सर्व सणांमध्ये दिवाळी ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. आपल्या देशात दिवाळीचा सण हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीचा सण सुरू झाला आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळतेय.
घरोघरी पणत्या, दिवे, आकाशकंदील, नवीन कपडे, फराळ, गोडाधोडाचे पदार्थ इत्यादींची रेलचेल दिसून येत आहे. वसूबारस अन् धनत्रयोदशी झाली असून, १२ नोव्हेंबरला नरकचतुर्थी आणि १५ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण झाल्यावर दिवाळी समाप्त होणार आहे.
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे खास महत्व असते. या दिवशी आपण सर्वजण देवी लक्ष्मी, माता सरस्वती, भगवान विष्णू आणि गणपती या देवी-देवतांची आवर्जून पूजा करतो. यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कधी आहे? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीपूजन कधी आहे?
यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते. तसेच, भगवान विष्णू, माता सरस्वती आणि गणपती, धान्य, पैसे, बत्ताशे, केरसुणी यांची विधीवत पूजा केली जाते. या पूजेला खास महत्व आहे.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची विधीवत पूजा करू शकता.
लक्ष्मीपूजनाचे महत्व
धन आणि समृद्धीची देवी म्हणून देवी लक्ष्मीला ओळखले जाते. लक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्या घरात सूख-शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेचे खास असे महत्व आहे.
या दिवशी केरसुणी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश, इत्यादी गोष्टींना विशेष महत्व आहे. त्यामुळे, देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत या गोष्टींचे खास पूजन केले जाते. ही पूजा योग्य पद्धतीने केल्याने आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते अशी देखील मान्यता आहे.