"जागतिक स्तरावर मुंबईचा नावलौकिक वाढवणारा ‘मुंबई फेस्टिवल’ ९ दिवस साजरा करण्यात येणार असून यामध्ये सर्वजण आमंत्रित आहेत. प्रत्येक मुंबईकर हा या महोत्सवाचा आयोजक आहे", अशी माहिती या फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष व उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिली. ५० ठिकाणी, ५०० हुन अधिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला हा वेगळ्या संकल्पनेचा महोत्सव २० ते २८ जानेवारी दरम्यान साजरा होईल.
यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन व ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन म्हणाले, " मुंबई फेस्टिवल २४ हा उत्सव मुंबईच्या सांस्कृतिक भव्यतेची झलक दाखवतो. महाराष्ट्रात जे आहे ते देशात कुठेच नाही. ही संस्कृती पुढे नेण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सदर मुंबई फेस्टिवल आहे. " यामुळे अर्थव्यवस्था व रोजगार वाढेल. तसेच पर्यटनाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

“मुंबई बदलते आहे. ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो, कोस्टल रोड हे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यांचं आकर्षण पर्यटकांना आहे. त्यामुळे हा महोत्सव निव्वळ मनोरंजनाचा नसून मुंबईच्या विकासाची सुरुवात दाखविणारा आहे " असे उदगार मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी या प्रसंगी काढले.
या प्रसंगी 'मुंबई एक त्योहार है' हे घोषवाक्य असलेले थिम सॉन्ग प्रदर्शित करण्यात आले. शमीर तंदन यांनी संगीत दिलेले व शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, हर्षदीप कौर, फाल्गुनी पाठक, अवधूत गुप्ते यांनी हे गाणे गायले असून रेमो डिसुझा यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांनी महोत्सवाचे महत्व विषद केले.