीशी करून दिली आणि माझ्या पत्नीची ओळख माझ्या मित्राशी करून दिली. त्यावर त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या.
ह्याच संधीचा फायदा घेऊन मी फक्त 10च मिनिटं बाहेर पडलो आणि आलो देखील. मी घरात आल्या आल्या पत्नीला किचनमध्ये बोलावून घेतलं आणि पिशवीतून आणलेल्या पुड्यातील पदार्थ डिशमध्ये घालून देण्यास सांगितले आणि मी हॉलमध्ये आलो. मी बाहेर आल्याबरोबर ताबडतोब परवानगी देण्याची विनंती केली. एवढ्यात माझी पत्नी खमंग ढोकळा, कचोरी व गुलाबजामूनची डिश घेऊन बाहेर आली.
“कशाला रे, कशाला!” असे म्हणत हेमंतने डिश फस्त केली.
खाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी त्याला सोलापुरी चादर भेट दिली. तो एकदम आश्चर्यचकीत झाला आणि म्हणाला, “तू तर मला केळवणच केलंय!”
मी फक्त होय म्हणालो, त्याने मुलाच्या लग्नाची पत्रिका देऊन रीतसर निमंत्रण दिलं आणि नाही आलास तर याद राख! असा दमपण दिला.
बर्‍याच दिवसात लग्नाच्या सीझनमध्ये कोणाचंच निमंत्रण नाही. कुठल्याच कार्याचं यथासांग भोजन नाही, त्यामुळे मी बर्‍याच प्रमाणात अस्वस्थ होतो. त्यामुळे मी माझा मित्र हेमंत साठे यांच्या मुलाच्या लग्नाला जायचा बेत पक्का केला.
रिझर्वेशन तर फुल्ल होतं, वेटिंग होतं. दुपारी दोनच्या इंद्रायणी एक्सप्रेसनी पुण्याला जाण्याचं पक्क केलं. जायच्या दिवशी माझं वेटिंगवर असलेलं रिझर्व्हेशन कन्फर्म झालं. 3 जुलैला मी संध्याकाळी 6 वाजता पुण्यात पोहोचलो. पुण्याला माझे 2 मामा असतात. एक सहकारनगरला तर दुसरा कोथरुडला. लग्नाचे कार्यालय मला सहकारनगर वरून जवळ पडत असल्याने माझ्या सहकारनगरमधील मामाच्या घरी मुक्कामाला जाणं पसंत केलं.
बर्‍याच दिवसानंतर मामाच्या घरी मुक्काम पडल्याने रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा झाल्या. त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. सकाळी झोपेतून उठून भराभरा आवराआवर केली. कारण पुण्यामध्ये बसची संख्या जरी भरपूर असली तरी आपल्याला हवी असणारी सिटी बस मिळण्यास एक तास तरी लागतो. हा पूर्वानुभव आहेच. माझी गडबड पाहून मामा मला म्हणाला, “अरे, बसने जाण्याचा विचार करू नकोस, माझी मोटर सायकल घेऊन जा. लायसन आहे ना तुझ्याजवळ.”
मी हो म्हणालो.
मग काय… गाडी आहे म्हटल्याबरोबर निवांतपणे नाष्टा केला. लग्नाचा मुहूर्त तर 12.30 वाजता होता. वेळेच्या आधी अर्धा तास गेले तरी चालेल. म्हणून मुहूर्ताच्या आधी अर्धा तास निघालो.
पण तेथील गर्दी आणि ट्रॅफिक जाम यामुळे अगदी कट्टाकटी मुहूर्तावर कसाबसा पोहोचलो. मंगल कार्यालयासमोर अनेक दुचाकी वाहने लावण्यात आली होती. माझे वाहन कुठे लावावे हे समजेना. गाडी लावण्यासाठी जागा हुडकायला एक फर्लांगभर दूर जावे लागले. तेथून चालत यावे लागले.
