Close

दिव्यांचा महाउत्सव (Divyancha Mahautsav)

शुभशकुनाचे प्रतिक म्हणजे दिवा. एखाद्या ओसाड, रान असलेल्या जागी इवलीशी पणती जरी उजळवली की ती जागा नांदती वाटू लागते. दिव्याच्या या संस्कारातूनच ङ्गदिव्या दिव्या दीपत्कार, शुभंकरोती कल्याणम्,फ अशा प्रार्थना रचल्या गेल्या.
-अनुपमा

सूर्य अस्ताला गेला की पूर्ण भवताल अंधारात बुडून जात असे. भीती, एकटेपणा सगळीकडे भरून राहात असे. सूर्य उगवला की पुन्हा एकदा प्रकाशाचं आश्‍वासक वातावरण दिलासा देऊन जायचं. अशा हजारो रात्री आल्या नि गेल्या. मग उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर घर्षणाने अग्नीची निर्मिती होऊन अग्नीचा शोध लागला. पुढे याच अग्नीला दिव्याचं स्वरूप मिळालं आणि अंधारी रात्र ही आश्‍वासक दिवसासारखी उजळून निघाली.

दिव्यांचा प्रवास
अश्मयुगात ओबडधोबड दगडाला मध्यरात्री खड्डा आणि वातीसाठी एका बाजूला खाच. असे दिव्याचे सर्वसाधारण रूप होते. काही ठिकाणी शिंपल्यांचा दिवा म्हणून वापर केला जायचा. पुढे मातीचे दिवे बनू लागले.
सिंधू-संस्कृतीत मातीचे दिवे वापरले जायचे हे मोहेंजोदडो येथील उत्खननात सिद्ध झाले. यातूनच आज आपण जी पणती लावतो त्याचा जन्म झाला असावा. पुढे काळानुरूप दिव्यात अनेक बदल होत गेले. खापराचे, सोन्या-चांदीचे, कशाचे, तांब्या-पितळेचे, काचेचे, मेणाचे, वगैरे.
याच अग्नीच्या दिव्यातून लढाईसाठी मशाली पेटल्या. पालखी पुढे नेताना दिवट्या आल्या. कंदीलाने वाटाड्याला साथ दिली. गॅसबत्त्यांनी वराती झगमगल्या. द्रोणातील दिव्यांनी नदी तारांगणासारखी भासू लागली. दीपस्तंभानी नावाड्यांना दिलासा दिला. आपल्या भारतीय संस्कृतीने तर दिव्याला देवत्व बहाल केले. दारात, उंबरठ्यावर, तुळशीसमोर, पणती तेवू लागली. समई, निरांजन, पंचारती, लामण दिवा, नंदादीप यांनी देवघर उजळून निघाले.
हंड्या-झुंबरांनी घरे, सभामंडपे लखलखू लागली. शे-दिडशे फूड उंचीच्या दीपमाळा ऐटीत तिमिराला पळवून लावू लागल्या.
असा हा दिव्यांचा प्रवास! शुभशकुनाचे प्रतिक म्हणजे दिवा. एखाद्या ओसाड, रान असलेल्या जागी इवलीशी पणती जरी उजळवली की ती जागा नांदती वाटू लागते. दिव्याच्या या संस्कारातूनच ङ्गदिव्या दिव्या दीपत्कार, शुभंकरोती कल्याणम्,ङ्घ अशा प्रार्थना रचल्या गेल्या. ऋषीमुनीही ङ्गतमसो मा ज्योतिर्गमयफ असे म्हणून गेले.

आगमन दिव्यांच्या दिवाळीचं
पावसाळा संपून हिवाळ्याचे आगमन होण्याच्या काळात म्हणजेच शरद ऋतूच्या मध्यावर दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी आणि प्रकाशाचं वेगळंच नातं आहे. असं म्हणतात, प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येत परतले. तेव्हा सगळ्यांनी दीपोत्सव साजरा करून त्यांचं स्वागत केलं.

सम्राट अशोकाने दिग्विजयाप्रित्यर्थ हा दीपोत्सव सुरू केला.
सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने दीपोत्सव सुरू झाला, असं ही म्हटलं जातं.
दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव कार्तिक मासाच्या त्रयोदशीस सुरू होतो. त्या आधी आषाढी अमावस्या! हा खरं तर दीपपूजनाचा दिवस. या दिवशी घरातील सर्व दिवे घासून, पुसून, लख्ख करून त्यांची पूजा केली जाते.

