पालकांपैकी एकाला जरी दम्याचा आजार असेल, तर मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. पण असं असलं तरी ज्यांच्या कुटुंबात कुणालाही दमा नाही, अशा मुलांमध्येही दम्याचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी आपण उपचाराशिवाय काही करू शकत नाही. दमा हा श्वसनमार्गातील सूज अथवा त्याच्यातील अरुंदपणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना ट्रिगर असं संबोधिलं जातं, त्यामुळे निर्माण होणारा श्वसन आजार आहे. खोकला, श्वसनाला होणारा त्रास यामुळे हे ट्रिगर अधिक प्रभावी होऊन दम्याचा झटकादेखील येतो. अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या मुलांच्या बाबतीत दिसायला लागली तर निश्चितपणे मुलांना दमा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी एक दमा डायरी तयार करून आपल्यासोबत ठेवावी. याचा उपयोग उपचाराच्या वेळी होऊ शकतो. साधारणतः परागकण, सिगारेटचा धूर, धूळीचे कण, पाळीव प्राण्यांमुळे होणारी धूळ, झुरळं, संसर्ग यामुळे ही समस्या प्रामुख्याने उद्भवू शकते. संसर्गजन्य नाही दम्याच्या बाबतीत अनेक समज तसंच प्रघात आहेत. लहान वयात मुलांच्या श्वसननलिकांचा आकार हा अरुंद असल्यामुळे त्यावेळी त्यांच्यामध्ये या समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. जर योग्यप्रकारे त्याचा उपचार केला तर निश्चितपणं दम्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे आपल्या आयुष्यावर देखील त्याचा परिणाम होत नाही. मात्र, हे करताना काही गोष्टींचा पाठपुरावा तसंच पालन करणं आवश्यक आहे. निदान करताना ते संतुलित व योग्य प्रकारे व्हावं, त्याचा अतिरेक होता कामा नये. छातीत धडधड किंवा अडकल्यासारखा आवाज येणे म्हणजे नेहमीच ती दम्याची लक्षणं नसतात. लहान मुलांमध्ये होणार्या संसर्गामुळेदेखील होऊ शकते. 3 वर्षांहून लहान असलेल्या जवळपास 30 टक्के मुलांच्या बाबतीत अशी समस्या उद्भवू शकते. मुलं जशी मोठी होतात तशी किंवा 6 वर्षांनंतर त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक जाणवू शकते. लहान वयात ही समस्या तितकीशी जाणवत नाही किंवा ध्यानात येत नाही. दमा हा तीव्र स्वरुपाचा आजार असल्यामुळे त्याची लक्षणं ही निश्चितपणे दिसून येतात. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, तसंच तो पसरत देखील नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. दम्याचा आजार आनुवांशिक देखील असू शकतो. पालकांपैकी एकाला जरी दम्याचा आजार असेल तर मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. पण असं असलं तरी ज्यांच्या कुटुंबात कुणालाही दमा नाही, अशा मुलांमध्येही दम्याचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी आपण उपचाराशिवाय काही करू शकत नाही. मुलांमध्ये दम्याचा आजार होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्याची लक्षणं वेळीच समजून घेतली पाहिजेत. त्यामुळे खालील लक्षणं दिसून आल्यास त्या मुलांमध्ये दम्याचा आजार होण्याची किंवा बळावण्याची शक्यता अधिक आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्वचेची आग होणं किंवा चट्टे उठणं. कुटुंबातील कुणाला दम्याचा आजार असणं किंवा अॅलर्जी असणं. नासिकेत अॅलर्जी सर्दी किंवा छातीत घरघर जाणवणं चाचणी करण्याची पद्धत योग्य तपासणी झाल्यानंतर तसंच वैद्यकीय पार्श्वभूमी विचारात घेऊनच त्याचं निदान अथवा उपचार करायला हवेत. त्याचबरोबर कोणत्या औषधांना त्याचं शरीर योग्य प्रतिसाद देत आहे, हे देखील विचारात घेतलं पाहिजे. त्यानुसार डॉक्टर्स निदानाला सहाय्य ठरावे, यासाठी काही चाचण्या करण्यास सांगतील किंवा पर्यायी निदान करण्यासाठी उपचार सुरू करतील. सीबीसी, एक्सरे चेस्ट या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यानंतर पिकफ्लोमेंटरी ही मोठ्या मुलांसाठी उपयुक्त अशी पद्धती आहे. पल्मोनरी टेस्ट ही चाचणी किशोरवयीन मुलांमध्ये करता येते. दम्याचा आजार असलेल्या प्रत्येक मुलांना अॅलर्जी चाचणी करणे आवश्यक नाही. अनेक श्वसनविकार तज्ज्ञ हे मुलांना अॅलर्जी चाचणी करण्याचा सल्ला देत नाहीत. कारण वातावरणातील धूळीकणांमुळे देखील ही अॅलर्जी असू शकते. त्यामुळे श्वसनाशी निगडीत आजाराशी त्याचा संबंध असेलच असे नाही. अनकेदा वातावरणातील बदलामुळे त्या चाचणीचा निष्कर्ष सकारात्मक येऊ शकतो. त्यामुळे