Close

मुंबईत मधुमेहाशी संबंधित मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ : आहार आणि जीवनशैली बदलांची तज्ज्ञांची शिफारस (Death Rate Related To Diabetes Rise In Mumbai : Experts Recommend Changes In Diet And Lifestyle)

मुंबईत मधुमेहाशी संबंधित मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, हा रोग एक गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनला आहे. प्रजा फाउंडेशनच्या अलीकडील अहवालानुसार, २०१४ ते २०२२ दरम्यान मधुमेहामुळे ९१,३१८ जणांचा मृत्यू झाला, ज्यात २०२२ मधील १४,२०७ मृत्यूंचा समावेश आहे २०१४ मध्ये ही संख्या फक्त २,५४४ होती, यावरून ही वाढ किती गंभीर आहे, हे दिसून येते. 

मधुमेहाचा उद्रेक फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. द लॅन्सेटच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये जागतिक स्तरावर ८२८ दशलक्ष प्रौढ मधुमेहाने ग्रस्त होते, ज्यामध्ये भारताचा वाटा २१२ दशलक्ष म्हणजेच एक चतुर्थांशहून अधिक होता. 

आजारासाठी बहुतेक रुग्ण औषधांवर किंवा इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून असतात.

तथापि, वाढत्या संशोधनातून असे दिसून येते की, संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहाराचा अवलंब केल्याने प्रकार १ आणि प्रकार २ मधुमेह असलेल्या रुग्णांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. प्रकार १ मधुमेहावरील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेटवर कोणतेही निर्बंध न लादता कमी फॅट असलेल्या वनस्पती-आधारित आहाराचे पालन केल्याने रुग्णांची इन्सुलिन संवेदनशीलता १२७% ने वाढली. 

त्याचप्रमाणे, प्रकार २ मधुमेहावरील अभ्यासात दिसून आले की, या आहाराचा अवलंब करणाऱ्या रुग्णांनी आजाराच्या लक्षनाथ सुधारणा आणि संभाव्य रेमिशन (आजाराचे लक्षणे अदृश्य होणे) साध्य केले. 

डॉ. झीशान अली, पीएच.डी, फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन (PCRM) मधील संशोधन कार्यक्रम तज्ज्ञ, यांनी डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडिजमध्ये आयोजित सत्रात या गोष्टीवर भर दिला. १३० हून अधिक पाककला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मुंबईत वाढणारी मधुमेह महामारी केवळ एक आकडेवारी नाही, ती एक धोक्याची घंटा आहे. डॉक्टर, परिचारिका, पोषणतज्ज्ञ आणि भावी शेफ यांना संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारीत आहाराच्या महत्त्वाची जाणीव असणे आवश्यक आहे, कारण ते सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.” 

मुंबईतील वाढत्या मधुमेह संकटावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. वनस्पती-आधारित आहाराचा स्वीकार आणि जीवनशैलीतील काही बदल यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळविता येईल आणि शहरातील सार्वजनिक आरोग्य परिणामांमध्ये सकारात्मक बदल घडविता येईल.

Share this article