मंगल कार्यालयाजवळ गेलो. ते मंगल कार्यालय वरच्या मजल्यावर होते म्हणून लगबगीने मी वर जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण गर्दी इतकी होती की, सर्व अक्षतासाठी आलेले लोक जिन्याच्या पायरीवर गर्दी करून उभे होते. मी जिन्यात शिरल्यावर माझ्या मागून देखील कित्येकजण येथून गर्दी करून उभे होते. मला पुढे देखील जाता येईना, आणि मागे देखील सरकता येईना. मधल्यामधे माझे सँडविच झाले.


थोड्याच वेळात बँड वाजायला लागला. मंगलाष्टक संपल्याची जाणीव झाली. पुण्यासारख्या ठिकाणी कोणालाच वेळ नसतो, अक्षताला देखील हजर नसतात. फक्त जेवणाची पंगत बसली की प्रथम जेवण उरकून घेतात. गर्दीमध्ये घुसून नवरा-नवरी ज्या स्टेजवर बसलेले असतात, तेथे पोहोचतात. स्वतःच ठळक अक्षरात नाव लिहिलेले पाकीट देऊन पटकन मंगल कार्यालयाच्या बाहेर येतात आणि आपापल्या कामाला निघून जातात.
अक्षतांचा कार्यक्रम संपल्या संपल्या सर्वत्र गडबड सुरू झाली. जो तो पुढे पुढे जाण्याचा भगीरथ प्रयत्न करत होता. मी देखील पुढे जाऊन चटकन आहेराचं पाकीट देऊन जेवण करून बाहेर पडण्याच्या विचारात होतो. माझा मित्र देखील एवढ्या लग्नाच्या माणसांच्या गर्दीत कोठे हरवून गेला होता देव जाणे. कारण माझ्या मित्राशिवाय कोणी ओळखत देखील नव्हतं.
एवढ्यात माझ्यासारखा समदुःखी मला भेटला आणि मला म्हणाला, “तुम्ही पहिल्यांदा नवरा नवरीला भेटणार की, पहिल्यांदा जेवणार?”
मला एक मिनिट काय उत्तर द्यावं हे समजलंच नाही, म्हणून मी त्या सद्गृहस्थाला प्रतिप्रश्‍न केला, “तुम्ही काय करणार आहात?”
तो गृहस्थ म्हणाला, “प्रथम मी जेवणार आहे. कारण नवरा नवरीला भेटून, आहेर देण्यास कमीत कमी एक तास तरी लागणार आहे. नंतर जेवणाची पंगत पूर्ण भरून जाईल, तितकेच लोक जेवण्यासाठी वेटिंगला थांबतील. मग विनाकारण दोन तीन तास आपले वाया जातील आणि पुण्यासारख्या उद्योगी पुरुषाला वेळ वाया जाणं, हे परवडण्यासारखं नाही.”
वास्तविक पाहता मला देखील नवरा नवरीला भेटून आहेर देऊन, मित्राची गाठ घेऊन मग जेवणे पसंत होते. इतकेच नव्हे तर माझ्या मित्रांनी मला वैयक्तिकरीत्या सन्मानाने, जेवल्याशिवाय जायचे नाही बरं का! असे विनंतीपूर्वक आग्रहाच्या वाक्याची अपेक्षापण होती.
पण काय करणार? परिस्थितीही हाताबाहेर गेली होती. त्यामुळे साहजिकच पुण्यातील त्या गृहस्थाचं म्हणणं मला पसंत पडलं आणि शेवटी पुणेकरांसारखं वागणं भाग होतं, म्हणून मी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि जेवणाच्या पंक्तीतील शेवटच्या जागा मिळाल्या. त्यामुळे आम्हांला विचित्र अनुभव आला. पानामध्ये भात वाढून गेले, वरण तूप आणलेच नाही. वाट पाहून चटणी व कोशिंबिरीसोबत भात खाल्ल्यानंतर साधं वरण घेऊन एक वाढपी बाई आली, पानात भात नाही हे पाहून पुढे निघाली. माझ्या शेजारी बसलेला गृहस्थ म्हणाला, “अहो, वरण वाढा की! एक तर भात वाढल्यापासून पंधरा मिनिटांनी वरण वाढायला आणलात, वाढा वरण वाटीत किमान शेवटच्या भाताला तर उपयोग होईल.”
