ड्रायफ्रुट पुरणपोळी
साहित्य : सारणासाठी : अर्धा कप काजू, अर्धा कप बदाम, अर्धा कप पिस्ता, 2 टेबलस्पून खोबर्याचा कीस, 1 टेबलस्पून वेलची पूड, अर्धा टेबलस्पून जायफळ पूड, अर्धा कप पिठीसाखर.
पिठासाठी : 1 कप मैदा, 1 कप साजूक तूप, चिमूटभर मीठ, अर्धा कप दूध.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/majhisaheliuploads/2021/03/dryfruit-puran-poli-248x250.jpg)
कृती : सर्वप्रथम काजू, बदाम आणि पिस्ता मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात खोबरं, वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. त्यात पिठीसाखर मिसळून मिश्रण 15 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. आता एका परातीमध्ये मैदा, मीठ आणि 2 चमचे साजूक तूप एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार दूध मिसळून घट्ट पीठ मळा. हे पीठ 15 मिनिटांकरिता झाकून बाजूला ठेवून द्या. आता सारणामध्ये थोडं तूप आणि दूध घालून ते एकसंध होईल अशा प्रकारे मळा. आता मैद्याची जाडसर पुरी लाटून त्यावर सारणाचा गोळा ठेवून, पुन्हा गोळा तयार करा. त्या गोळीच्या जाडसर पुरणपोळ्या लाटून घ्या. या पुरणपोळ्या गरम तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. पोळी आचेवरून खाली उतरवल्यावर त्यावर दोन्ही बाजूने तूप पसरवा. स्वादिष्ट ड्रायफ्रुट पुरणपोळी तयार.
टीप : सारण एकसंध करण्यासाठी केवळ दूध किंवा केवळ तूपही घालता येईल. मात्र दूध आणि तूप समप्रमाणात घातल्यास चव छान येते.