दिव्यांचा प्रसंगनिष्ठ वापर
दिवाळी म्हणजे दिव्यांची ओळ किंवा रांग. आपल्या भारतीय जीवनात दीपज्योतींचा उत्सव फार मोठा उत्सव गणला गेला आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी दिव्याच्या वेगवेगळ्या रूपाला विशिष्ट महत्त्व दिले गेले आहे.
दिवाळीच्या दिवशी जो आकाशकंदील लावतो तो पितरांना प्रकाश देतो, अशी समजूत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही, असं पुराणात म्हटलं आहे. दिवाळी सामुहिकरित्या साजरी करताना या दिवशी सांजेला तलावाच्या काठावर भरपूर दिवे लावले जातात.
नरकचतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व सोळा सहस्त्र गोपीकांना बंदीवासातून मुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून तो सुर्योदयापूर्वीच परतला. त्यावेळी त्याला मंगलस्नान घालून दिव्यांनी ओवाळण्यात आले. म्हणूनच या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करून दिवे लावतात.
अश्‍विन वद्य अमावस्येला रात्री लक्ष्मीपूजन असते. लक्ष्मी त्या दिवशी सगळीकडे मुक्तसंचार करीत असते. जेथे स्वच्छता, पावित्र्य, प्रकाश आढळतो तेथे तेथे लक्ष्मी मुक्काम करते. म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्या दिवशी रोषणाई केली जाते.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलीप्रतिप्रदा म्हणतात. पुराणात अशी कथा आहे की देवदेवतांना बंदीवासातून सोडवण्यासाठी विष्णूने वामन अवतार धारण केला. बळीराजाच्या यज्ञाच्या प्रसंगी जाऊन त्रिपाद भूमी मागितली. दोन पावलात स्वर्ग व पृथ्वी व तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले. त्यावेळी बळीराजाला एक वरही दिला. त्याप्रमाणे या तीन दिवसात जो कोणी यमाप्रित्यर्थ दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. त्याच्या घरात सतत लक्ष्मीचे वास्तव्य असेल. म्हणूनच तेव्हापासून दीपदान व दिवाळी साजरी करण्याची प्रथा पडली. तसेच या दिवाळीपासून विक्रमसंवत सुरू होते. म्हणून याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची प्रथा आहे.
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज असते. या दिवशी यम आपली बहिण यमीकडे गेला. तिने त्याला ओवाळले व आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून बहिणीने भावाला दीर्घायुष्यासाठी ओवाळण्याची प्रथा रूढ झाली असे म्हणतात.

दिव्यांचा वैश्‍विक उत्सव
असा हा दिवा व त्याचा प्रकाश विजयाचे मांगल्याचे प्रतिक बनले आहे. म्हणूनच पृथ्वीतलावरील जवळजवळ सगळ्याच देशात तेजाचा हा वैश्‍विक उत्सव वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.
स्वीडनमध्ये तेरा डिसेंबरला सेंट ल्युसिया म्हणजे ङ्गफेस्टीवल ऑफ लाईटफ साजरा करतात. फ्रान्स तसेच इतर ठिकाणी आठ डिसेंबरला मदर मेरीच्या गौरवार्थ घराच्या दारे खिडक्यांवर मेणबत्त्या लावून संपूर्ण घर उजळवून टाकतात. हनुक्का हा ज्यू लोकांचा प्रकाशाचा उत्सव. दर दिवशी एक मेणबत्ती पेटवत, क्रमाने वाढवत जाऊन आठव्या दिवशी आठ मेणबत्त्या प्रज्वलीत केल्या जातात. हॉलंड, जर्मनी, बेल्जियम इथेही अकरा नोव्हेंबरला सेंट मार्टिन्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी सेंट मार्टिन्सच्या स्मृतिप्रित्यर्थ मुले कंदील घेऊन घरोघरी गाणी म्हणत फिरतात. थायलंडचा लॉय क्रथाँग हा सण दीपदानाचं महत्त्व अधोरेखित करतो. या दिवशी केळीच्या पानाला कमळाचा आकार देऊन त्यावर मेणबत्ती, मिठाई, फूल, एखादं नाणं ठेवतात. नंतर ते नदीत किंवा कालव्यात सोडले जाते. तैवानमधील लोक कागदी कंदीलावर (स्काय लँटर्नस्) आपल्या मनातील इच्छा लिहितात व ते कंदील आकाशात पतंगाप्रमाणे उडवतात. चीन मधील दिवाळी म्हणजे कंदीलांचा महाउत्सवच! या दिवशी चीनी लोकांची घरे, इमारती कंदीलाच्या तेजाने उजळून निघतात. अनेक ठिकाणी, देवळात कंदील महोत्सव भरवले जातात. फिलिपाइन्स मध्ये ख्रिसमसच्या काळात स्टार्सच्या आकाराचे कंदील ज्याला तिथे पॅरोल म्हणतात, ते घरांवर लावले जातात. इतर पाश्‍चात्य देशातही ख्रिसमसच्या दिवशी चर्चेस्वर, इमारतींवर सगळीकडे रोषणाई केली जाते. येशुच्या जन्माच्या वेळी जोसेफने मेणबत्त्या पेटवून मेरीचे रात्रीच्या थंडीपासून रक्षण केले होते. म्हणूनच आवर्जून सगळीकडे मेणबत्त्या उजळवल्या जातात.
काळ बदलला. वेगवेगळ्या प्रकारचे विजेचे दिवे आले. पण समईच्या तेजाकडे पाहून जे समाधान मिळतं, शांत वाटतं त्याला तोड नाही.
''दीप्य ते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप'' स्वतः प्रकाशित होऊन दुसर्‍याला प्रकाशित करणारा असा हा दिवा. पण नुसते दीप उजळून चालणार नाही, तर हृदयात प्रेमाचा, माणूसकीचा, स्वाभिमानाचा, सेवेचा, करूणेचा, अज्ञानरूपी अंधकार दूर करणार्‍या ज्ञानाचा, आपल्याला जे काही मिळालं आहे त्यासाठी ईश्‍वराप्रती कृतज्ञता जपण्याचा दीप प्रज्वलित करायला हवा तरंच खर्‍या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचं समाधान मिळेल.
॥सगळ्यांना दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा॥

Share this article