त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामध्येच डोळ्यांखाली वर्तुळे येण्यासारखीदेखील समस्या उद्भवते. आजकाल ही खूपच कॉमन समस्या आहे. आपण याची कारणं आणि त्यावरील उपाय पाहणार आहोत. तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग अर्थात डार्क सर्कल्स दिसतात का? आजकाल ही खूपच कॉमन समस्या आहे. आजच्या काळात व्यस्त जीवनशैली, झोपेचा अभाव, मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त काम करणे आणि बराच वेळ टीव्ही पाहणे यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहर्याचं सौंदर्य खराब करतात. यामुळे आपण आजारी असल्यासारखे दिसतो. काळी वर्तुळं नक्की का निर्माण होतात? अनुवंशिक - काही जणांच्या बाबतीत डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे ही अनुवंशिक असतात. त्यावर बर्याचदा काहीही उपचार केले तरीही ते डाग तसेच राहतात. सूर्यकिरण - सूर्यकिरण हे चेहर्यावर डाग येण्याचं मुख्य कारण आहे. त्वचेतील मेलॅनीनचं प्रमाण सूर्यकिरणांमुळे वाढतं. जेव्हा आपली त्वचा सतत सूर्यकिरणांच्या संपर्कात येते तेव्हा हे मेलॅनीन कमी अधिक प्रमाणात वाढतं आणि काळे डाग वाढतात. तणाव - आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रचंड तणाव येतो. तसंच झोपही पूर्ण होत नसते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होऊ लागतात. वाढतं वय - वाढत्या वयात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामध्येच डोळ्यांखाली वर्तुळे येण्यासारखीदेखील समस्या उद्भवते. वयाच्या चाळीशीनंतर साधारण त्वचेची पुनर्निर्मितीची क्षमता कमी होते. त्यामुळे काळी वर्तुळे अधिक वाढतात. प्रदूषण - प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये धूळ जमा होते आणि त्याचा परिणाम चेहर्यावर आणि डोळ्यांखाली डाग निर्माण होण्यात होतो. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी डोळ्याखालील काळी वर्तुळं घालविण्यासाठी खास टिप्स शेअर केल्या आहेत. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी काळ्या वर्तुळांच्या या समस्येयवर मार्गदर्शन केलंय. काळ्या वर्तुळांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलंय. आहारातील बदल दररोज आले आणि तुळशीचा चहा प्या : डोळ्यांखाली असलेल्या काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी आले, तुळस, मध आणि केशरचा चहा पेणं हा एक उत्तम उपाय आहे. या चहाचे नियमित सेवन केल्याने केवळ डोळ्यांखालची काळी वर्तुळेच नाही तर डोळ्यांचा थकवा सुद्धा दूर होतो. शेंगदाणे आणि गूळ : शेंगदाणे आणि गूळ नारळाच्या तेलात मिसळून खाल्ल्याने काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळते. यासाठी शेंगदाणे, गूळ आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून खा. संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी दुपारी 3.30 ते 4 दरम्यान खाऊ शकता. अर्धा तास विश्रांती घ्या : दुपारी दिवसातून अर्धा तास झोपूनही काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते. म्हणून, दुपारी किमान अर्धा तास तरी विश्रांती घ्या आणि रात्री 11 वाजण्याच्या आधी झोपण्याची सवय लावा. बेसन आणि ताजे दूध : ज्या व्यक्तींच्या डोळ्याखाली काळी गडद वर्तुळं आहेत अशा व्यक्तींना साबण आणि फेस वॉश टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी घरगुती क्लींजर वापरण्यात यावं, असं ऋजुता दिवेकर सांगतात. आपण ताज्या दुधात बेसन मिक्स करून ते मिश्रण साबण आणि फेस वॉशऐवजी वापरू शकतो. यामुळे डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. काळ्या