लावणीचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर येते ती नर्तिकांची मादक अदा, नृत्य आणि नखशिखांत शृंगार. आत्म्याला जणू परमात्म्याशी संवाद साधण्यास भाग पाडणारी कलाही एका लावणी किंग मध्ये अवगत आहे. हो बरोबर ओळखलंत. लावणी किंग म्हणून जगभरात, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील. लावणीच्या दुनियेत स्वतःच हक्काचं स्थान आशिषने निर्माण केलं.
अशातच आपल्या नृत्याने, अदेने रसिकांच्या मनात घर करायला हाच लावणी किंग आणि त्याची संपूर्ण टीम 'सुंदरी' या नव्या कोऱ्या शोमधून भेटीस येत आहे. आशिष पाटीलसह ऋतुजा जुन्नरकर, सुकन्या कालन, निधी प्रभू या नृत्यांगना आपल्या विविधांगी नृत्य कलेने मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाल्या आहेत. येत्या ६ फेब्रुवारीला NMACC मुंबई येथे या शोचा श्रीगणेशा होणार आहे. शिवाय केवळ महाराष्ट्र नव्हे तर जगभरात सुंदरी शोची झलक पाहायला मिळणार आहे. जगभरात आशिष पाटीलच्या लावणीचा चाहतावर्ग आहे. अनेक हिट गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनाची धुरा आशिषने उत्तमरीत्या पेलवली आहे. आता 'सुंदरी' या नव्या शोमधून उत्तम सादरीकरण घेऊन तो पुन्हा एकदा रसिकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाला आहे.
'नृत्य आशिष' प्रॉडक्शन प्रस्तुत 'सुंदरी' या लावणी व कथ्थकची जोड घेऊन आशिष पाटील व टीम सज्ज झाली आहे. या शोची संपूर्ण जबाबदारी आशिष पाटीलच्या 'कलांगण स्टुडिओ'ने सांभाळली आहे. या शोची कन्सेप्ट, कोरिओग्राफी आणि दिग्दर्शनाची धुरा आशिष पाटीलने उत्तमरीत्या सांभाळली आहे. याबाबत बोलताना आशिष पाटील म्हणाला की, "'सुंदरी' हा शो माझ्यासाठी एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. मी आणि माझी टीम जगभरात या शोमार्फत रसिकांपर्यंत पोहचणार आहोत. कथ्थक व लावणीचे योग्य समीकरण या शोमार्फत रसिकांना पाहायला मिळणार आहे. मला आशा आहे की या शोला प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळेल".