महिलावर्गाला दागिन्यांचा सोस फारच असतो. लग्न, पूजा, वास्तू, वाढदिवस या समारंभाला व दसरा, दिवाळी, अक्षय्य तृतीया या सणांना दागिन्यांची खरेदी होतच असते. मात्र या सोन्याच्या दागिन्यांचे संरक्षण कसे करावे, याची चिंता घरच्यांना लागून असते. कारण अनादि कालापासून त्यांची चोरी करणारे चोरटे वावरत आहेतच. मग बँकेचे लॉकर ही आपल्याला दागदागिने ठेवायला सुरक्षित जागा वाटू लागते. पण अलिकडच्या काळात या लॉकर्सची भाडी भरमसाठ वाढली आहेत. शिवाय काही बँका लॉकर्स देण्याच्या मोबदल्यात मोठ्या रकमेचे फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा आग्रह धरतात. ते मध्यमवर्गीयांना परवडेनासे असते. त्यामुळे दागिने घरात ठेवायचे म्हणजे चोरांची भीती आणि मनाची चिंता यांनी बव्हंशी लोक ग्रासलेले दिसतात.

पण आता चोरांना चकवा देणारी व आपली काळजी मिटविणारी अत्याधुनिक उपकरणे आली आहेत. सुरक्षित लॉकर्स आणि तिजोऱ्या बनविण्याची प्रदीर्घ परंपरा असलेल्या गोदरेज कंपनीने ही तंत्रज्ञानयुक्त लॉकर्सची श्रेणी सादर केली आहे. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि गोदरेज ग्रुपचे सिक्युरिटी सोल्युशन हेड पुष्कर गोखले यांनी या डिजिटल लॉकर्सची माहिती दिली. “आपल्या घरांना शोभतील व विकसित होणाऱ्या गरजांसह आम्ही स्वतःमध्ये बदल केला व ग्राहकांना भेटून, संशोधन करून नवीन ७ लॉकर्स व सेफ सादर केले आहेत. ज्वेलर्स, बँका, हॉलमार्क सेंटर आणि घरगुती वापरांसाठी या लहानमोठ्या तिजोऱ्या आहेत.”
ग्राहकांना मानसिक शांती लाभावी, हा यामागचा दृष्टीकोन असल्याचे व बड्या ज्वेलर्सना वरदान ठरावे, अशी ही उपकरणे असल्याचे त्यांनी सांगितले. वामन हरी पेठे या नामांकित पेढीचे मालक आशिष पेठे यांनी याबाबत आनंद व समाधान व्यक्त केले आहे.