पाठोपाठ तूप घेऊन एक बाई आली. पानात भात नाही म्हणून तशीच पुढे चालली. शेवटी तो गृहस्थ म्हणाला, “अहो वरणावर तूप वाढा की !!”
ती वाढपी बाई म्हणाली, “अहो भात कुठाय?”
त्यावर तो गृहस्थ खवळून म्हणाला,“अगं बाई वरणात तूप वाढ की, तुझ्या बापाचं काय जातंय?”
रागानं बोलल्यामुळे ती बाई चमच्यानं तूप वाढतेवेळी, तुपाचं भांडं तिच्या हातातून निसटलं आणि संपूर्ण ताटात जवळजवळ पाव किलो तूप पडलं. तो तडक पानावरून उठला आणि भटारखान्यात जाऊन भांडण करू लागला. इकडे जिलेबी वाढपी आला, पण काय जिलेबी मध्येच संपली. म्हणून जिलेबी आणण्यासाठी तो वाढपी गेला. त्याच्या मागे मठ्ठेवाला आला. मठ्ठा कशात घ्यावा? याची पंचाईत झाली. शेवटी मी वरण पिऊन घेतले आणि मग त्याच वाटीत घेतला. पाठोपाठ पुण्याची फेमस असलेली अळूची भाजी आली. अळूच्या भाजीचा मोह मला आवरता आला नाही. पिऊन वाटी रिकामी केली आणि त्याच वाटीत अळूची भाजी घेतली. अळूच्या भाजीला वास्तविक पाहता पोळीची गरज होती. पण त्या वेळेस नेमकी गरम गरम जिलबी आली बर्‍याच वेळानंतर आणि प्रतीक्षेनंतर गरम जिलबी आल्याने जिलबी घेतली. जिलबी वाढणार्‍यांनी उंदराच्या कानाएवढ्या छोट्या छोट्या दोन जिलेब्या वाढल्या.
शेवटी मी रागानं म्हणालो, “ज्यादा वाढा की दहा बारा जिलेब्या.” असे म्हटल्यावर त्या कटोर्‍यात असणार्‍या सर्व जिलब्या त्यानं पाकासह माझ्या पानात वाढल्या. मी काही बोलण्याच्या आतच तो तेथून पसार झाला. गोड जिलेब्या मला जाईनात. शेवटी मी त्या जेवढ्या जातील तेवढ्या जिलेब्या आळूच्या भाजीत बुडवून खाल्ल्या. शेवटचा भात खाण्याची पण इच्छा झाली नाही.
पानावरून उठलो आणि नवरा- नवरी ज्या स्टेजवर उभे होते तेथे गेलो. तोपर्यंत गर्दी ओसरली होती. आहेराचे पाकीट त्या नवर्‍या मुलाच्या हातात देऊन
शेकहॅण्ड केला. मी त्याला,“ तुझे वडील कुठे आहेत?” ते विचारले.
त्यावर तो म्हणाला, “असतील येथेच कुठेतरी!”
“बरं ठीक आहे.” म्हणून तेथून निघालो.
जिन्याच्या पायर्‍या उतरून खाली आलो. तेथे त्या कार्यालयाच्या बाजूला एक सुंदर असे गार्डन होते. ते सुंदर गार्डन पहावे असा मनात विचार आला, तेवढ्यात माझा मित्र हेमंत साठे समोर आला आणि म्हणाला, “अरे किती उशीर केला. चल लवकर.” असे म्हणून हात धरून जेवणाच्या हॉलमध्ये घेऊन गेला. मला काय भानगड झाली आहे, हे ध्यानातच येईना.
एवढ्यात तो म्हणाला,“अरे, वरती कशाला गेलास आपलं लग्न खालच्या मजल्यावर होतं. आता पटकन जेवायला बस म्हणजे झालं!”


मी म्हणालो, “नाही मी आधी जेवणार नाही, प्रथम मी वधू-वरांना भेटेन.”
