Close

चिवडा आणि मक्याचा चिवडा (Chivda And Makyacha Chivda)

चिवडा

साहित्य: 8 कप पातळ पोहे, दिड ते 2 कप कुरमुरे, पाऊण ते 1 कप शेंगदाणे, 10-12 काजू, 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्ता पाने, अर्धा कप तेल, अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मोहोरी, अर्धा टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, साखर.
कृती: चिवडा जास्त कुरकुरीत राहण्यासाठी मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात पोहे कमी आचेवर कोरडेच भाजून घ्यावे. भाजताना तळापासून सारखे हलवत राहावे. पोह्यांचा रंग बदलू देऊ नये. साधारण 7 ते 8 मिनिटे भाजावे. तसेच कुरमुरे 2-3 मिनिटे भाजावेत. भाजताना सारखे ढवळत राहावे नाहीतर कुरमुरे जळतात. पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू थोडे तळून घ्यावेत. शेंगदाणे आणि काजू ब्राऊन रंगाचे झाले की एका वाडग्यात काढून ठेवावेत. त्याच तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. तळलेले शेंगदाणे, काजू घालून लगेच पोहे आणि कुरमुरे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल लागेल असे मिक्स करावे. हे करताना गॅस बारीक ठेवावा. नाहीतर तळाला पोहे जळू शकतात. गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी. आणि व्यवस्थित ढवळून घ्यावे.
टिपः
 चिवड्यात मनुका, सुक्या खोबर्‍याचे पातळ काप, डाळं घालायचे असेल तर शेंगदाण्यांबरोबर ते तळून घ्यावे.
 फोडणी करताना लसणीच्या पाकळ्या कापून घातल्यास चिवड्याला लसणीचा छान स्वाद येतो.
 चिवड्याला थोडा आंबटपणा हवा असल्यास, चिवडा गरम असताना 1 टीस्पून आमचूर पावडर घालून मिक्स करावे.

मक्याचा चिवडा


साहित्य: 7 कप कॉर्न फ्लेक्स, पाव कप तेल.
फोडणीसाठी: अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 6-7 पाने कढीपत्ता, 6-7 हिरव्या मिरच्या, पाऊण कप शेंगदाणे, पाव कप बेदाणे, 2 टीस्पून धणे-जिरे पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, मीठ आणि साखर चवीनुसार.
कृती: मोठ्या पातेल्यात पाव कप तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्यावे. शेंगदाणे एका ताटलीत काढून ठेवावेत. आच मध्यम करावी. गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी. कढीपत्ता घालून तडतडू द्यावा. बेदाणे घालावेत. काही सेकंद परतून शेंगदाणे आणि कॉर्नफ्लेक्स घालावेत. कॉर्नफ्लेक्स 6-7 भागात घालावेत. एकदम घालू नयेत, जेणेकरून तेल सर्व कॉर्नफ्लेक्सना लागेल. गॅस एकदम मंद ठेवून चिवडा नीट मिक्स करून घ्यावा. आता धणे-जिरेपूड, आमचूर पावडर, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. जर नॉनस्टिक भांडे वापरत असाल आणि भांड्याला कान असतील तर दोन्ही कान पकडून चिवडा सांडू न देता सावकाशपणे पाखडावा. म्हणजे सर्व जिन्नस छान मिक्स होतील. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवावा.

Share this article