वर्तुळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी योग आसने योग आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. योगद्वारे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. योगासने केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहेत. योगद्वारे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करता येते. अशा परिस्थितीत आज आपण डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही योगासनांविषयी जाणून घेणार आहोत. या योगासनांमुळे तुमची काळी वर्तुळे तर दूर होतातच पण त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात. सिंहासन : कृती : सिंहासन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पाय पाठीमागे नेऊन टाचांवर बसा. टाचा नितंबाच्या दोन्ही बाजूला टेकवा. दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवा. आता उजव्या हाताचा पंजा उजव्या गुडघ्यावर व डाव्या हाताचा पंजा डाव्या गुडघ्यावर ठेवा. नंतर दोन्ही नाकपुड्यांतून व तोंडातून श्वास बाहेर सोडत असतानाच जीभ जास्तीत जास्त बाहेर काढा. जीभ बाहेर काढत असतानाच आतील संपूर्ण श्वास बाहेर सोडा. आता संपूर्ण श्वास बाहेर सोडून झाल्यावर परत श्वास घेऊ नका, काही वेळासाठी श्वास बाहेरच रोखून धरा. आता ताठ बसून राहा. चेहर्यावरचे सर्व स्नायू खेचले जातील व चेहरा भयानक दिसेल अशा प्रकारे डोळे ताणून उघडे ठेवा. दृष्टी नाकाच्या शेंड्यावर रोखून धरा. या स्थितीत सहा ते आठ सेकंदापर्यंत स्थिर राहा. या आसनामुळे चेहरा सुंदर व तेजस्वी बनतो. सर्वांगासन : कृती : सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपावे. आता श्वास पूर्ण आत घ्या आणि रोखून धरा. हळू हळू पाय वर करा. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या, ही कृती करतांना दोन्ही हाताचे कोपरे जमिनीवर टेकले पाहिजेत. पाठीचा कणा आणि पाय दोन्ही सरळ एका रेषेत ठेवा. खांदे आणि मान जमिनीवर टेकलेली असू द्या. आता हळूहळू श्वासोश्वास चालू ठेवा. दृष्टी पायाच्या अंगठ्यावर केंद्रित करा. या स्थितीत शरीराचा सर्व भार खांद्यावर येईल. शरीराचा तोल जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. या स्थितीत आपले चित्त गळ्याच्या पुढील भागात असलेल्या थॉयरॉईड ग्रंथीवर केंद्रित करावे. या स्थितीत असताना डोळे उघडे ठेवले किंवा बंद केलेले असले तरी चालतील. पर्वतासन : कृती : प्रथम आपल्या आसनावर पद्मासनात बसा. दोन्ही हातांचा नमस्कार करून छातीजवळ ठेवा. जोडलेले दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर न्या. आपल्या दोन्ही तळहातांची बोटे एकमेकांना चिकटलेली राहतील. तसेच दोन्ही हात आपल्या कानांना चिकटतील आणि सरळ वरती ताठ राहतील, कोपर्यामध्ये वाकणार नाहीत याची काळजी घ्या. दोन्ही हात वर नेताना श्वास आत घ्या. हात वरती ताणले गेल्यावर काही वेळासाठी श्वास रोखून धरा. आता हळूहळू दोन्ही हात खाली आणा. हात खाली आणताना हळूहळू श्वास सोडा. या आसनाचा 4 ते 5 वेळा सराव करा. शांभवी मुद्रा : ही एक योग मुद्रा आहे. यात दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या भुवयांकडे नेऊन आपल्या भुवयांमध्ये किंवा तिसर्या नेत्राकडे, डोळे उघडे ठेवून एकटक बघत राहण्याच्या मुद्रेलाच शांभवी मुद्रा म्हणतात..! ही मुद्रा करताना तुमच्या विचारांवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. दरम्यान, काहीही विचार करू नका. तुमच्या पापण्या मिटू देऊ नका. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे आसन काही सेकंदांसाठी करा. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर होण्यास नक्की मदत मिळते.
Link Copied