माझ्या मित्रानं मला वधू-वराच्या स्टेजकडे वरून जाण्यास सांगितलं. आता माझ्याजवळ त्याची भेट घेऊन देण्यासाठी आहेराचे पाकीट देखील नव्हते. खिशातून त्यांच्या लग्नाची पत्रिका काढून पाहिली. त्यात खाली स्पष्ट उल्लेख होता, आहेर स्वीकारला जाणार नाही.
हे वाचल्यावर आनंद झाला. लगेच मी वधू-वराला भेटण्यासाठी गेलो, माझी ओळख करून द्यायला कोणीच उपस्थित नव्हतं. शेवटी अगदी नाइलाजास्तव माझी मीच ओळख करून दिली. त्याने माझा परिचय किती मनावर घेतला देव जाणे. कारण माझ्याकडे पाहून हसत असताना, कोणीतरी उपटसुंभ नवरदेवाच्या हातात स्वतःचा हात घेऊन हस्तांदोलन करत बोलू लागला. त्याचे लक्ष विचलित होऊन त्याच्याकडेच पाहून नवरदेव खदाखदा हसू लागला. बहुतेक कोणीतरी त्याच्या बायकोचा नातेवाईक असणार.


मी पहिल्या मजल्यावरून कार्यालयाच्या बाहेर आलो. तेथे एक अनोळखी गृहस्थ उभा होता. त्याने समोर येऊन मला सांगितलं की, आमच्या साहेबांनी आपणास वर बोलावलंय.
मला पुण्याला कोणीतरी ओळखतंय. याचा मला आनंद झाला. कोण साहेब आहे, असा विचार करत त्या अनोळखी व्यक्तीबरोबर मी गेलो. वधू पक्षाच्या खोलीत मला नेण्यात आलं. मी अगदी ऐटीत गेलो.
त्या खोलीत जेव्हा प्रवेश केला. तेव्हा दुतर्फा चार-चार माणसं ओळींनी बसलेली होती. गेल्या गेल्या माझी त्यांनी हजेरी घेण्यास सुरुवात केली.
पहिल्याने विचारले, “तुम्ही कोणाच्या लग्नाला आलात?”
“माझा मित्र साठे याच्या मुलाच्या लग्नाला आलो.”
“मग आमच्याकडे जेवायला का आलात?”
“मी, मी चुकून आलो. आपल्या येथे एवढं मोठं कार्यालय, पण कोठेही बोर्ड नाही.”
असं मी म्हणताच, त्याने माझा हात धरला आणि सर्व जिने उतरून मला खाली आणलं. समोरच गार्डन होतं. त्या गार्डनमध्येच एक मोठा बोर्ड स्टॅण्डला अडकवून ठेवला होता.
पहिला मजला- गोखले साठे विवाह
दुसरा मजला - कुलकर्णी देशपांडे विवाह
बोर्ड वाचल्यावर मी त्याला सॉरी म्हणालो. सॉरी म्हटल्यावर तो माझ्यावर जाम खवळला आणि मला टाकून बोलला, “सॉरी म्हटलं की झालं. फुकटच खाऊन गेलात. असे किती लोक त्यांचे आमच्याकडे जेवून गेले कोणास ठाऊक. तुमच्यामुळे आमची शंभर माणसे उपाशी राहिलीत.”
असे म्हणून डोळे मोठे करून माझ्याकडे रागाने पाहून निघून गेला. मी मनातून ओशाळलो. माझीच मला लाज वाटायला लागली.
मीच तो गार्डनमध्ये लावलेला बोर्ड वाचावयाला हवा होता. ‘वाचाल तर वाचाल’ हे मला पटले.
एका लग्नासाठी म्हणून गेलो, त्याची दुसरीच गोष्ट झाली.
म्हणून आज देखील मी लग्नाची पत्रिका नीट वाचून तेच कार्यालय असल्याची खात्री करून घेतो. परत माझ्या आयुष्यात एका लग्नाची दुसरी गोष्ट व्हायला नको.

-रामकृष्ण अघोर

Share this article