धूळ, परागकण, बुरशी या सामान्य अॅलर्जीच्या प्रकारांना चाचणीत टाळलं पाहिजे. भीतीचं कारण नाही दमा हा श्वसनमार्गातील दाह किंवा सूज यामुळे अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर उपचारासाठी योग्य ती औषधं तसेच इनहेलेशन, तोंडी औषधं याचा मार्ग अवलंबिला पाहिजे. त्याचबरोबर करण्यात येणार्या उपचारपद्धतींच्या परिणामांचा अभ्यास वेळोवेळी केला पाहिजे. तोंडावाटे घेतल्या जाणर्या औषधांमुळे त्याचा परिणाम थेट सूज आलेल्या जागेत येतो आणि परिणाम त्वरित दिसून येतो. त्याचबरोबर रक्तामध्ये ही औषधं जाऊन दुष्परिणाम होण्याची शक्यतादेखील खूप कमी असते. दम्याच्या बाबतीत घेण्यात येणार्या औषधांचे दोन प्रकार आहेत. यात आराम मिळणं व नियंत्रण राहणं, असे दोन प्रकार आहे. आराम मिळण्याचा प्रकार हा दम्याचा झटका आल्यानंतर उपयोगात आणता येतो.तर नियंत्रणाचा प्रकार हा दीर्घकालीन उपाययोजनेचा भाग आहे. साधारणतः 3 ते 6 महिन्यांपर्यंत हा आराम मिळावा, म्हणून ही औषध असतात. दम्यावरील उपचारात काहीवेळी स्टिरॉईडचा देखील वापर होतो. त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण आणणं शक्य असलं तरी ती अधिक तीव्र व धोकादायक असतील, त्याचबरोबर त्याची मुलांना सवय लागेल अशी पालकांना धास्ती असते. पण दम्याच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्या स्टिरॉईडमुळे घाबरण्याची गरज नाही. हे इनहेलर प्रकारचं स्टिरॉईड असून त्याचं लहान मुलांना दिलं जाणारं प्रमाण हे अत्यल्प असतं. त्यामुळे त्याच्यावर त्याचा अन्य परिणाम होत नाही. त्याचबरोबर तणाव, नैराश्य, लठ्ठपणा, अनियमित वाढ किंवा अन्य प्रकार उद्भवत नाहीत, त्यामुळे त्याची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. योग्य वेळी उपचार स्टिरॉईडच्या औषधांमुळे दुष्परिणाम झाल्याचे प्रकार खूपच कमी प्रमाणावर दिसून आले आहेत. तोंडात गुळण्या केल्यानंतर ते योग्य प्रकारे उपयोगात आणले की नाही, ते पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचे बालरोगज्ज्ञाकडून पुनरावलोकन करणं महत्त्वाचं आहे.जी मुलं अशाप्रकारे स्टिरॉईडचे सेवन करत असतील तर त्यांच्या दम्याचा व त्यांच्यावरील दुष्परिणामांचा वेळोवेळी आढावा घेणं आवश्यक आहे. अनेक मुलांमध्ये सौम्य स्वरुपाचा दमा तर काहींच्या बाबतीत तो जीवाला धोकादायक ठरू शकेल, अशा स्वरुपाचा असतो. किरकोळ किंवा गंभीर लक्षणं नसलेला आजारदेखील हानीकारक असतो व त्याचे परिणाम दिसून येतात. पण समाधानाची बाब अशी की, कुठल्याही प्रकारचा दमा असला तरी योग्य प्रकारे त्याच्यावर उपचार केले तर निश्चितपणे तो कमी होण्यास तसंच नियंत्रित करण्यास यश मिळतं. अगदी 6 वर्षांहून लहान असलेल्या मुलांच्या बाबतीतदेखील असे आशादायी चित्र आहे. 6वर्षे वयात त्रास असलेल्या 60 टक्के मुलं नंतर बरी होतात. तसंच दम्याचा हा आजार कायमस्वरुपी दूर करता येतो. आहार आणि खेळ थंड पदार्थ टाळले पाहिजेत. अनकेदा या थंडपणामुळे छातीत कफ निर्माण होतो. जसे की दूध, दही, तांदूळ, लिंबुवर्गीय फळं इत्यादी. अनेक पदार्थांमधील रंग तसेच घटक यांच्यामुळे देखील दम्याच्या आजाराला बळकटी मिळू शकते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी सर्वांगीण संतुलित आहार आवश्यक आहे. त्यामुळे दूध, फळं तसेच काजू इत्यादींवर पदार्थ प्रमाणात खायला द्यावेत. मुलांच्या खेळांवर कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नसावा. त्यांना व्यायामशाळेत पाठविणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ केवळ दमा आहे म्हणून बंद करू नयेत. नियंत्रित दम्यामुळे ते आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व कामं योग्य प्रकारे करू शकतात. त्यांना वेळच्या वेळी औषधं घ्यायला लावा. त्यानंतर शारीरिक मेहनत, कामं करू द्या. हेही ध्यानात ठेवा की वरवर मुलं जरी व्यवस्थित वाटत असली तरी त्यांचा दम्याचा विकार हा नियंत्रित असायला हवा. दीर्घकालीन उपचारासाठी स्टिरॉईड किंवा त्याचा वर्षाकाठी एकदाच अवलंब हा पर्याय नाही तर पालक व डॉक्टर्स यांनी एकत्रितपणे मुलांच्या लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार तसंच दमा नियंत्रित करण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातून मुलांना मोकळेपणा दिला पाहिजे तसेच त्यांची जीवनशैली व्यवस्थित ठेवली पाहिजे.
- डॉ. चैताली लद्दाड
Link Copied