सुंदर स्त्री… म्हणजे केवळ सुंदर मुखडा नव्हे, तर त्यास सुडौल बांध्याचीही जोड हवी. पुराण ग्रंथातही स्त्री सौंदर्याविषयीचा उल्लेख करताना, तिच्या सुंदर चेहर्याइतकेच, कमनीय बांध्यालाही महत्त्व दिलेलं आढळतं. खरं म्हणजे, एरव्हीदेखील प्रत्येक स्त्री आपला बांधा सुडौल असावा, यासाठी प्रयत्न करत असते.
पण एकदा का विवाहाची तारीख ठरली की, या सुडौल बांधा कमावण्याच्या प्रक्रियेची एक डेडलाइन निश्चित होते. आणि ही डेडलाइन पाळायची, म्हणजे केवळ त्यासाठीच्या योजना आखायच्या नाहीत, तर योग्य योजना आखून त्यानुसार कृतीही करायला हवी.
फिटनेस प्लान तयार करा
विवाहापूर्वी वजन कमी करायचंच आहे, असा पक्का इरादा असल्यास या शुभकार्यास आजच सुरुवात करा.
खरं म्हणजे, विवाहाच्या चार-सहा महिन्यांआधीपासूनच फिटनेस ट्रेनिंगची सुरुवात करायला हवी. यामुळे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. तसेच वजन कमी करण्याच्या या कार्यक्रमाला थेट सुरुवात करण्यापूर्वी त्यासाठीचा योग्य प्लान तयार करा.
मुख्य म्हणजे, काय करायचंय आणिकाय टाळायचंय, याची यादी तयार करून त्यानुसार वर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.
भरपूर पाणी प्या
पाण्याला पर्यायच नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. सॉफ्ट ड्रिंक्स, सरबतं यांना अलविदा म्हणा आणि त्याऐवजी अधिकाधिक पाणी पिण्यावर भर द्या. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विष द्रव्ये (टॉक्सिन्स) शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे त्वचा नितळ आणि सतेजही होते. म्हणूनच जेवणापूर्वी किमान दोन ग्लास आणि दिवसभरातून किमान आठ-दहा ग्लास पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे अतिरिक्त अन्न सेवन करणंही कमी होईल.
अतिरिक्त अन्न सेवन करू नका
अतिरिक्त आहार सेवन करणं, हे अधिक प्रमाणात कॅलरीज शरीरात जाण्याचं मुख्य कारण आहे. म्हणूनच अधिकच्या अन्नाला कटाक्षाने ‘नाही’च म्हणायचं, हा नियम स्वतःला घालून घ्या. जेवताना ताटात थोडंच अन्न घ्या आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, केवळ भूक शमविण्यासाठी अन्न सेवन करा. स्वादिष्ट आहे, भरपूर आहे, उरेल इत्यादी कारणांची सबब देत जास्तीचे अन्न पोटात ढकलू नका. एक वा दोन वेळा भरपूर खाण्यापेक्षा, दिवसातून चार-पाच वेळा थोडा-थोडा आहार घ्यायचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे भुकेवर संयम ठेवणेही शक्य होते आणि उगाच जास्तीचा आहारही सेवन केला जात नाही.
क्रॅश डाएट मुळीच करू नका
क्रॅश डाएटच्या जाळ्यात न अडकणंच हितावह आहे. अशा डाएट्समुळे वजन कमी होवो न होवो, शरीराची शक्ती मात्र नक्कीच कमी होते. परिणामी, तुम्ही आजारी दिसू लागता. म्हणजेच, अशा डाएटमुळे फायद्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. म्हणूनच, विवाहाला काही दिवसांचाच अवधी असताना आजारी पडायचे नसेल, तर अशा प्रकारच्या डाएटच्या नादी न लागता, सकस आहार घेण्याकडे कल असू द्या.
भाज्या व फळांचे प्रमाण वाढवा
वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, मेदयुक्त आहारापासून दूर राहा आणि आहारात ताज्या भाज्या व फळांचा अधिकाधिक समावेश करा. पॅकेज फूड्स आणि चॉकलेट्सही टाळलेलेच बरे. यापेक्षा सकस आहाराचा पर्याय निवडा. अशा आहारामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्व व खनिजेही मिळतील आणि वजन कमी करण्यासही मदत होईल.
पुरेशी झोप घ्या
झोपेशी मुळीच तडजोड करू नका. तज्ज्ञांच्या मते, रोज रात्रीची किमान 7-8 तासांची शांत झोप तुमचे शरीर आणि मन ताजेतवाने ठेवते. अपुर्या झोपेमुळे दिवसभर निरुत्साह राहतो आणि किमान विवाहापूर्वी तरी आळस व निरुत्साह योग्य ठरणार नाही. म्हणूनच सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक अशी पुरेशी शांत झोप घ्यायला अवश्य घ्या.
ताणतणावापासून दूर राहा
वजन कमी करण्याचं प्लानिंग करून त्यानुसार आहार-विहाराची पथ्य पाळणं चांगलं आहे, पण म्हणून त्या बाबतीत अति आग्रही राहू नका. उगाच त्याचा अट्टहास करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. एखाद वेळेस पथ्य पाळता नाही आलं,
तर त्याविषयी चिंता करत बसू नका.
आज फिटनेस प्लान सुरू केला आणि उद्याच वजन कमी होईल, असे कदापि होणार नाही. वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला काही वेळ लागतोच, त्यामुळे उतावीळ होऊ नका. धीर ठेवा आणि वजन कमी करण्याची ही प्रक्रियाही एन्जॉय करा.
मद्यपान करू नका
वाइन्स आणि कॉकटेल्स त्या स्पेशल दिवसासाठी राखून ठेवणेच योग्य ठरेल. एक ग्लास अल्कोहोल म्हणजे, 150 कॅलरीज आणि विवाहापूर्वी एवढ्या कॅलरीज, नक्कीच परवडण्यासारख्या नाहीत.
व्यायामाला सुरुवात करा
योग्य आहाराला योग्य आणि नियमित व्यायामाची जोड मिळाल्यास परफेक्ट फिगर मिळवणं काही कठीण नाही. दररोज किमान 20 मिनिटे व्यायाम केल्यास शरीरातील ऊर्जा वाढेल. तुम्हाला उत्साह जाणवेल आणि अधिकच्या कॅलरीज बर्न करायलाही मदत होईल. यासाठी जास्त काही करता नाही आलं, तरी चालणे, लिफ्ट टाळून पायर्यांचा वापर करणे अशा काही साध्या गोष्टीही करता येतील. वेट ट्रेनिंग वा कार्डिओविषयी साशंकता असल्यास योगासनांचा पर्याय निवडता येईल. यामुळे तुमचे तन आणि मनही आरोग्यदायी राहील.
आनंदी राहा
आनंदी राहण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही. मनुष्य आनंदी असला की त्याच्या शरीरामध्ये इनडॉर्फीन्स निर्माण होते, जे शरीर आरोग्यदायी राखण्यास मदत करते. तसेच आनंदी व्यक्तींची पचनसंस्थाही चांगली राहते. म्हणूनच फिट राहण्यासाठी, आनंदी राहा.
या 10 साध्या-सोप्या उपायांचा प्रामाणिकपणे अवलंब केल्यास त्या स्पेशल दिवशी तुमचा बांधाही सुडौल दिसेल,
यात शंका नाही.