फ्रेश वाटावं म्हणून दिवसातून दोन ते तीनदा अंघोळ करणारी माणसं आपल्याला सापडतील. सकाळी नेहमीची अंघोळ केल्यावर, संध्याकाळी ऑफिसातून घरी आल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन अंगावर पाणी घेणारे बहुसंख्य आहेत.
प्रचंड उकाड्याच्या या दिवसांमध्ये अंगाची लाही लाही होते, घामाने जीव नकोसा होतो. त्यापासून सुटका करणारा उपाय म्हणजे, अंघोळ. फ्रेश वाटावं म्हणून दिवसातून दोन ते तीनदा अंघोळ करणारी माणसं आपल्याला सापडतील. सकाळी नेहमीची अंघोळ केल्यावर, संध्याकाळी ऑफिसातून घरी आल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन अंगावर पाणी घेणारे बहुसंख्य आहेत. आणि पुन्हा एकदा रात्री झोपण्यापूर्वी अंग ओलं करणारेही आहेत. काही महिला-विशेषतः गृहिणी या तर घरातच राहून उकाड्याने सुचत नाही किंवा कामाने घाम येऊन अंग भिजतं, म्हणून यापेक्षाही जास्त वेळ अंग भिजवताना आढळतात. घराबाहेर पडण्यापूर्वी नि बाहेर जाऊन आल्यानंतर घामानं, उकाड्यानं सुधरत नाही, म्हणून स्नान करणार्याही बर्याच गृहिणी आहेत.
मोठ्या शहरांमध्ये ही स्वच्छता करण्यासाठी लोकांची आवड आणि निवड आहे शॉवरची. ज्यांच्या बाथरूममध्ये शॉवर फिट करण्यात आले आहेत, ते या शॉवरखालीच अंघोळ करणं पसंत करतात. तर काही लोक प्लॅस्टिक ट्यूबला लावलेला रेडिमेड शॉवर आणून त्याद्वारे शॉवरची मजा घेतात. पाण्याच्या झारीमधून पडणार्या या धारा तनामनाला शांत करतात, गुदगुल्या करतात. शॉवरचा वाढता वापर पाहून काही केमिकल कंपन्यांनी शॉवर जेल, सोप बाजारात आणले आहेत. आम्ही तर दोन-तीन वेळा शॉवर घेतो, असं म्हणणार्यांचे आपण कौतुकही करतो. पण अलीकडे एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे की, वारंवार शॉवरखाली अंघोळ करणं कितपत सुरक्षित आहे?
तजेल्यास अवरोध
काही तज्ज्ञांच्या मते, कित्येक लोक जरुरीपेक्षा जास्त वेळा शॉवर घेतात. स्वच्छता राखण्यासाठी, शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी आपण अंग धुतो, ते स्वच्छ होतं; परंतु त्याच्याने आजारपण येणार नाही, असं म्हणता येणार नाही. कारण वारंवार शॉवर घेतल्याने शरीराची रंध्रं जरुरीपेक्षा जास्त मोकळी होतात. अन् त्वचा कोरडी पडते. रंध्रे मोठी झाल्याने जंतूंना आत शिरायला वाट मिळते. मळ, धूळ आत सहजपणे जाते आणि रंध्रं बुजतात. त्वचेच्या तजेलपणास अवरोध होतो. ज्यांची त्वचा कोमल आहे, त्यांनी तर जरुरीपेक्षा जास्त वेळा शॉवरखाली जाऊच नये. तीच गोष्ट केसांची आहे. तुमच्या केसांची जातकुळी कशी आहे, ते तुम्हाला नेमकं ठाऊक नसतं. त्यांची मुळं कमकुवत असतील, तर शॉवरच्या ताशाने केस गळण्याची शक्यता अधिक म्हटली पाहिजे.
दुसर्या एका तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, मानवी शरीर हे एक उत्तम यंत्र आहे. ते स्वतःच्या अवयवांची देखभाल नीट करत असतं. ते नैसर्गिकरीत्या तेलांची (वंगण) निर्मिती आणि स्राव करत असतं. वारंवार शॉवर अंगावर घेण्याने या स्रावांची हानी होते. त्वचेचा पोत खालावतो. तिची बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती कमी होते. यामुळे कालांतराने त्वचेचे गंभीर रोग निर्माण होऊ शकतात.
क्रूरपणा नको
उकाड्याच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करणारे खूप लोक आहेत. शॉवरमधील थंड पाण्याच्या तुषारांनी शरीरात गारवा पसरतो. परंतु, काही महाभाग गरम पाण्याचा शॉवर घेताना आढळतात. (कदाचित ते थंडीत गरम शॉवरचा वापर करत असतील.) हा गरम पाण्याचा शॉवर ताशा अंगावर तडतडणं अजिबात योग्य नसल्याचं काही त्वचा रोग तज्ज्ञांचं मत आहे. त्यापेक्षा कोमट पाण्याचा शॉवर घ्यावा. तोही अगदी थोडा वेळ. शिवाय कोणत्याही पाण्याचा शॉवर घेतल्यानंतर आपली त्वचा ओली राहणं गरजेचं असतं. काही लोक ज्या मजेनं शॉवरचं पाणी घेतात, त्यापेक्षा जास्त क्रूरपणे ते पाणी शोषून काढतात. अंघोळ केल्या केल्या लगेचच टॉवेलने खसाखसा अंग पुसण्याचा कार्यक्रम या प्रकारात मोडतो. या खसाखसा पुसण्याने त्वचेचा ओलावा हद्दपार होतो. तिची हानी होते, हे या लोकांच्या लक्षातच येत नाही. खर तर, शरीरावर टॉवेलने हलका दाब देऊन निथळणारं पाणी शोषून घ्यावं. त्वचा कोरडीठाक करण्याचा क्रूरपणा करू नये, असं तज्ज्ञ सांगतात.
मुंबईच्या दमट आणि घामट हवेत जगणार्या लोकांना शॉवरची ही शास्त्रीय चिकित्सा कदाचित पटायची नाही. कारण घामाच्या चिकचिकाटाने जीव नकोसा करणार्या या हवेत झोप, श्वास घेणं, खाणं, पाणी पिणं यांच्या इतकीच ती आवश्यक बाब आहे. त्यामुळे फिरतीचे काम करणार्यांनी आणि लोकलचा प्रवास करत घरी येणार्यांनी दिवसातून दोन वेळा शॉवर घ्यायला हरकत नाही. घरी बसणार्यांनी मात्र वारंवार तो घेऊ नये. म्हणजे आरोग्य राखलं जाईल आणि पाण्याचाही अपव्यय होणार नाही.